Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

नवनीत

जी व न द र्श न
शाकाहार आणि मांसाहार

 

नानकदेवांच्या चेहऱ्यावरील अद्भुत कांती पाहून अनेकांना त्यांना नम्रपणे अभिवादन करावे असेच वाटायचे. धूर्त नेत्यांच्या ध्यानी हे सगळेच आले. नानू पंडितही मनाशी म्हणाले, ‘‘हा माणूस दिसायला फार आकर्षक आहे. त्याचे वागणे-बोलणे तर कमालीचे मोहक आहे. म्हणून ज्यावर याला कमीत कमी तर्कवितर्क करता येईल अशाच विषयावर त्याच्याशी बोलले पाहिजे.’’ म्हणून त्यांनी पहिलाच प्रश्न असा विचारला, ‘‘आम्ही सर्वजण मांसाहार निषिद्ध मानतो. एक साधुपुरुष म्हणून तुमची प्रसिद्धी असताना तुम्ही मांसाहाराला अनुकूल कसे राहू शकता?’’ नानकदेव यावर शांतपणे उत्तरले, ‘‘तुम्ही सारे लोक निव्वळ शाकाहारी आहात, हे म्हणणे आपण खरे धरून चालू या. पण जगात बरेच प्राणी मांसाहारी दिसतात. आपल्या समाजातही अनेक लोक मांसाहार सर्रास करतात. वस्तुत: कोणी मांसाहार करतो म्हणजे तो फार जगावेगळे वागतो आणि एखादा करीत नसेल तर तो काही फार विशेष करतो, असे म्हणण्याचे मला तरी काही कारण दिसत नाही. अगदी आपल्या जन्मापासूनच आपला सर्वाचा मांसाशी फार निकटचा संबंध आहे. पुरुषाचे वीर्य स्त्रीच्या पोटामध्ये राहणे मांससंबद्धच आहे. स्त्रीच्या गर्भाशयात आपला आविर्भाव मांसाचा एक गोळा म्हणूनच होतो. तो गोळा आधी स्त्रीच्या मांसावरच जीवित राहतो. नंतर त्या मांसाच्या गोळ्याला सारे अवयव प्राप्त होतात. तेही मांसाचेच असतात. मांसातूनच साकार झालेले असतात. लहान मूल सर्वप्रथम आपला आहार कुठे शोधते? आपल्या आईच्या मांसल स्तनाशीच ते झटापट करते. अर्भकाचे तोंड मांसाचे. त्याची जीभही मांसाची, मांसाचा संबंध सदासर्वत्र आहे. तो तुम्ही कुठे आणि कसा टाळणार आहात? सद्गुरूकृपेने मात्र माणूस बदलू शकतो. त्याला त्याची ईश्वरसंबद्धता जाणवते आणि तो या सृष्टीकडे योग्यरीतीने पाहू शकतो.’’ ‘‘माझ्या समजुतीप्रमाणे अडाणी आणि मूर्ख माणसेच मांसाहार आणि शाकाहार यांचा वाद घालतात. जे शांतपणे विचार करू शकतात त्यांना शुद्ध शाकाहार असा असतच नाही हे समजू शकते. प्रत्येक वस्तूचा मांसाशी संबंध आहेच. आपल्या पुराणातून अनेक देवदेवताविषयक प्रसंगातून मांसाहाराचे उल्लेख येतात. जे मांसाहाराला नाके मुरडतात आणि शाकाहाराचे अवास्तव समर्थन करतात त्यांच्याकडूून हत्या होतच नाहीत, असे नाही. काही मंडळी तर माणसांना इतके दुखावतात, छळतात की त्यांना माणूस-भक्षकच म्हणायला हवे ’’
अशोक कामत

कु तू ह ल
गॅमा किरणे
गॅमा किरण कोणती महत्त्वाची खगोलशास्त्रीय माहिती पुरवतात?

गॅमा किरण म्हणजे सर्वाधिक ऊर्जा असलेली प्रारणे. या किरणांची ऊर्जा दृश्य प्रारणांपेक्षा लक्षावधी ते अब्जावधी पटींनी अधिक असते.गॅमा गिरण हे त्यांच्या तीव्र भेदनशक्तीमुळे स्रोतांच्या अंतर्भागातून बाहेर येऊ शकतात. व त्यामुळे स्रोतांच्या अंतर्भागाचा वेध घेणे शक्य होते. खगोलस्थ वस्तूंकडून येणारे गॅमा किरण पृथ्वीच्या वातावरणाबरोबर होणाऱ्या क्रियांमुळे वातावरणातच शोषले जातात. त्यामुळे या प्रारणांचा अभ्यास मुख्यत: उपग्रहांवरील शोधकांच्या साहाय्याने केला जातो. गेल्या पन्नास वर्षांत गॅमा किरणांचा वेध घेण्यासाठी अनेक उपग्रह सोडण्यात आले असून, यापैकी ‘कॉम्प्टन’ या गेल्या दशकातील आणि ‘फर्मी’ या आता अंतराळात फिरत असलेल्या दुर्बिणींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यापैकी कॉम्प्टन दुर्बिणीने जवळपास ३०० गॅमा किरणांच्या स्रोतांचा शोध लावला. या स्रोतांमध्ये मुख्यत: सक्रिय केंद्रे असलेल्या दीर्घिका, स्पन्दके यांचा समावेश होतो. याखेरीज या उपग्रहाने सुमारे दोन हजार ५०० गॅमा किरणांचे प्रस्फोटही टिपले आहेत. जास्त ऊर्जा असलेल्या गॅमा किरणांच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी असल्याने उपग्रहांच्या साहाय्यानेही त्यांचा वेध घेणे कठीण असते. मात्र या किरणांचा वेध जमिनीवरून घेता येतो. वातावरणात हे किरण शिरल्यावर होणाऱ्या क्रियांमुळे, मंद अशा निळसर रंगाच्या ‘चेरेन्कॉव्ह’ प्रकाशाचे उत्सर्जन होते. या प्रकाशाच्या पृथ्वीवरील दुर्बिणींनी केलेल्या मापनातून गॅमा किरणांचा अप्रत्यक्षरीतीने वेध घेतला जातो. या तत्त्वावर आधारलेल्या जगभरच्या व्हिपल, हेस, मॅजिक यासारख्या अनेक दुर्बिणींनी आतापर्यंत सुमारे ८० गॅमा किरणांच्या स्रोतांचा शोध लावला असून यात प्रामुख्याने दीर्घिकांची सक्रिय केंद्रे, अतिनवताऱ्यांचे अवशेष इत्यादींचा समावेश होतो. या गॅमा किरणांचा वैश्विक किरणांशी जवळचा संबंध असल्यामुळे या अभ्यासातून वैश्विक किरणांच्या उगमाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. ल्ल वर्षां चिटणीस
शुक्रवारी(दि. १०) प्रसिद्ध झालेल्या उत्तरामध्ये ‘अतिनील किरणांची तरंगलांबी दृश्य प्रकाशलहरींच्या तरंगलांबीपेक्षा अधिक असते’ असे म्हटले होते. परंतु प्रत्यक्षात ती ‘कमी असते’.
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
लक्ष्मणराव कोमुर्राजु

तेलगू समाजात साहित्य, समाजकार्य, राष्ट्रप्रेम आदी बाबतीत नवचैतन्य निर्माण केले लक्ष्मणराव कोमर्राजु यांनी. त्यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले. तेलगू असूनही मराठी, हिंदी, संस्कृत या भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले. देशाचा इतिहास, महापुरुषांच्या चरित्राबरोबर समाजसेवा, राजकारण, विज्ञानात झालेली प्रगती आदींचा परिचय त्यांनी आपल्या ग्रंथातून देऊन आंध्र जनतेत देशाभिमान फुलवला. ‘हिंदूमहापुत्रम’, ‘महम्मदीय महापुत्रम’, ‘छत्रपती शिवराय’, ‘पाश्चात्य विज्ञान’ या त्यांच्या ग्रंथांची निर्मिती ‘विज्ञान चंद्रिका’ या ग्रंथमालेतूनच झाली. आंध्रच्या प्राचीन गौरवशाली विसर पडलेल्या इतिहासाला उजाळा देऊन त्यांच्यात चैतन्य निर्माण केले. आंध्र विज्ञान सारस्वम तेलगू शब्दकोशासाठी त्यांनी आपला देह चंदनासारखा झिजवला. ‘श्रीकृष्ण देवराय आंध्र भाषा निलयम’ ही संस्था स्थापून परकीय भाषेच्या आहारी चाललेल्या तेलगू समाजाला वाचवण्याचे कार्य केले. आंध्र आणि मद्रास यांच्यात त्या काळातही वाद होतेच. हे वाद मिटवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. खेडय़ापाडय़ात प्रसंगी पायी फिरून हस्तलिखिते गोळा करून डोक्यावर वाहिली. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी १३ जुलै १९२३ रोजी त्यांचा देह पंचतत्त्वात विलीन झाला.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
गुणी गार्गी

जलद तालाची सीडी लावून आरशासमोर उभे राहून नृत्य करण्यात गार्गी दंग होती. आई तिच्याकडच्या किल्लीने लॅच उघडून कधी आत आली तिला कळलेच नाही. अचानक समोरच्या आरशात तिला त्रस्त आणि संतापी चेहऱ्याने उभी असलेली आई दिसली. नृत्य थांबवून ती मागे वळली. तोपर्यंत आई कडाडली. ‘‘घरात आल्याआल्या काय ही कटकट. धिंगाणा चाललाय. जरा शांतता नाही. तो सीडी प्लेअर बंद कर बघू आधी.’’ गार्गीने नातचाना डोक्यावर घेतलेली ओढणी खुर्चीवर ठेवली. मधाळ स्वरात ती म्हणाली, ‘आई, सॉरी.’ तिने सीडी बंद केला.
एवढय़ाने आईची चिडचिड संपली नाही. ती पुन्हा तणतणली, ‘‘गार्गी, अभ्यास नसशीलच केला. परीक्षा जवळ आलीय ना? मग अभ्यास करायची इच्छा अजून होत नाही? नाचून आणि गाणी ऐकून परीक्षेत पास होता येत नाही.’’ गार्गी काही बोलली नाही. टेबलाशी जाऊन पेन, पुस्तक उघडून पुढय़ात वही घेऊन अभ्यास करायला लागली. ती म्हणाली, ‘‘आई, मी एकदा वाचले की लक्षात राहते माझ्या. चांगले मार्क मिळतील मला. अभ्यास पूर्ण करून गार्गीने आईसाठी कॉफी तयार केली. वाफाळलेला कॉफीचा कप घेऊन ती टेबलाशी टिपणे काढत बसलेल्या आईजवळ आली. तिच्यासमोर तीन-चार ढब्बी पुस्तके होती. हळूच कॉफीचा कप टेबलावर ठेवून तिने आईच्या गळ्यात हात अडकवले. आई, कॉफी घे. खूप थकलेली दिसतेस. ऑफिसमध्ये आज काही घडलं का गं? रोजच्यासारखी आनंदात नाहीस तू. चल आपण पार्कमध्ये जाऊया आणि आईस्क्रीम खाऊया. उत्साहाने गार्गी म्हणाली. आईने समोरचे काम बाजूला सारले. आपल्या गुणी लेकीची माया आणि समजूतदारपणा पाहून तिचे हृदय भरून आले. ती उठली. केस सारखे करून तिने साडी नीट केली. पायात चपला सरकवल्या. गार्गीचा हात हातात धरून ती म्हणाली, ‘चल राणी, छान कल्पना आहे तुझी आईस्क्रीम खाण्याची’. हातात हात घालून त्या मायलेकी बागेकडे निघाल्या.
आई-वडिलांनाही त्यांच्या अडचणी असतात. ऑफिसमध्ये काही घडते आणि आईच्या मनावर ताण येतो. बाबांना आर्थिक विवंचना असते. व्यवसायातल्या अडचणी असतात. कधी त्यांच्यात एकमेकांत तणाव निर्माण होतात. तुम्हाला परीक्षेचा ताण, मित्र-मैत्रिणींशी झालेली भांडणे अशा समस्या असतात. त्यातून एकमेकांशी विसंवाद होतो. शब्दाने शब्द वाढतो. तुम्ही आई-बाबांच्या अडचणी, समस्या यात कधी रस घेता का? त्यांच्या सुख-दु:खाचा विचार करता का? करा आणि पाहा किती फरक पडतो तुमच्या संबंधात.
संकल्प : आई-वडिलांनी मला समजून घेण्याआधी मी त्यांना समजून घेईन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com