Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सरकारच्या कारवाईच्या दट्टय़ानंतर सात डॉक्टर कामावर रुजू; संपकरी डॉक्टरांची ‘समातंर’ ओपीडी
मुंबई १२ जुलै / प्रतिनिधी

 

सरकारने सुरु केलेल्या निलंबन कारवाईला न जुमानता ‘मार्ड’ च्या निवासी डॉक्टरांनी विद्यावेतनाच्या वाढीसाठी पुकारलेला संप आज सहाव्या दिवशीही सुरु ठेवला. मात्र रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून डॉक्टरांनी आज के.ई. एम. रुग्णालयात ‘समातंर बाह्य रुग्ण कक्ष’ (ओपीडी ) सुरु केला. या ओपीडीत या संपकरी डॉक्टरांनी ३०० रुग्णांची तपासणी करुन एका अभिनव आंदोलनाला सुरुवात केली आहे. यामुळे तरी सरकारला निवासी डॉक्टरांच्या भावना कळतील असे मार्डच्या प्रतिनिधींनी सांगितले. दरम्यान सरकारने निलंबनाची कारवाई सुरु केल्याने सात निवासी डॉक्टर पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. राज्यातील तीन हजार निवासी डॉक्टरांनी वाढीव विद्यावेतनासाठी मागील सहा दिवसापासून संप पुकारला आहे. संपाच्या पाचव्या दिवशी राज्य शासनातर्फे या डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करताना विद्यावेतनात सहा हजाराची वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र मार्डने तो फेटाळून लावला. त्यांना ३० हजारापर्यत विद्यावेतन हवे आहे. राज्य सरकारने डॉक्टरांची महत्वाची मागणी मान्य न केल्याने हा संप सुरुच ठेवण्याचा निर्णय मार्डने घेतला आहे. सरकारनेही डॉक्टरांच्या संपाला न जुमानता तीन हजार डॉक्टरांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश रविवारी जारी केले आहेत. दरम्याने निवासी डॉक्टरांच्या या संपाला ‘आयटक’ने पािठबा दिला असून सरकारच्या नार्केतेपणामुळे हा संप झाल्याचे म्हटले आहे.