Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

श्रीधरन यांचा राजीनामा नामंजूर

 

राजधानी दिल्लीत आज दुर्दैवी रविवारच्या पहाटे मेट्रो रेल्वे पुलाचा आणखी एक अपघात घडून दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे प्रमुख ई. श्रीधरन यांना वाढदिवसाची कटु भेट दिली. या अपघातात एका अभियंत्यासह पाच कामगार जागीच ठार झाल्यामुळे व्यथित होऊन अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत श्रीधरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गेल्या बारा वर्षांपासून दिल्ली मेट्रो रेल्वेचे निष्ठेने काम करणारे श्रीधरन यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला असून अपघातासाठी जबाबदार ठरलेल्या गॅमन इंडिया या बांधकाम कंपनीविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीचे उपराज्यपाल तेजेंद्र खन्ना आणि मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याकडे आपण राजीनामा पाठविला असल्याचे त्यांनी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले. ७७ वर्षांंचे श्रीधरन यांनी अपघातग्रस्त स्थळाचा दौरा केला आणि या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. पुढच्या वर्षी दिल्लीत होऊ घातलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी दिल्ली मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण करावयाचे आहे. ही गोष्ट खरी असली तरी आपण व्यक्तिगत सिद्धांतांशी तडजोड करू शकत नसल्याचे श्रीधरन यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी अतिशय जबाबदार आणि सक्षम लोक काम करीत होते. पण मी या प्रकल्पाचा प्रमुख असल्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे श्रीधरन यांनी सांगितले. मात्र, श्रीधरन हे भावुक व्यक्ती असून त्यांच्या राजीनाम्यावर घाईघाईने निर्णय घेता येणार नाही. दिल्लीसाठी काय चांगले आहे, याचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.दिल्लीच्या जनतेलाही श्रीधरन यांचा राजीनामा देणे रुचलेले नाही.
मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी पंतप्रधानांच्या कार्यालयाला पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर श्रीधरन यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. श्रीधरन यांची समजूत घालून त्यांना कार्यरत करण्यासाठी मात्र सरकारला भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत.