Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

शून्य भारनियमनाच्या प्रयत्नात ‘व्हीआयए’चाच कोलदांडा!
संदीप देशपांडे, नागपूर, १२ जुलै

विदर्भातील दोन शहरांच्या भारनियमनमुक्ततेसाठी पुढाकार घेणाऱ्या विदर्भ उद्योग संघटनेनेच (व्हीआयए) आता ऐन वेळेवर महावितरणच्या प्रस्तावाला कोलदांडा घातल्याने वीज ग्राहकांचे स्वप्न पुन्हा भंगण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

वाडीत सापडल्या कारमध्ये ५५ लाखांच्या नोटा
पोलीस दल थक्क
प्रकरण आयकर खात्याकडे
नागपूर, १२ जुलै / प्रतिनिधी
थोडीथोडके नव्हे तर, तब्बल ५५ लाख रुपयांच्या नोटा पाहून वाडी पोलीस रविवारी सकाळी थक्क झाले. उपस्थितांनी यावेळी स्वत:ला चिमटाही काढून बघितला.
खुद्द वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक दिनेश झामरे यांच्या नेतृत्वाखालील वाडी पोलीस शनिवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजताच्या सुमारास अमरावती मार्गावर वाडी येथे लोखंडी कठडे लावून वाहनांची तपासणी करीत होते.

दुभत्या गाईच्या लाथा गोड!
चंद्रकांत ढाकुलकर

प्रश्नणपणाने जगण्याच्या वाटा तुडवणारी माणसे आणि संस्थाही मिळालेल्या संधीचे सोने करीत पुढेच पुढे जात असतात. संधी ही पाऱ्यासारखी असते. ती केव्हा हातातून निसटून जाईल, याचा नेम नसतो, याची त्यांना जाणीव असते पण, विनासायास काही मिळू लागले की, त्याचे मोलही नसते. तसेच काहीसे नागपूर शहराने दिलेल्या शहर बससेवेच्या संधीचे स्टार बसने केलेले आहे.

आपती व्यवस्थापनाच्या उपाययोजना कागदावरच
नागपूर, १२ जुलै/प्रतिनिधी

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपातकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी शासनातर्फे करण्यात येणाऱ्या आपती व्यवस्थापनाच्या उपाययोजना कागदोपत्रीच राहिल्याचे शनिवारी भंडारा जिल्ह्य़ात घडलेल्या घटनेने दिसून आले. या घटनेनंतर रविवारी सकाळी नागपूर आणि रामटेक येथून दोन मोटर बोट घटनास्थळी पाठवण्यात आल्या. मात्र, ही मदत वेळीच पोहचली असती, तर अनेकांचे प्रश्नण वाचविता आले असते, असे बोलल्या जात आहे.

निवासी डॉक्टरांवरील कारवाई अन्यायकारक -डॉ. वसंत शेणॉय
नागपूर, १२ जुलै/ प्रतिनिधी
संपावर गेलेल्या राज्यभरातील निवासी डॉक्टरांवर शासनाने केलेली निलंबनाची कारवाई अन्यायकारक असल्याचे मत डॉ. वसंत शेणॉय यांनी व्यक्त केले आहे. राज्यशासनाने संपावर तात्काळ तोडगा काढला नाही तर डॉक्टरांच्या इतर संघटनाही यात सहभागी होतील, असा इशारा त्यांनी दिला.

समलैंगिकतेवर अंकुश घालण्याची मागणी
नागपूर १२ जुलै/ प्रतिनिधी

अनैतिक संबंधांना खतपाणी घालणारा समलैंगिकतेवर अंकुश घालण्याची मागणी ‘स्टुडंटस् इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’तर्फे (एसआयओ) करण्यात आली. उच्च न्यायालयाने समलिंगी संबंधांचे समर्थन करणारा निर्णय नुकताच दिला. त्या विरोधात एसआयओने झाशी राणी चौकात धरणे दिली. त्यांच्या मते, समलैंगिकता बळावल्यास एडस्च्या विरोधातील सर्व प्रयत्न विफल होतील. न्यायालयाच्या निर्णयामुळे समाज आणि देशामुळे नवीन संकटे उभी राहतील. तसेच निर्णयाचा युवक व विद्यार्थ्यांवर दुष्परिणाम होईल, सामाजिक व कौटुंबिक व्यवस्था नष्ट होईल आणि समाजातील मानवाधिकारांचे हनन होईल, असे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ऑरेंज सिटी रुग्णालयात
‘पीजीडीएचएचएम’ मध्ये प्रवेश सुरू

ऑरेंज सिटी रुग्णालय आणि संशोधन संस्थेत ‘पोस्ट ग्रॅज्युएट इन हॉस्पिटल अ‍ॅण्ड हेल्थ केअर मॅनेजमेंट’ (पीजीडीएचएचएम) हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाची ही दुसरी बॅच आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची मान्यता असलेला हा अभ्यासक्रम एका वर्षाचा आहे. इंजिनिअरींग, विज्ञान, मेडिकल सायन्स, फार्मासिस्ट, एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, जीएनएमची पदवी असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. ऑरेंज सिटी रुग्णालय आणि संशोधन संस्थेच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात येतात. त्यात एनबीईशी संलग्न असलेला डीएनबी (फॅमिली मेडिसीन), कोलकाता येथील आयसीएमसीएच संलग्न सी.एच. अ‍ॅण्ड डिप्लोमा जी.ओ., वायसीएमओयु नाशिक संलग्न पेशंट असिस्टंट आणि स्वत: संचालित करत असलेले ऑपरेशन थिएटर टेक्निकल असिस्टंट, सीफोरएम आणि सीसीएन या अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वच सोयी येथे पुरवण्यात येतात. अधिक माहितीसाठी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. नरुल अमिन (९८२२८०२७७७) यांच्याशी संपर्क साधावा.

ज्वारीच्या बियाण्यांसह मिश्र खतांची तीव्र टंचाई
नागपूर, १२ जुलै/ प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्य़ात ज्वारी बियाण्यांची व मिश्रखतांची तीव्र टंचाई असून ऐन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांची बियाणे व खताची जुळवाजुळव करण्यासाठी दमछाक होत आहे.
अलीकडे ज्वारीचा पेरा कमी झाला तरी काही शेतकरी आजही ज्वारीचे पीक घेतात. पिकांपासून कडबा मिळत असल्याने गुरांच्या चाऱ्याच्या प्रश्न मिटतो. यासाठी शेतकरी कमी प्रमाणात का होईना ज्वारीची पेरणी करतो. अलीकडे ज्वारीच्या ९ नंबर बियाण्यांची जास्त चलन आहे. परंतु बाजारात ९ नंबरची ज्वारीची थैली मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सावनेर भागात ९ नंबरच्या ज्वारीची बियाणे व १८-१८-१० या मिश्रखताची तीव्र टंचाई आहे. अशी येथील शेतकऱ्यांची तक्रार आहे. काही दुकानदारांकडे १८-१८-१० या मिश्रखताचा साठा आहे. परंतु शेतकऱ्यांनी मागणी केल्यास माल नसल्याचे सांगण्यात येते, अशी ही शेतकऱ्यांची तक्रार आहे. दरम्यान नागपूर जिल्ह्य़ात सध्या युरिया १०.७७१ मे.टन, डीएपी २८.३५६ मे. टन, एसएसपी १३.५९० मे.टन, एमओपी १३०९ मे.टन. १८-१८-१० मिश्रखत ५२४८ मे.टन. संयुक्त खत १४,१५१ मे.टन असे एकूण ७३.३४० मे.टन रासायनिक खत उपलब्ध असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उ.मो. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र निमखेडा शाखेतर्फे शेतकरी मेळावा
नागपूर, १२ जुलै/प्रतिनिधी

बँक ऑफ महाराष्ट्र निमखेडा (तारसा) शाखेतर्फे निमखेडा येथे नुकताच शेतकरी मेळावा पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी निमखेडाचे सरपंच सुरेश हर्राम व प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विभागीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक अभय पानबुडे उपस्थित होते. याप्रसंगी शाखा व्यवस्थापक दिलीप मौंदेकर यांनी शाखेच्या कार्याबद्दल विस्तृत माहिती दिली व उपस्थित शेतकऱ्यांना पीक कर्ज घेऊन अधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. सरपंच सुरेश हर्राम यांनी, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले व एटीएम आणि लॉकरची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी केली. अभय पानबुडे यांनी शेतकऱ्यांच्या विविध तक्रारीचे निवारण केले. अरुण केळझरे यांनी, वर्ष २००७-०८ मध्ये शाखेने उत्कृष्ट कार्य केल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील ट्राफी शाखेला प्रश्नप्त करून देण्यात सर्व कर्मचारी व ग्राहकांचे योगदान असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन गणवीर यांनी केले. अरुण केळझरे यांनी आभार मानले.

बनावट स्वाक्षरी करून फसवणूक
नागपूर, १२ जुलै/ प्रतिनिधी

बनावट स्वाक्षऱ्या करून तसेच औषधे विकून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी रामदासपेठेतील डायग्नोस्टिक कंपनीच्या एका व्यवस्थापकाविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुंदरम जमनाप्रसाद ओझा (रा. इरोज सोसायटी रा. गोरेवाडा) हे आरोपीचे नाव आहे. आरोपीने नोकरीत असताना धनादेश चोरून त्यावर बनावटी स्वाक्षऱ्या करीत रक्कम हडपली तसेच औषधे परस्पर विकून ९ लाख ५० हजार रुपयांनी कंपनीची फसवणूक केल्याची तक्रार कंपनीच्या अधिकारी प्रीती महेश सावरकर (रा. रामदासपेठ) सीताबर्डी पोलीस ठाण्यात केली़

कर्तव्यभावनेतूनच कामे -खासदार दत्ता मेघे
नागपूर,१२ जुलै/प्रतिनिधी

संपूर्ण आयुष्य समाजाच्या हितासाठी घालविण्याचा संकल्प असून, आजपर्यंत जी कामे केलीत ती कर्तव्यभावनेतून केली, असे प्रतिपादन खासदार दत्ता मेघे यांनी केले. विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्या विदर्भातील १४ अध्यक्षांतर्फे खासदार दत्ता मेघे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. खासदार मेघे यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारसमोर काही मागण्या मांडल्या आहेत. कर्जमाफीची मुदत ३० जून २०१० पर्यंत वाढवावी, कर्जमाफीची रक्कम २० हजार रुपयांवरून ५० हजार रुपयापर्यंत करावी, कर्जमाफी योजनेअंतर्गत माफीवरील जे कर्ज आहे, ते भरण्याची सक्ती न करता, येणाऱ्या हंगामासाठी नव्या पीक कर्जाची त्वरित व्यवस्था करावी आणि पाच एकराची अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी आदी मागण्यांचा यात समावेश आहे. सत्कार कार्यक्रमाला विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

राजकीय कार्यक्रमासाठी मठाच्या वापरास विरोध
कुही, १२ जुलै / वार्ताहर
येथील ऋख्खडाश्रम मठ या धार्मिक स्थळाचा राजकीय कार्यक्रमासाठी उपयोग करण्यात येत असल्यामुळे ऋख्खडांचे हजारो शिष्य, भाविक संतप्त झाले आहेत. जिल्हा परिषद सदस्य आनंद खडस, ग्रामपंचायत सदस्य भाऊराव लेंडे, रमेश रेहपाडे, देवाजी ठवकर, सु.य. भगत, लखनसिंग चौहाण, रेखा येळणे, गीता मस्के, ग्रामपंचायत सदस्य विवेक खराबे यांनी अध्यक्षाची भेट घेऊन याविरोधात निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, आश्रमातील देवळे, ऋख्खड महाराजांची गादी व समाधी भाविकांसाठी भक्तीचे, विश्वासाचे पवित्र स्थळ आहे. गेल्या २९ जून ०९ रोजी केंद्रिय मंत्री मुकुल वासनिक यांचा अभिनंदन सोहोळा आश्रमाच्या सभागृहात झाला. ‘चपला-जोडे मुख्य गेटच्या बाहेर ठेवावे’ हा आश्रमाचा लिखित नियम सर्रास तोडल्या गेला. शिवसेना-भाजप युतीच्या सभेसाठी आश्रमाबाहेरील पटांगणाची जागा दिली गेली नाही. मग नियम असताना काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी सभागृह कसे काय देण्यात आले? असा संतप्त सवाल निवेदनातून करण्यात आला आहे.

धूम्रपानाच्या दुष्परिणामांवरील ‘रद्दे खुमार’चे प्रकाशन
नागपूर, १२ जुलै / प्रतिनिधी

उर्दू लेखकांच्या रचनांवर आधारित धूम्रपानाचे दुष्परिणामांवरील ‘रद्दे खुमार’ या पुस्तकाचे प्रकाशन पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते झाले. आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य (पदार्थ) सेवन विरोधी दिनाच्या निमित्ताने मोमिनपुऱ्याच्या युनाईटेड स्टुडंट असोसिएशनतर्फे मादकद्रव्य सेवन विरोधी अभियान राबवण्यात आले. ज्यामध्ये धूम्रपानाबाबत माहिती देण्यात आली. दीक्षित यांनी भाषणात संस्थेच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी मुबारक कापडी, सिद्दिक अली खान पटेल, मोहंमद जफर हयात, मास्टर मोहंमद सईद, हाजी मुश्ताक अहमद किदवाई आदी प्रश्नमुख्याने उपस्थित होते. फजलुर्रहमान कुरैशी, कमल अंसारी, अबुल आस, रेहान नासिर, जुनेद कुरैशी आणि मोहंमद असलम यांचे यावेळी सहकार्य लाभले. संचालन कलीम अहमद यांनी केले आणि संस्थेचे अध्यक्ष जावेद अहमद अंसारी यांनी आभार मानले.

डॉ. चिमोटे यांचे युरोपियन परिषदेत व्याख्यान
नागपूर, १२ जुलै / प्रतिनिधी

‘वंशधारा टेस्टटय़ूब बेबी सेंटर’चे संचालक, भ्रूणशास्त्र तज्ज्ञ डॉ. नटचंद्र चिमोटे व डॉ. मीना चिमोटे अ‍ॅमस्टरडॅम (हॉलंड) येथे नुकत्याच पार पडलेल्या युरोपियन सोसायटी फॉर ह्य़ुमन रिप्रश्नॅडक्शन अ‍ॅण्ड एंब्रियालॉजीच्या (एश्रे) परिषदेत सहभागी झाले होते. जगातील ११० देशातील साडेसात हजाराहून अधिक डॉक्टर्स व शास्त्रज्ञ उपस्थित असलेल्या या युरोपियन परिषदेत डॉ. नटचंद्र चिमोटे यांनी ‘शॉर्ट फॉलिक्युलर फेज इन आय.यू.आय. ट्रीटमेंट विथ लेट्रॅझॉल’ या विषयावर व्याख्यान दिले. या व्याख्यानाचे सर्वच उपस्थितांनी स्वागत केले. डॉ. चिमोटे यांना अशाप्रकारचे व्याख्यान देण्याचा दुर्मिळ सन्मान लागोपाठ तीन वर्षे प्रश्नप्त झाला. एश्रेचे अध्यक्ष डॉ. हॅवर्स, ह्य़ुमन रिप्रश्नॅडक्शनचे मुख्य संपादक डॉ. आंद्रे स्ट्रीटहोम, डॉ. पॉल डेवरॉय, डॉ. डीट्रीच, डॉ. अ‍ॅडम बलेन, डॉ. मार्को फिलीकोरी, डॉ. फ्लेमिंग यासह अनेक डॉक्टरांनी डॉ. चिमोटे दाम्पत्यांची त्यांनी केलेल्या संशोधनबद्दल प्रशंसा केली. भारतातून सुमारे दोनशे डॉक्टर्स या परिषदेला उपस्थित होते.

सी. पी. अ‍ॅन्ड बेरार शिक्षण संस्थेचा सुवर्ण महोत्सव
नागपूर, १२ जुलै/प्रतिनिधी
सी. पी. अ‍ॅन्ड बेरार शिक्षण संस्थेच्या रविनगर शाखेला ५० वष्रे पूर्ण झाल्यानिमित्त १ जुलैला सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त सी.पी. अ‍ॅन्ड बेरार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने शाळेचा परिसर स्वच्छ केला. सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून १९६० साली रुजू झालेले माजी शिक्षक नीळकंठ पाटणे यांना आमंत्रित करण्यात आले होते. पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याध्यापक भाके व पर्यवेक्षक मोर्चापुरे, पारखी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक दिवं. गं.स. गोखले व दिवं. मा.ना. कागभट यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नीळकंठ पाटणे यांनी ५० वर्षाच्या गतस्मृतींना उजाळा दिला. उपमुख्याध्यापक भाके यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांशी हितगुज केले

शिवसेनेचा आज मेळावा
नागपूर, १२ जुलै/ प्रतिनिधी

शिवसेनेच्या शहर शाखेतर्फे आज कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यात आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात येणार आहे. रेशीमबाग चौकातील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या मेळाव्यात शिवसेना नेते लीलाधर डाके, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई आणि पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना सूचना देणे, संघटनात्मक बाबींवर चर्चा आदी विषय मेळाव्याच्या विषय पत्रिकेवर आहेत. मेळाव्यास पदाधिकारी, शाखा व गट प्रमुख, नगरसेवक, माजी पदाधिकारी तसेच महिला आघाडी, विद्यार्थी सेना, कामगार सेना, लेखाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी केले आहे.

प्रभावती केदार यांचे निधन
नागपूर, १२ जुलै / प्रतिनिधी

राजाबक्षा ले-आऊट, मेडिकल चौक परिसरातील प्रभावती नीळकंठ केदार यांचे रविवारला अल्प आजाराने निधन झाले. त्या ७६ वर्षाच्या होत्या. त्या महाराष्ट्र बारी सेवा संघ, नागपूर पान व्यापारी असोसिएशन व बारी समाज नागपूरचे अध्यक्ष अजय केदार यांच्या मातोश्री होत. मोक्षधाम स्मशानभूमीवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन मुली व बराच आप्तपरिवार आहे.