Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

दिल्ली मेट्रो रेल्वेचा पूल कोसळून पाच ठार
नवी दिल्ली, १२ जुलै/खास प्रतिनिधी

 

दक्षिण दिल्लीतील प्रमुख बाजारपेठ लाजपतनगर येथील लेडी श्रीराम कॉलेजपाशी मेट्रोचा पूल आज पहाटे कोसळून घटनास्थळी काम करीत असलेले चार कामगार आणि एका इंजिनिअरसह पाच जण ठार झाले, तर १५ जण जखमी झाले. सुदैवाने अपघात पहाटेच्या वेळी झाल्याने मोठय़ा प्रमाणावर जीवहानी टळली. काँक्रीटच्या दोन खांबांदरम्यानची स्लॅब कोसळून हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. पुलाचा भाग कोसळल्याने या भागातील पाईपलाईन फुटून सर्वत्र पाणी साचले. या अपघातानंतर या भागातील काही रस्ते उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत बंद करण्यात आले असून वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्यात आली आहे. १९ ऑक्टोबर २००८ रोजी अशाच रविवारच्या पहाटे पूर्व दिल्लीत विकास मार्गावरील लक्ष्मीनगर या बाजारपेठेच्या भागात मेट्रोच्या पुलाचा भाग कोसळून झालेल्या अपघातात २ कामगार ठार झाले होते. आजच्या अपघातासाठी गॅमन इंडिया या बांधकाम कंपनीला जबाबदार ठरविण्यात येत असून या कंपनीविरुद्ध दिल्ली पोलिसांनी कलम ३०४ (अ) अन्वये निष्काळजीपणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. जिथे अपघात झाला त्या पी-६७ काँक्रीटच्या खांबाला आधीच तडे गेले होते, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या खांबाला पडलेल्या तडय़ा संबंधितांच्या लक्षात आणून देण्यात आले होते. पण गॅमन इंडियाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. गॅमन इंडिया कंपनीने हैदराबादमध्ये बांधलेला एक फ्लायओव्हर गेल्यावर्षी कोसळून मोठा अपघात झाला होता.
गेल्या सात वर्षांंपासून दिल्ली मेट्रो अनेक भागांमध्ये निर्धोकपणे धावत असताना गेल्या नऊ महिन्यांमध्ये घडलेल्या या दुसऱ्या मोठय़ा प्राणांतिक अपघाताने डीएमआरसीच्या कामाला गालबोट लावले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा एक वर्षांवर येऊन ठेपली असताना त्यापूर्वी मेट्रो रेल्वेचे जाळे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार कंपन्या सुरक्षेच्या मुद्याकडे दुर्लक्ष करून घाईघाईने काम करीत असल्याचा दिल्लीतील नागरिक आणि विरोधी पक्षांचा आरोप आहे.