Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

मुख्यमंत्र्यांना स्वकीयांकडून काळे झेंडे!
परभणी, १२ जुलै/वार्ताहर

काँग्रेसच्या संपर्क मोहिमेनिमित्त मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे आज पक्षातीलच एका गटाने काळे झेंडे दाखवून स्वागत केले आणि आपल्या नाराजीला वाट करून दिली. ‘मुस्लिमविरोधी मुख्यमंत्री हाय हाय’ अशा निषेधाच्या घोषणांतच मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रमस्थळी स्वागत झाले. त्यांच्या भाषणातही एक-दोन वेळा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाल्यावर ‘बेशिस्त खपवून घेणार नाही’ असा दम श्री. चव्हाण यांना भरावा लागला.

मित्रमंडळे मोडीत काढा!
काँग्रेसच्या नेत्यांना अशोकरावांचा सल्ला

नांदेड, १२ जुलै/वार्ताहर

सध्या राज्यात ठिकठिकाणी मित्रमंडळाची स्थापना करून काँग्रेसला समांतर संघटना स्थापन करण्याचे प्रयत्न काही लोकप्रतिनिधींकडून सुरू आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्व मित्रमंडळे बरखास्त करावीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज केले. काँग्रेसच्या संपर्क मोहिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. चव्हाण बोलत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, संपर्कमंत्री रवीसेठ पाटील, शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे, आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री शोभा बच्छाव, खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार संजय दत्त, राजन भोसले, गुलाबराव घोरपडे, महापौर प्रकाश मुथा, उपमहापौर उमेश पवळे आदी या वेळी उपस्थित होते.

तुरी.. फक्त श्रीमंतांघरी!
प्रदीप नणंदकर, लातूर, १२ जुलै

एके काळी गरिबांचे अन्न म्हणून समजल्या जाणाऱ्या तुरी यांनीही आता गरिबांची साथ सोडली असून ८६ रुपये किलो दर झाल्यामुळे त्या आता फक्त श्रीमंतांच्याच घरी राहण्यास गेल्या आहेत. केंद्रीय कृषिमंत्री देशभरात वर्षभर पुरेल इतका अन्नधान्याचा साठा उपलब्ध असल्याचे सांगत असले, तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. या वर्षी विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात ३० टक्केच तुरीचे उत्पादन झाले.

वडा-पावातून मराठी माणसाचा विकास होणार आहे काय? - चव्हाण
औरंगाबाद, १२ जुलै/खास प्रतिनिधी

‘‘वडा-पाव हे कोणत्या पक्षाचे धोरण असू शकते का? या वडा-पावामुळे मराठी माणसांच्या आणि पर्यायाने राज्याच्या विकासाच्या थापा मारणाऱ्या कल्पनाशक्तीची कीव करावी लागेल,’’ अशा शब्दात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज शिवसेनेवर हल्ला चढविला. अमेरिकेत जाऊन ‘फ्रेंडस ऑफ शिवसेना’च्या घोषणाही केल्या जातात. महाराष्ट्रात मराठीविषयी एक भूमिका आणि परदेशात वेगळी भूमिका हे कसे काय, असा सवालही त्यांनी केला.
प्रदेश काँग्रेस समितीच्या संपर्क मोहिमेचा मराठवाडय़ातील प्रश्नरंभ श्री. चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते. संपर्कमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार एम. एम. शेख व डॉ. कल्याण काळे, सरचिटणीस आमदार संजय दत्त, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, माजी आमदार अब्दुल सत्तार व कैलास गोरंटय़ाल, शहराध्यक्ष जी. एस. ए. अन्सारी आदी उपस्थित होते.

‘आमच्या कुलपाची किल्ली हरवली..’
सुहास सरदेशमुख, उस्मानाबाद, १२ जुलै

उस्मानाबादकर फारसे बोलत नाहीत. नेते प्रतिक्रियावादी असल्याने बोलून उपयोग काय? त्यामुळे सगळ्यांच्या तोंडाला कुलूप. आता कुलुपाला किल्ली हवीच. नाही तर ते उघडणार कसे? साहेबांच्या घराची काल झडती झाली. तेव्हापासून उस्मानाबादकरांनी तोंडाला घातलेले कुलूप उघडले आणि कुलूप-किल्लीची चर्चा सध्या रंगली.

मुखेडमध्ये बेटमोगरेकरांविरुद्ध सगळे एक
गणेश कस्तुरे, नांदेड, १२ जुलै

विधानसभेच्या निवडणुकीत हणमंत पाटील बेटमोगरेकर यांच्या व्यतिरिक्त कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही त्याला निवडून आणू, असा पवित्रा काँग्रेसच्याच उर्वरित चार गटांनी घेतल्याचे आज स्पष्ट झाले. इच्छुकांच्या उद्या (सोमवारी) होणाऱ्या मुलाखतीवेळी ही भावना मुख्यमंत्र्यांच्या कानी घालण्यात येणार आहे.

ग्रामसेवकांच्या परीक्षेत एक प्रश्नच गायब!
बीड, १२ जुलै/वार्ताहर
कंत्राटी ग्रामसेवकपदाच्या लेखी परीक्षेत प्रश्नपत्रिकेतील एकोणपन्नासावा प्रश्नच गायब असल्याचे दिसून आल्यानंतर आज खळबळ उडाली. पंधरा मिनिटांनी हा मुद्रणदोष असल्याचे सांगत परीक्षाकेंद्रात हा प्रश्न तोंडी सांगून वेळ मारून नेण्यात आली. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामसेवकपदाच्या ५२ जागांसाठी आज शहरातील सात परीक्षा केंद्रांवर ३ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. सकाळी दहा वाजता परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रश्नपत्रिका देण्यात आली. उमेदवारांनी प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर अठ्ठेचाळीसनंतर थेट ५० क्रमांकाचाच प्रश्न दिसला. ४९ क्रमांकाचा प्रश्न गायब असल्याचे स्पष्ट झाले. उमेदवारांनी चौकशी केल्यानंतर यंत्रणेची तारांबळ उडाली.

दुसरा विवाह करणाऱ्यावर कारवाई
औसा, १२ जुलै / वार्ताहर

तालुक्यातील लामजना येथील विवाहित शिक्षकाने शिक्षकी पेशातील आपल्या चुलत बहिणीशी लग्न करण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्याच्या पत्नीने किल्लारी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अखेर विवाह टळला. लामजना येथील या शिक्षकाचे सात वर्षापूर्वी लग्न झाले. त्यांना सात वर्षाचा मुलगाही आहे. पण अविवाहित चुलत बहिणीशी लग्न करायची संमती मिळावी म्हणून त्या शिक्षकाने आपल्या पत्नीला कोऱ्या कागदावर सही कर म्हणून धमकावले. परंतु पत्नीने सही करण्यास नकार देत आरडाओरड केली व पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

भाजपचे उद्या धरणे आंदोलन
जळकोट, १२ जुलै/वार्ताहर

पीक विमा वाटपात करण्यात आलेला अन्याय दूर करावा आणि जळकोट व उदगीर तालुक्यांत दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार टी. पी. कांबळे, माजी आमदार गोविंद केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. १४) उदगीरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सोमेश्वर सोप्पा, बालाजी केंद्रे, जनार्दन चौले, उस्मान मोमीन, रमाकांत रायेवार यांनी केले आहे.

मंगळसूत्र चोरणाऱ्या तीन चोरांना अटक
औरंगाबाद, १२ जुलै/प्रतिनिधी

शहरात मोठय़ा प्रमाणात मंगळसूत्र चोरीच्या घटना सुरू असताना गुन्हे शाखेने मंगळसूत्र चोरणाऱ्या तीन चोरांना पकडले. पोलिसांपुढे चोरटय़ांनी फार मोठे आव्हान उभे केले होते. मोटरसायकलने भरधावपणे येवून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अचानक हिसकावून पळून जाणारी टोळी सध्या सक्रिय आहे. गुन्हे शाखा मंगळसूत्र चोरांच्या मागावर असतानाच संपत ऊर्फ शेंडय़ा कचरू जाधव (वय २८, रा. मिटमिटा), सुनील नानासाहेब मोहिते (वय २१, रा. एन-६) व शैलेंद्र ऊर्फ दीपक नरसिंग मरमट (वय २८, रा. आभूषण पार्क, देवळाई रोड) या तिघा मंगळसूत्र चोरांना पकडले.

‘ ऑटोलाईन ’ चे संचालक पळणीटकर यांचे निधन
औरंगाबाद, १२ जुलै/ प्रतिनिधी

येथील ऑटोलाईन या वर्कशॉपचे संचालक बाळकृष्ण पळणीटकर यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. बाळकृष्ण पळणीटकर यांनी १९८५ मध्ये रामा ऑटोमोबाईल्समध्ये सुरुवात केली. त्यानंतर मारुती सव्‍‌र्हीसेसचा उद्योग १९९४ पर्यंत पाहिला. त्याचवर्षी स्वत:चा ऑटोलाईन या नावाने चार चाकी दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. ऑटोमोबाईल्स उद्योग जगतात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञ म्हणून या क्षेत्रातला किताबही त्यांना मिळालेला आहे.

‘मोर मेगा स्टोअर’च्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल
औरंगाबाद, १२ जुलै/प्रतिनिधी
मागील महिन्याच्या अखेरीस सुरू झालेल्या ‘मोर मेगा स्टोअर’च्या व्यवस्थापकासह दोन जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. नोकरीवरून काढून टाकण्यासाठी मोरच्या व्यवस्थापकाने एका कर्मचाऱ्यावर मोबाईल चोरीचा ठपका ठेवला होता. शिवाय त्याला डांबून जबर मारहाणसुद्धा केली. जालना रोडवर नुकत्याच सुरू झालेल्या मोर मेगा स्टोअरमध्ये कामावर असलेल्याविलास मोहन शेजूळ याने स्टोअरमधून मोबाईल चोरल्याचा आळ आणण्यात आला. शुक्रवारी मध्यरात्री २.३० पासून शनिवारी दुपारी ३ पर्यंतच्या कालावधीत विलासला मोबाईल चोरीचा ठपका ठेवत व्यवस्थापक श्री. बत्रा, कशप व सुरेश काळे या तिघांनी एका खोलीत डांबून मारहाण केली.

नोटांचे विवरण लिहिण्याच्या बहाण्याने २४ हजारांची लूट
औरंगाबाद, १२ जुलै/प्रतिनिधी
समोर दंगल सुरू आहे, दागिने रुमालात बांधून घ्या, नोटा फाटक्या असतील, मी तपासून देतो, पावतीवर नोटांचे क्रमांक टाकणे आवश्यक आहे, मी टाकून देतो, मी तुमच्या नोटा मोजण्यासाठी मदत करतो, अशा प्रकारे कितीतरी बहाणे करून भामटे शहरवासीयांची लूट करीत आहेत. शुक्रवारी अशाच प्रकारचा बहाणा करून भामटय़ाने २४ हजार ५०० रुपये लंपास केले.

अंगणवाडी मानधन वाढ
औरंगाबाद, १२ जुलै/प्रतिनिधी
आयटक प्रणित राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचे परिपत्रक काढण्याची मागणी संघटनेद्वारे करण्यात आली होती. राज्य शासनाने १ जुलैला या संदर्भातील शासन निर्णयाचे परिपत्रक राज्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा परिषदांना पाठविले आहे. राज्य शासनाने १ एप्रिल २००८ पासून सेविका व मदतनीसांना अनुक्रमे ५०० व २५० रुपयांची वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

एलसीडी गायब करणाऱ्या भामटय़ाला अटक
औरंगाबाद, १२ जुलै/प्रतिनिधी

सुराणा इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करणाऱ्या नोकराला ३५ हजारांचा एलसीडी टीव्ही पळविताना रंगेहात पकडण्यात आले. दीपक राठोड याने इमानइतबारे काही महिने काम केल्यावर मालक विक्रम सुराणा यांचा विश्वास संपादन केला. मालकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून टीव्ही, फ्रीजच्या गोदाम देखभालीचे काम सोपविले. गोदाममधून लागेल त्या वस्तू आणून देणाऱ्या दीपकने याच संधीचा फायदा उचलायचे ठरविले. राहुल डोळेझाके या भामटय़ाच्या मदतीने दीपकने शनिवारी रात्री साडेअकरा वाजता गोदाममधून एलसीडी लांबविण्याची योजना बनविली. मात्र मालकाला याची खबर लागताच क्रांतीचौक पोलिसांना त्यांनी कळविले. त्यामुळे एलसीडी चोर अलगदपणे जाळ्यात सापडले.

वसंत नाईक यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी व गुणवंतांचा भोकरमध्ये सत्कार
भोकर, १२ जुलै/वार्ताहर
शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून उत्पादनात भर घालावी, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती गोविंद बाबागौड पाटील यांनी केले. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ते बोलत होते. स्वातंत्र्यसेनिक दत्तराम थेरबनकर, कृषी अधिकारी दायलबाजे उपस्थित होते. सुभाष यशवंतकर, सुभाष घंटलवार, अनंतवार व दहावीत ९६ टक्के मिळविणाऱ्या साईयोगेशचाही सत्कार करण्यात आला.

गेवराईत गॅस्ट्रोची साथ सुरुच, ११ रुग्ण दाखल
गेवराई, १२ जुलै/वार्ताहर
तालुक्यातील बारा गावात २० जणांना गॅस्ट्रोची लागण झाली. गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणण्यात अपयश आल्याने ही साथ अनेक गावांत फैलावली असून येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी ११ रुग्णांना दाखल करण्यात आले. दूषित पाण्यामुळे तालुक्यात गॅस्ट्रोची साथ पसरत चालली असून येथील उपजिल्हा रुग्णालयात आठवडाभरात ३० रुग्ण दाखल झाले आहेत.

परतूरमध्ये दोन मोबाईल चोरटे पकडले; १३ मोबाईल जप्त
परतूर, १२ जुलै/वार्ताहर

शहरातील मोंढा भागातील भाजी मंडईत दोन मोबाईल चोरटय़ांना पोलिसांनी पकडलेअसून त्यांच्याकडून ५७ हजार रुपये किमतीचे १३ मोबाईल संच जप्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. आढे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आढे यांना या चोरटय़ांनी धमकावले होते.

‘‘स्टेट बँक ऑफ हैदराबाद’ मधील घोटाळ्याची चौकशी करा’
भोकर, १२ जुलै/वार्ताहर
तालुक्यातीलमातुळ येथील स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या बँकेत उघड झालेल्या गैरप्रकाराची रक्कम कोटय़वधीत असून याप्रकरणाची सीबीआय चौकशी झाल्यास आणखी दलाल हाती लागतील, अशी तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील-लागळूदकर यांनी केली. ते म्हणाले मातूळ येथील स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेत किसान क्रेडिट कार्डच्या रकमेत अफरातफर करून बँकेला लाखोंना गंडविल्याचे उघड झाले यावेळी या अपहारात तेव्हाचा शाखाधिकारी विठ्ठल गाडेकर, अरुण सावरीकर, रोखपाल गोल्ला श्रीनिवासलू, शिपाई अशोक सोनकांबळे या चौघांना गैरव्यवहारात दोषी धरून शाखाधिकारी शिवकुमार अय्यर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असला तरी हा प्रत्यक्षात कोटय़वधींचा घोटाळा आहे. या बँकेत काही शेतकऱ्यांची नावेही नोंद नाही तर काहींना प्रत्यक्षात मिळालेल्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम नावावर आहे. याची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे.

अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मोर्चा
जालना, १२ जुलै/वार्ताहर
वाढीव मानधन फरकासह मिळण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. सेविकांचे मानधन वेळेवर देण्यात यावे यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्यामोर्चाचे शिष्टमंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वानखेडे यांना भेटले. यावेळी त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

राष्ट्रवादीच्या जागांवरही काँग्रेसकडून मुलाखती!
जालना, १२ जुलै/वार्ताहर
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणूक एकत्रित लढविणार की नाही, याबाबत उलटसुलट वक्तव्ये काही नेत्यांकडून राज्यात केली जात आहेत. या पाश्र्वभूमीवर जालना जिल्ह्य़ात मात्र पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काँग्रेसने ठरविले आहे. शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे डॉ. शोभा बच्छाव यांचा समावेश असलेले एक निरीक्षक मंडळ गुरुवारी (दि. १६) जालना येथे जिल्ह्य़ातील पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. जालना जिल्ह्य़ात गेल्या विधानसभेच्या वेळी परतूर आणि जालना हे दोनच मतदारसंघ काँग्रेसकडे होते; तर बदनापूर, अंबड (पुनर्रचनेनंतरचा घनसावंगी) आणि भोकरदन हे तीन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होते आणि सध्या तेथे त्या पक्षाचे आमदार आहेत. जालना आणि परतूर मतदारसंघांतील इच्छुक उमेदवार आपली बाजू निरीक्षकांसमोर मांडणार आहेत.

निम्न दुधना प्रकल्पात १०.३४ द.ल.घ.मी. पाणी
परतूर, १२ जुलै/वार्ताहर

निम्न दुधना प्रकल्पात पहिल्याच पावसात १०.३४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा झाला आहे.
तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीवरील निम्न दुधना प्रकल्पात परतूर, मंठा व सेलू तालुक्यातील एकूण २२ गावे बुडीत क्षेत्रात गेली आहेत. या प्रकल्पाचे काम मागील दीड दशकांपासून रेंगाळले होते. आता मात्र हे काम पूर्णत्वास आले असून पहिल्याच पावसात प्रकल्पात १०.३४ द.ल.घन.मी. पाणी जमा झाले आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सिंचनासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

पुंजाराम काळे यांचे निधन
गेवराई, १२ जुलै/वार्ताहर
ज्येष्ठ नागरिक पुंजाराम बापूराव काळे यांचे दीर्घ आजाराने काल निधन झाले. ते ५७ वर्षाचे होते. त्यांच्यावर तलवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दैनिक लोकमत समाचारचे तालुका प्रतिनिधी न.पु. काळे त्यांचे चिरंजीव होत.

तंटामुक्त मोहिमेत १६ गावे पात्र
बीड, ११ जुलै/वार्ताहर
महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेत १०७ गावांनी भाग घेतला. त्यापैकी १६ गावे पात्र ठरली आहे. यात गेवराई तालुक्यातील सर्वाधिक पाच गावांचा समावेश आहे. जिल्हाबाह्य़ मूल्यमापन समितीने पात्र गावांना भेटी देऊन तपासणी केली असता १६ गावे तंटामुक्त मोहिमेत पात्र ठरली . यात अंबाजोगाई तालुक्यातील पोखरी, आष्टी तालुक्यातील करेवाडी, शेरी खुर्द, बीड तालुक्यातील गुंदावाडी, कुमसी, काटवटवाडी, शिरूर तालुक्यातील कोळवाडी, पाटोद्यातील कुसळंब, माजलगाव तालुक्यातील उमरी, चोपनवाडी गेवराई तालुक्यातील किनगाव, बाबुलतारा, गुळज, सावळेश्वर, टाकळगव्हाण या गावांचा समावेश आहे.

बी. एड. परीक्षेत ९१ टक्के निकाल
चाकूर, १२ जुलै/वार्ताहर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या बी. एड. परीक्षेत जगत जागृती शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदिरा पाटील अध्यापक महाविद्यालयाचा निकाल ९१.१० टक्के लागला. या महाविद्यालयात शिवशक्ती अंबुलगे पहिली, सोनाली वाघुले दुसरी व सीमा कोथळकार तिसरी आली. एकूण ४७ विद्यार्थी विशेष प्रश्नविण्यासह, १८ प्रथम श्रेणी तर १५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

‘मतदारनोंदणीच्या कामात लक्ष द्या ’
परळी वैजनाथ, १२ जुलै/वार्ताहर
विधानसभेच्या निवडणुकीसाठी नवीन मतदार नावनोंदणीचे काम कार्यकर्त्यांनी गांभीर्याने करावे अशा सूचना भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंडितराव मुंडे यांनी केली. नवीन मतदार नावनोंदणी मोहिमेसंदर्भात कार्यकर्त्यांना माहिती व सूचना देण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले की, आगामी निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याचा विक्रम मोडून जिल्ह्य़ात सर्वाधिक मतांनी विजय मिळवायचा आहे. त्यासाठी मतदारांची भेट घेऊन त्यांची नावनोंदणी करावी.ओळखपत्रे मिळाली नाहीत त्यांचीही भेट घेऊन दुरुस्ती करून देण्यासाठी सहकार्य करावे.

शिक्षक संघाचा उद्या संप
हिंगोली, १२ जुलै/वार्ताहर
शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाने मंगळवारी (दि. १४) लाक्षणिक संप पुकारल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पी. एस. घाडगे यांनी दिली. या वेळी संघटनेचे पदाधिकारी प्रश्नचार्य बी. एस. पूर्णे, प्रश्नचार्य बुधवंत, टी. जी. पवार, बी. एस. वराड, सोळंके उपस्थित होते.

गुरुपौर्णिमा उत्साहात
भोकरदन, १२ जुलै/वार्ताहर
जाफराबाद येथे भास्करमहाराज देशपांडे यांच्या विधींनी नवनाथ संस्थानमध्ये गुरुपौर्णिमा साजरी झाली. भोकरदन येथे लक्ष्मीकांत महाराज अन्वा यांच्या पादुकांचे पूजन व मिरवणूक काढण्यात आली. जाफराबाद येथील नवनाथ संस्थानमध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुणे, विदर्भ येथून शिष्य उत्सवासाठी आले होते. भोकरदन येथे वैकुंठवासी सद्गुरू लक्ष्मीकांत महाराजांच्या चांदीच्या पादुकांचे पूजन करण्यात आल्यावर मिरवणूक काढली.

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घट
सोयगाव, १२ जुलै/वार्ताहर
पावसाने दिलासा दिल्यामुळे खरीप हंगाम बहरला. शेतात काम करण्यासाठी शाळकरी मुले गेल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. ग्रामीण भागात कमी उपस्थिती हा चिंतेचा विषय बनला आहे. दुसरीकडे शेतात काम करणाऱ्या मजुरांची मजुरी वाढली आहे व मजुरांची टंचाईसुद्धा आहे. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची मुले शाळेत न जाता पालकांसह शेतात काम करतात.

ठाकरे उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर
बीड, १२ जुलै/वार्ताहर
काँग्रेसच्या जनसंपर्क मोहिमेसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे मंगळवारी (दि. १४) जिल्ह्य़ात येणार आहेत. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षसंघटन मजबूत व्हावे, केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात व पक्षाची ताकद मजबून होऊन येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळावे हा उद्देश या मोहिमेमागे आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचे आवाहन नवनाथ थोटे यांनी केले आहे.

तालुकाध्यक्षपदी संतोष झाल्टे
सिल्लोड, १२ जुलै/वार्ताहर
तालुका ग्राहक पंचायतीच्या अध्यक्षपदी संतोष झाल्टे यांची व सचिवपदी प्रश्न. शिवराम साखळे यांची निवड करण्यात आली. संघटनेची कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष - सुभाष कड, सहसचिव - प्रश्न. शिवाजी वाठोरे, कार्याध्यक्ष - अशोक तायडे, सहकार्याध्यक्ष - प्रश्न. प्रमोद सुरडकर, संघटक - नंदकुमार सोनवणे, सहसंघटक - जी. टी. वाघ, कोषाध्यक्ष - संतोष बोराडे, सहकोषाध्यक्ष - विजय मंडलेचा.

महिला संरक्षण कार्यशाळा
जालना, १२ जुलै/वार्ताहर
‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५’ अंतर्गत संरक्षण अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आर. डी. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपअधीक्षक श्रीमती इनामदार उपस्थित होत्या. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. डी. कुलकर्णी यांनी अधिनियमातील कर्तव्य व भूमिका यासंबंधी मार्गदर्शन केले. प्रश्नस्ताविक विजय देशमुख यांनी व सूत्रसंचालन कालंदी गायधने यांनी केले. चंदी दहीकर यांनी आभार मानले.