Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

काँग्रेस नगरसेवकांत अस्वस्थता
नगर, १२ जुलै/प्रतिनिधी

महापालिकेतील काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे. मात्र, नेतेच गप्प बसल्याने या अस्वस्थतेला तोंड कोणी फोडायचे, असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे. सोयरेसंबंधातून सगळे काही ‘ठरवून’ चालल्याची चर्चा मनपाबाहेरच्या पक्ष संघटनेतही आहे. तब्बल ९ नगरसेवकांचा ‘तगडा’ पाठिंबा असूनही सत्तेचा प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादीने काँग्रेसला एकही पद दिलेले नाही. पक्षाचे मनपातील अस्तित्वच यामुळे पणाला लागले असल्याचे बोलले जाते.

धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस
पर्यटकांनी लुटला आनंद
अकोले, १२ जुलै/वार्ताहर
सुमारे महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर मुळा व भंडारदरा धरणांच्या पाणलोटक्षेत्रात चांगल्या पावसास सुरुवात झाली. घाटघर, भंडारदऱ्याच्या लौकिकास साजेसा मुसळधार पाऊस पडत नसला, तरी कालपासून पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरीवर सरी पडू लागल्या आहेत. रविवार सुट्टीमुळे घाटघर, भंडारदऱ्यास मोठय़ा प्रमाणात गर्दी केलेल्या पर्यटकांनी पावसात मनमुराद भिजण्याचा आनंद आज लुटला. भंडारदरा धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. धरणातील पाणीसाठा आज एक टीएमसीपेक्षा जास्त झाला. तालुक्याच्या पूर्व भागातही आज दिवसभर चांगला पाऊस पडला.

‘‘राष्ट्रवादी’चा मुख्यमंत्री होण्यासाठी कामाला लागा’
कार्यकर्ता शिबिरात नेत्यांचा सूर
कोपरगाव, १२ जुलै/वार्ताहर
राष्ट्रवादी काँग्रेस आजही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या क्रमांकावरच आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक आमदार निवडून आणून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्यासाठी सर्वानी संघटितपणे प्रयत्न करावेत, असा सूर आज उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता शिबिरात उमटला. नगर, नाशिक, जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्य़ांतील प्रमुख पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्या एकदिवशीय शिबिराचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांच्या हस्ते झाले.

जिल्ह्य़ामध्ये प्राथमिक शिक्षणाची सर्वात चांगली परिस्थिती - झावरे
नगर, १२ जुलै/वार्ताहर

प्राथमिक शिक्षणाची सर्वात चांगली परिस्थिती नगर जिल्ह्य़ात असून, कोणी एखाद्या घटनेचे भांडवल करून संपूर्ण शिक्षणक्षेत्राची बदनामी करू नये, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले. गुरुकुल मंडळ, शिक्षक समिती, महिला आघाडी व सांस्कृतिक शिक्षक समितीच्या त्रवार्षिक अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून श्री. झावरे बोलत होते.

‘वूमन इंटरनॅशनल मास्टर’साठी शाल्मली सज्ज
नगर, १२ जुलै/प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अल्पावधीत चमकलेल्या राहुरीच्या शाल्मली गागरे हिने या खेळातील वूमन इंटरनॅशनल मास्टर बनण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेला दुसरा ‘नॉर्म’ आज स्पेनमध्ये पार केला. उद्या (सोमवार) स्पेनमध्येच सुरू होणाऱ्या तिसऱ्या नॉर्मसाठी सज्ज झालेल्या शाल्मलीचे आंतरराष्ट्रीय मानांकन या कामगिरीमुळे ३७ गुणांनी सुधारले. तिचे सरासरी रेटिंग आता २३०० झाल आहे. वयाच्या १४व्या वर्षी तिने ही किमया साध्य केली.

कोठी रस्त्याचे नष्टचर्य संपेना..
आता नाशिक महसूल विभाग विकास पॅकेजमध्ये समावेश!
नगर, १२ जुलै/प्रतिनिधी
कोठी ते आनंदधाम हा रस्ता नाशिक महसूल विभाग विकास पॅकेजमध्ये घेऊन विविध ठिकाणी हा रस्ता नोंदविण्याचा विक्रमच महापालिकेने केला आहे. तरीसुद्धा या रस्त्याचे नष्टचर्य संपायला तयार नाही, हे विशेष! यापूर्वी मनपाने त्यांच्या स्वनिधीतील रस्तेविकास आराखडय़ात हा रस्ता घेतला होता. ते काम झालेच नाही. त्यानंतर राज्य सरकारकडून रस्तेविकासासाठी मिळालेल्या निधीत त्याचा समावेश झाला.

आम्हीही कच्च्या गुरूचे चेले नाही - भुजबळ
लोकसभेतील हिशेब गोदावरीत बुडवा - पाटील
कोपरगाव, १२ जुलै/वार्ताहर
स्वबळावर लढण्याची भाषा कोणी करीत असेल, तर आम्हीही कच्च्या गुरूचे चेले नाहीत. आघाडीचा निर्णय राष्ट्रवादी व काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वात दिल्लीत होईल, असे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले, या बरोबरच लोकसभेच्या निवडणुकीतील हिशेब गोदावरी नदीत बुडवून विधानसभा निवडणुकीत विजयासाठी कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी केले.

पावसाचे पाणी साठवा!
लोकपंचायत

नुकताच कुठे पावसाळा सुरू झाला आहे. पुढील वर्षी पाण्याची टंचाई जाणवू द्यायची नसेल, तर जिल्ह्य़ातील नागरिकांनी त्वरित ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मंत्र अनुसरून पावसाच्या पाण्याचे भूगर्भात पुनर्भरण करण्याची चळवळ राबवायला सुरुवात करणे अत्यावश्यक आहे. केवळ पुढच्या वर्षीसाठीच नव्हे तर भावी पिढय़ांसाठी ही चळवळ संजीवनी ठरेल.

पोलीस हद्दीच्या वादातून मृतदेह तासभर जागेवरच!
चिंचपूर फाटय़ाजवळ दोन ठार
संगमनेर, १२ जुलै/वार्ताहर

मोटरसायकल आणि मालमोटारीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दोघे जागीच ठार झाले. दरम्यान, पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या वादातून मृतदेह तासभर जागेवरच पडून होते.संगमनेर-लोणी रस्त्यावर चिंचपूर फाटय़ाजवळ सायंकाळी ५ वाजता हा अपघात झाला. शिवाजी गणपत घोडके (वय ५०, रा. कोल्हेवाडी) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव असून, दुसऱ्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. ठार झालेले दोघे आपल्या दुचाकीवरून (एमएच १७ क्यू ५५२०) लोणीहून संगमनेरकडे येत असताना समोरून आलेल्या मालमोटारीने (जीए ०१ डब्ल्यू ५८२३) दुचाकीस जोराची धडक दिली.
अपघातात दुचाकीवरील दोघांच्याही डोक्याला गंभीर इजा होऊन ते जागेवरच ठार झाले. घोडके यांची समनापूरनजीक वीटभट्टी आहे. ते मूळचे पाडेगाव (ता. श्रीरामपूर) येथील रहिवासी आहेत. दरम्यान, अपघाताचे ठिकाण लोणी की संगमनेर पोलिसांच्या हद्दीत आहे, या वादावरून दोन्ही मृतदेह तासभर जागेवरच पडून होते. हे ठिकाण संगमनेर हद्दीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हेडकॉन्स्टेबल सुरेश वाव्हळ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संगमनेरची रुग्णवाहिका उशिरा पोहोचली. तोपर्यंत प्रवरा रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह लोणीला नेण्यात आले. मात्र, तेथेही शवविच्छेदनाची सोय न झाल्याने रात्री मृतदेह पुन्हा संगमनेरला आणण्यात आले. मृतदेह तातडीने हलविण्यात यावेत, यासाठी निमगाव जाळीचे पोलीस पाटील दिलीप डेंगळे, चिंचपूरचे पोलीस पाटील अशोक थेटे यांनी मोठी धावपळ केली. संगमनेर पोलिसांनी मालमोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वाळूच्या डंपरने चुलता-पुतण्याला चिरडले
नगर, १२ जुलै/प्रतिनिधी

वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरने मोटरसायकलवरील चुलता-पुतण्याला चिरडले. हा अपघात नगर-औरंगाबाद रस्त्यावरील जेऊर नाक्यासमोर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. वैभव पोपट पटारे (१८ वर्षे) व सचिन रावसाहेब पटारे (२७ वर्षे, दोघेही रा. खरवंडी, ता. नेवासे) अशी मृतांची नावे आहेत. सचिन वैभवचा चुलता आहे. एमआयडीसी पोलिसांनी डंपरचालक अनिल सोनवणे (२७ वर्षे गणराजनगर, नगर) यास ताब्यात घेतले आहे.पटारे चुलता-पुतणे मोटरसायकलवरून (एमएच १७, यू १५७५) नगरकडे येत होते. ते जेऊर टोलनाक्याजवळ आले असताना पाठीमागून आलेल्या वाळूच्या डंपरची (एमएच १६ क्यू ७२४३) मोटरसायकलला जोरात धडक बसली. पटारे चुलता-पुतणे डंपरच्या चाकाखाली चिरडले गेले. चाक डोक्यावरून गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.डंपर वाळू घेऊन नगरला येत होता. महसूल अधिकारी त्याचा पाठलाग करीत असल्याने त्यांना चुकविण्यासाठी चालक बेफाम वेगात डंपर चालवत होता, अशी माहिती समजली. या घाईत त्याने मोटरसायकलस्वारांना उडविले. एमआयडीसी ठाण्याचे उपनिरीक्षक मोहोकर, सहायक उपनिरीक्षक नवडे, हवालदार इंगळे, नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेऊन डंपर चालकास ताब्यात घेतले.

राष्ट्रवादीच्या शिबिरात खिसेकापूंनी मारला हात!
लाखाचा ऐवज लंपास
कोपरगाव, १२ जुलै/वार्ताहर

राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता शिबिरात खिसेकापूंनी अनेकांना हात दाखवत सुमारे एक लाखांची रोकड, मोबाईल संच लांबवले. पोलिसांनी दोघा खिसेकापूंना ताब्यात घेतले. चंद्रकांत ऊर्फ अमृत सामुद्रे (२८, रा. भीमनगर, देवपूर, धुळे) व तनेश ऊर्फ राम शहाइल (रा. बौद्धवाडा, शिरापूर, धुळे) अशी खिसेकापूंची नावे आहेत. ठाणेअंमलदार पठारे यांनी सांगितले की, संत जनार्दन स्वामी भक्त विकास परिसरात आज राष्ट्रवादीच्या विभागीय कार्यकारी शिबिरात नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्य़ांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने आले होते. अकोले बाजार समितीचे सभापती सुधाकर देशमुख यांचे १४ हजार रुपये, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे सहसचिव एम तामीर फारुकी यांचे ४ हजार ४०० रुपये, गोविंद भिकाजी सदगीर (रा. कोंभाळणे, अकोले) यांचे २० हजार ३०० रुपये, भास्कर शाहूराव अरगडे (संजीवनी कारखाना) यांचे ११ हजार ५०० रुपये, नितीन वसंत भोसले (कारवाडी) यांचे २ हजार २०० रुपये, कैलास भोजराज (भोजडे, कोपरगाव) यांचे ५ हजार ५०० रुपये, किशोर ब्रिजलाल झंवर (चोरगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव) यांचा मोबाईल संच, तसेच एटीएम कार्ड चालक परवाना, इतर महत्त्वाची कागदपत्रे या चोरटय़ांनी चोरली. आरोपी चंद्रकांत समुद्रे हा शिरपूर (धुळे) येथील नानामहाजन यांच्याकडे कामाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी खिसेकापूंच्या टोळीचा शोध पोलीस घेणार आहेत. अनेकांनी खिसेकापल्याच्या व मोबाईल चोरीच्या तक्रारी केल्या.

गोदडमहाराज रथमार्गाची कर्जतमध्ये दुर्दशा
कर्जत, १२ जुलै/वार्ताहर

धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील गोदडमहाराजांचा रथ यात्रोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी शहरातून लाकडी रथामधून पांडुरंगाच्या मूर्तीची प्रदक्षिणा काढण्यात येते. दोर बांधून भाविक रथ ओढतात.हा रथ ज्या प्रदक्षिणामार्गाने जाणार आहे, त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर गटारीचे खोदकाम झाल्यानंतर काही ठिकाणी मुरूम टाकण्याऐवजी माती टाकली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने या सर्व रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात चिखल झाला आहे. या चिखलामध्ये रथ फसण्याची शक्यता आहे.शहरातील रस्ते अरुंद झाले आहेत. अरुंद रस्त्यांमुळे रथ ओढताना अनेकवेळा भाविकांच्या जीवावर बेतल्याचे प्रसंग घडले आहेत. रथ व दिंडी प्रदक्षिणामार्ग चांगला असावा, याबाबत सर्वजण फक्त रथयात्रेच्या वेळी चर्चा करतात. पुन्हा मात्र कोणीच या विषयावर पुढाकार घेत नाही. प्रशासनाने अद्यापि रथमार्गाची पुरेशी तयारी सुरू केलेली दिसत नाही.

विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह पाच जणांना अटक
सोनई, १२ जुलै/वार्ताहर
इंडिका कार घेणेसाठी माहेराहून १ लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून खरवंडी (ता. नेवासे) येथील ५जणांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली.संगीता चंद्रकांत फाटके (वय ३०, खरवंडी, हल्ली करजगाव, ता. नेवासे) हिने फिर्याद दिली. ९ मे ९३ रोजी लग्न झाल्यापासून आतापर्यंत सासरी नांदत असताना पती चंद्रकांत देवराव फाटके, सासू ताराबाई देवराव फाटके, दीर ओंकार देवराव फाटके, जाऊ जयमाला ओंकार फाटके व नणंद हिराबाई भास्कर सूर्यवंशी यांनी तुला स्वयंपाक येत नाही व इंडिका कार घेणेसाठी माहेरवरून १ लाख रुपये आण, यासाठी सतत शारीरिक, मानसिक छळ करीत मारहाण केली. सहायक निरीक्षक डी. एस. डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बी. टी. जगताप यांनी फाटके कुटुंबातील ५जणांना अटक केली.

लोकसत्ता गाथा ज्ञानाची; आज पारितोषिक वितरण
नगर, १२ जुलै/प्रतिनिधी
‘लोकसत्ता गाथा ज्ञानाची’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण उद्या (सोमवारी) सकाळी ११.३० वाजता संगमनेर येथील जी. बी. डेरे इंग्लिश मीडियम शाळेत होणार आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत या स्पर्धेत संगमनेरच्या रौनक प्रशांत धाडीवाल याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले.जी. बी. डेरे इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष भानुदास डेरे व ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ व्यवस्थापक मुकुंद कानिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या पारितोषिक वितरण होईल.

लावणीच्या कार्यक्रमात गोंधळ
घालणाऱ्या मद्यपींविरुद्ध गुन्हा
नगर, १२ जुलै/प्रतिनिधी
येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात लावणीच्या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या मद्यपींविरुद्ध कोतवाली ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. सभागृहाचे व्यवस्थापक सुरेशचंद्र मुळे (रा. जे. जे. गल्ली, सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली. शनिवारी रात्री सहकार सभागृहात ‘लावण्यखणी’ हा लावणी व गीतांचा कार्यक्रम होता. दहाच्या सुमारास प्रेक्षकांतील काही मद्यपींनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आरडाओरड करून सभागृहाच्या काचाही फोडण्यात आल्या. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ज्येष्ठांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘सिनियर सिटीझन हेल्पलाईन’
नगर, १२ जुलै/प्रतिनिधी

ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी बुरुडगाव रस्त्यावरील चौरे मळा येथे सिनियर सिटीझन हेल्पलाईन सेवा संघाची स्थापना करण्यात आली. या सेवा संघाच्या अध्यक्षपदी नानाजी शेजवळ यांची निवड करण्यात आली. राज्य सरकारने १ मार्च रोजी पालक व ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ आणि कल्याण कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार या सेवा संघाची स्थापना करण्यात आली. ज्या ज्येष्ठांचा मुले सांभाळ करीत नसतील, मालमत्तेसाठी मुले, नातेवाईक त्रास देत असतील त्यांच्यासाठी सेवा संघ मदत करेल. यासंदर्भात संबंधितांनी सेवा संघाच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन शेजवळ यांनी केले.

प्रा. मकरंद खरवंडीकर यांना स्वरानंद पुरस्कार जाहीर
नगर, १२ जुलै/प्रतिनिधी

स्वरानंद प्रबोधिनीतर्फे देण्यात येणारा स्वरानंद पुरस्कार २००९ संवादिनीवादक प्रा. मकरंद खरवंडीकर यांना जाहीर झाला. युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दर वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.संगीतकार, गायक व संवादिनीवादक असलेले प्रा. खरवंडीकर हे संवादिनीच्या साथसंगतीसाठी अमेरिकेत अडीच महिने जाणार आहेत. तेथे ते २५ कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे प्रबोधिनीतर्फे सांगण्यात आले.दि. २६ जानेवारी २०१० रोजी या पुरस्काराचे वितरण होईल.