Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

प्रादेशिक

मुंबईतील तलाव क्षेत्रात पावसाची हजेरी तर ठाण्यात ‘दांडय़ा’ सुरुच!
मुंबई, १२ जुलै / प्रतिनिधी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात पावसाने सुरूवात केली आहे. समाधानकारक नसला तरी तुरळक का होईना या परिसरात पाऊस पडत असल्याने महापालिका प्रशासन आणि मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी तलावांच्या क्षेत्रात मात्र पाऊस पडत नव्हता. जून महिना पूर्णपणे कोरडा गेला.

मुळा-प्रवराच्या थकबाकीमुळे वीज ग्राहकांना दरवाढीचा ‘शॉक’!
केदार दामले
मुंबई, १२ जुलै

मुंबईपाठोपाठ राज्यातील ग्राहकांनाही नजीकच्या भविष्यात विजेच्या दरवाढीचा शॉक बसणार असून त्याला अहमदनगर जिल्ह्यातील मुळा-प्रवरा सहकारी वीज सोसायटी कारणीभूत असल्याचे हाती आलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. सातत्याने होणारा राजकीय हस्तक्षेप आणि थकबाकी वसूल करण्याबाबत शासकीय पातळीवरील उदासीनता यामुळे ही थकबाकी जवळपास दोन हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचली असून ती वसूल झाल्यास ‘महावितरण’च्या ग्राहकांना एक पैसाही दरवाढीचा झटका सहन करावा लागणार नाही, हेच कटू सत्य आहे.

‘मार्ड’च्या संपाने रुग्ण त्रस्त तर शासन अस्वस्थ!
संदीप आचार्य

रिक्षा चालक असलेल्या रामभाऊं नी आपल्या आजारी मुलाला घेऊन मुसळधार पावसात केईएम रुग्णालय गाठल खरं, पण निवासी डॉक्टरांचा संप सुरू असल्याने मुलाला तेथे उपचार मिळणे शक्य झाले नाही. खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करणे अशक्य असल्यामुळेच वसई येथून रामभाऊ आपल्या मुलाला घेऊन तेथे आले होते. आजारी मुलाचे आता काय होणार या चिंतेने त्यांना रडू आवरेना. एकीकडे पाऊस कोसळत होता आणि इथे रामाभाऊंच्या डोळ्यातून अश्रुधारा.. त्याचवेळी निवासी डॉक्टरांचे पथक ‘लेके रहेंगे’च्या घोषणा देत चालले होते.

अभियंत्यांना केंद्राप्रमाणे वेतन देण्यास मुख्यमंत्र्यांची अनुकूलता
मुंबई, १२ जुलै/प्रतिनिधी

राज्यातील अभियंत्यांचे वेतन हे केंद्रातील वेतनाप्रमाणे करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाची सकारात्मक भूमिका असून त्या संदर्भात येत्या आठ दिवसांत सर्व संबंधितांची बैठक बोलाविण्यात येईल आणि योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

महाराष्ट्रात परतण्याबाबत नंतर ठरवू- गोपीनाथ मुंडे
मुंबई, १२ जुलै/प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीनंतर मी महाराष्ट्रात परत येणार की दिल्लीत राहणार ते नंतर ठरवू, असे सांगत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी आपण पुन्हा राज्याच्या राजकारणात येऊ शकतो, असे संकेत आज दिले. यापूर्वी आपण राष्ट्रीय राजकारणातच राहणार असल्याचे मुंडे यांनी वेळोवेळी स्पष्ट केले होते.

धारावीकरांना प्रत्येक इमारतीत बगिचे, व्यायामशाळा, रुग्णालय, शाळा अन् महाविद्यालयेही!
समर खडस
मुंबई, १२ जुलै

धारावीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मास्टर प्लाननुसार आशियातील सर्वात मोठय़ा झोपडपट्टीच्या विकासानुसार ज्या इमारती बांधल्या जाणार आहेत त्या धारावीच काय तर मुंबईतील कुठल्याही उच्चभ्रू वस्त्यांना तोंडात बोटे घालायला लावतील, अशा पद्धतीच्या असणार आहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये तळमजला अधिक एक मजल्याचे पोडियम असणार आहे. या पोडियमवर बगिचा, दवाखाने, प्रसुतीगृह, व्यायामशाळा, शाळा, कॉलेजे आदी सुविधा देण्यात येणार आहेत.

महापौरांना अमराठी भाषिकांच्या वाटण्याच्या अक्षता
बंधुराज लोणे
मुंबई, १२ जुलै

मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी महापौर निधीत वाढ करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने वर्षभरात महापौर निधीत दमडीनेही भर घातलेली नाही. या समितीवर सर्वच सदस्य अमराठी भाषिक असून त्यांच्यामध्ये निधीत भर घालण्याची क्षमता आहे, असे महापौर राऊळ यांनी जाहीर केले होते. मात्र आता अमराठी भाषिकांनीही महापौरांना वाटण्याच्या अक्षताच दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या समितीची साधी बैठकही वर्षभरात झालेली नाही.

अतिक्रमण घोटाळ्याप्रकरणी एम.के.मढवीचा शोध सुरू
नवी मुंबई, १२ जुलै/प्रतिनिधी

नवी मुंबई महापालिकेतील अतिक्रमण घोटाळ्याप्रकरणी सीबीडी पोलिसांनी ऐरोली येथील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा नगरसेवक एम.के.मढवी याचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, याप्रकरणी महापालिकेचे माजी उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांची पोलिसांनी शनिवारी सलग नऊ तास कसून चौकशी केली. महापालिकेत सर्वाधिक काळ अतिक्रमण विभागाचे प्रमुख म्हणून काम पहाणारे पटनिगीरे यांच्याकडून याप्रकरणी महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.

विर्क यांना तीन महिने मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता
मुंबई, १२ जुलै / प्रतिनिधी

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी अनामी रॉय यांची पुन्हा नियुक्ती होऊ शकते, असे सुतोवाच गृहमंत्री जयंत पाटील यांनी केले असले तरी सत्ताधारी काँग्रेस पक्षाने विद्यमान महासंचालक एस. एस. विर्क यांनाच आणखी तीन महिने मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसा प्रस्ताव तयार झाला असून त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
विर्क हे येत्या ३१ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. विर्क यांच्यानंतर सेवाज्येष्ठ असलेले सुप्रकाश चक्रवर्ती, जीवन वीरकर हे यापूर्वीच निवृत्त झाल्यामुळे अनामी रॉय हे आता सेवाज्येष्ठतेत अग्रक्रमावर आहेत. त्यामुळे विर्क यांच्या निवृत्तीनंतर रॉय यांचा राज्याचे पोलीस प्रमुख बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता. गृहमंत्री पाटील यांनीही तसे सुतोवाच केल्यामुळे रॉय हेच आता पोलीस महासंचालक होतील, असे स्पष्ट झाले होते. परंतु विर्क यांना मुदतवाढ देण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे रॉय यांना आणखी तीन महिने वाट पाहावी लागेल, अशी चिन्हे आहेत. रॉय हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हवे आहेत. परंतु रॉय यांची नियुक्ती केल्यास निवडणुकीच्या तोंडावर लोकांमध्ये वेगळे संकेत जातील, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळेच विर्क यांच्या मुदतवाढीचा गांभीर्याने विचार केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील महासंचालकांची पदे चारवरून पाच इतकी करण्यात आली आहेत. महासंचालक (ऑपरेशन) हे नव्याने पद निर्माण करण्यात आले आहे. सध्या महासंचालक (राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), महासंचालक (गृहरक्षक) ही पदे अनुक्रमे चक्रवर्ती आणि वीरकर निवृत्त झाल्यामुळे रिक्त आहेत. महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंडळाचे महासंचालक म्हणून हसन गफूर काम पाहत आहेत. जयंत उमराणीकर यांना महासंचालकपदी बढती देऊन त्यांच्यावर नक्षलवादविरोधी मोहिमेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उमराणीकर हे डिसेंबर अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. मात्र चक्रवर्ती आणि वीरकर यांच्यापाठोपाठ विर्क निवृत्त झाल्यास महासंचालकांच्या एकूण चारजागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त शिवानंदन यांची बढतीने बदली करावी लागणार आहे.