Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

नक्षलवाद्यांच्या भुसुरुंग स्फोटात ३० पोलीस शहीद
चंद्रपूर, १२ जुलै/प्रतिनिधी

 

गडचिरोलीपासून अवघ्या ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्हय़ातील मानपूरजवळ नक्षलवाद्यांनी आज दुपारी केलेल्या भुसुरूंग स्फोटात पोलीस अधीक्षक विनोद चौबे यांच्यासह राज्य व केंद्रीय राखीव दलाचे २६ जवान शहीद झाले. या भागात भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी शहीद होण्याची ही पहिलीच घटना असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, गडचिरोली पोलिसांनी रेड अलर्ट घोषित करून सीमावर्ती भागात शोध मोहीम सुरू केली आहे. या घटनेतील मृतांचा आकडा ३० वर वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली ते राजनांदगाव या राज्यमार्गावर सावरगावजवळ राज्याची हद्द संपते. यानंतर १० किलोमीटर अंतरावर मानपूर गाव आहे. मानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोहकाच्या जंगलात मदनवाडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी हा भीषण सुरूंग स्फोट घडवून आणला. मानपूर पोलीस ठाण्यातील दोन जवान आज सकाळी दुचाकीवर बसून एका घटनेची चौकशी करण्यासाठी मदनवाडय़ाकडे जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांना अडवले व अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या केली. या घटनेची माहिती कळताच राजनांदगावचे पोलीस अधीक्षक विनोद चौबे सुमारे शंभर जवानांसह घटनास्थळी जात असताना मानपूरपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर नक्षलवाद्यांनी सुरूंग स्फोट घडवून आणला. यात पोलीस अधीक्षक चौबे यांच्यासह एकूण ३० जवान जागीच ठार झाले.
या स्फोटातून बचावलेल्या जवानांनी घटना घडताच लगेच वाहनाखाली उतरून गोळीबार सुरू केला. नक्षलवाद्यांकडूनही तुफान गोळीबार झाला. या दोघांमधील ही चकमक सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती. नक्षलवाद्यांनी केलेला स्फोट एवढा जबरदस्त होता की, पोलिसांची वाहने उंच उडाली व रस्त्यावर सहा फूट खोल खड्डा पडला. नक्षलवादी शेकडोच्या संख्येत असल्याने स्फोट झाल्यानंतर सुमारे पाच तास जवानांना शहीद पोलिसांचे मृतदेह ताब्यात घेता आले नाही. छत्तीसगड व गडचिरोलीमधील नक्षलवाद्यांच्या दलमने एकत्र येऊन ही घटना घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.