Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

काँग्रेस संपर्क मोहिमेमध्ये वाद जुंपला
पदाधिकाऱ्यास माजी आमदाराची जातीय शिवीगाळ
औरंगाबाद, १२ जुलै/खास प्रतिनिधी

 

काँग्रेसच्या संपर्क मोहिमेचा मराठवाडय़ातील प्रारंभ आज वादावादीने झाला! पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रभान पारखे यांना सिल्लोडचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. व्यासपीठावर खुर्ची बळकाविल्याच्या कारणावरून मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्यासमक्ष हा वाद झाला. या दोन्ही नेत्यांच्या सूचनेनुसार वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. संपर्क मोहिमेचा मराठवाडय़ातील पहिला कार्यक्रम आज औरंगाबादमध्ये होता. जालना रस्त्यावरील ‘सागर लॉन्स’मध्ये आज दुपारी कार्यक्रम सुरू होण्याआधीच या वादाला सुरुवात झाली. आपल्याला सत्तार यांनी जातीयवाचक शिवीगाळ केल्याची माहिती पारखे यांनी पत्रकारांना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते महादेव शेलार यांनी प्रदेश समितीचे पदाधिकारी, आमदार आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी व्यासपीठावर यावे असे आवाहन केले. त्यानुसार प्रदेश पदाधिकारी आणि आमदार व्यासपीठावर जाऊन बसले. श्री. चव्हाण, श्री. ठाकरे यांचे आगमन होताच व्यासपीठावर माजी आमदार अब्दुल सत्तार (सिल्लोड) व माजी आमदार कैलास गोरंटय़ाल (जालना) आले आणि त्याच क्षणी व्यासपीठावर बसलेल्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार पुढच्या रांगेत कसे बसतात, असा सवाल केला.
श्री. पारखे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांचे समर्थक आहेत, तर अब्दुल सत्तार चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जातात. सत्तार यांनी पारखे यांच्याकडे बघून जातीवाचक शिवीगाळ केली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाचाही उल्लेख झाला. ‘काँग्रेस धर्मनिरपेक्षवादी पक्ष आहे आणि पक्षाच्या व्यासपीठावरच एका दलित पदाधिकाऱ्याला काँग्रेसच्या माजी आमदाराकडून जातीवाचक शिवीगाळ केली जाते हे कसे काय?’, असा सवाल पारखे यांनी केला. त्यांनीही अब्दुल सत्तार यांना शिवीगाळ केली आहे. हे प्रकरण वाढत आहे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी यावर पडदा टाकला.
कार्यक्रम झाल्यानंतर या वादाला पुन्हा तोंड फुटले. सत्तार यांनी केलेल्या शिवीगाळीची तक्रार मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे केली आहे. सत्तार यांच्याविरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार फिर्याद देण्याची परवानगीही त्यांच्याकडे मागितली आहे. त्यांनी या तक्रारीवर निर्णय घेतला नाही तर काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे दाद मागू, असे पारखे यांनी सांगितले. या प्रकाराबाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना सत्तार म्हणाले, ‘‘मी शिवीगाळ केलीच नाही. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्यासमोर मी शिवीगाळच कसा करीन? विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे गटबाजी सुरू झाली आहे. सिल्लोड मतदारसंघात मी प्रबळ इच्छुक उमेदवार आहे त्यामुळे मला बदनाम करण्याचा हा डाव आहे.’’ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी ‘असे काही घडलेच नाही’ असे सांगितले. शिवीगाळ केल्याचे आपण ऐकले नाही, असे सांगून ते म्हणाले की, खुर्चीवरून किरकोळ तक्रारी झाल्या असे त्यांनी सांगितले.