Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

.. हे तर ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’!
पुणे, १२ जुलै / खास प्रतिनिधी

 

दहावीत अनुत्तीर्ण होऊनही अकरावीत प्रवेश देण्याच्या निर्णयाची ‘एटीकेटी’ म्हणून अवहेलना करणे चुकीचे असून केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ पर्यायाप्रमाणेच राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली ही संधी आहे.. शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ‘एटीकेटी’चा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पुरवणी परीक्षा आयोजित करण्यासाठी सुरू झालेल्या मोहिमेचे ‘एटीकेटी’ च्या निर्णयामध्ये रूपांतर झाले. पुरवणीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार होता. ‘एटीकेटी’ चा प्रस्ताव मात्र थेट जाहीर करण्यात आला, अशी टीकाही केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर शिक्षण खात्यामधील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’ ला ‘एटीकेटी’ च्या पडद्यामागील घडामोडींची माहिती दिली. ‘‘एटीकेटी’ चा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडण्याचा प्रश्नच येत नाही,’ असे स्पष्ट करून संबंधित अधिकाऱ्याने सांगितले, की ‘आमच्या दृष्टीने हा ‘खात्यांतर्गत’ विषय आहे. राज्य बोर्डाशी विचारविनिमय करून आम्ही या प्रस्तावावर निर्णय घेतला आहे. दहावी-बारावी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची जबाबदारी बोर्डाची असते, तर प्रवेश देण्याची जबाबदारी राज्य शासनाचा शालेयशिक्षण विभाग पार पाडतो. त्यामुळेच या दोन घटकांनी मिळून हा प्रस्ताव केला असून खात्याचे प्रमुख या नात्याने मंत्रिमहोदयांनी त्याच्या अंमलबजावणीचा आदेश दिला. केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांचे एकूण विषयांपैकी पाच विषयांचे गुण प्रवेशप्रक्रियेच्या गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य़ धरले जातात. पर्सेटाईल, ९०:१० च्या वेळी समानीकरण करताना केंद्रीय मंडळाच्या धर्तीवरच ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ चा पर्याय राज्यातील विद्यार्थ्यांना देण्याचा प्रस्ताव विचारात घेण्यात आला होता. परंतु, तो संमत होऊ शकला नाही. आता निकाल जाहीर झाल्यानंतर नापास विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देण्यासाठीच्या प्रस्तावाकडे आम्ही ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ म्हणूनच पाहत आहोत. परीक्षा दिलेल्या सातपैकी पाच विषयांचे गुण ग्राह्य़ धरण्याची आणि उर्वरित दोन विषयांचे गुण सुधारण्यासाठी संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. त्याकडे पास-नापास किंवा ‘एटीकेटी’ अशा रुढार्थी व्याख्येद्वारे पाहू नये,’ असे आवाहन संबंधित अधिकाऱ्याने केले. ‘राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमधील रिक्त जागांवर ‘एटीकेटी’ योजनेद्वारे प्रवेश दिला जाईल. सध्याच्या प्रवेशप्रक्रियेमध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत. त्याचप्रमाणे ‘एटीकेटी’च्या रांगेतील विद्यार्थ्यांला टक्के अधिक असले, तरी सध्या प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची जागा हिरावून घेतली जाणार नाही. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी असुरक्षिततेची भावना बाळगू नये,’ असेही स्पष्ट करण्यात आले.