Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

तूरडाळ नव्वद रुपयांवर; कडधान्येही कडाडली
सुभाष किवडे, पुणे ११ जुलै

पावसाला झालेल्या विलंबामुळे कडधान्य उत्पादनाबाबत निर्माण झालेले प्रश्नचिन्ह याबरोबरच संपत आलेला जुना साठा आणि आयाती कडधान्येही महागल्याने डाळी आणि कडधान्याचे भाव गगनाला भिडले आहेत. तूरडाळीच्या भावाने भाववाढीचे सर्व उच्चांक मोडले असून ८० ते ९० रुपये किलो या दराने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची हेवा करण्याची वेळ आली आहे. हीच परिस्थिती थोडय़ाफार प्रमाणात इतर डाळींचीही आहे. यामुळे डाळी, कडधान्यांचे भाव सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.

टँकरवर जीप धडकून लोणावळ्याजवळ पाच ठार
वडगाव मावळ, १२ जुलै/ वार्ताहर
चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने तवेरा गाडी दूध टँकरला धडकून झालेल्या भीषण अपघातात पाचजण ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात पुणे-मुंबई महामार्गावर कामशेतजवळ पाथरगाव खिंडीच्या उतारावर आज सायंकाळी पाचच्या सुमारास झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण पिंपरी परिसरातील आहेत. मृतांमध्ये तीन तरुण व दोन युवतींचा समावेश आहे. हे सर्वजण लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेले होते.

टेम्पो-ट्रक अपघातात चाकणजवळ तीन ठार
चाकण, १२ जुलै / वार्ताहर

लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाचा टेम्पो गॅसच्या ट्रकवर आदळून झालेल्या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले, तर वीस जण जखमी झाल्याची घटना आज (दि. १२) पहाटे दोनच्या सुमारास रासे (ता. खेड) जवळ घडली. या अपघातात लक्ष्मण सखाराम गायकवाड, निखील शिवाजी म्हस्के व हौसाबाई सोपान खरात (सर्व रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी, पुणे) हे तिघे ठार झाले.

आंतरजातीय विवाह अनुदान योजनेला अत्यल्प प्रतिसाद
विजयकुमार मस्के, पुणे, ८ जुलै

समाजकल्याण खात्यातर्फे राबविल्या जाणाऱ्या आंतरजातीय विवाह योजनेला पुणे जिल्ह्य़ातील तरुण-तरुणींकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असून गेल्या संपूर्ण वर्षभरात आंतरजातीय विवाहाचे अनुदान घेण्यासाठी केवळ सत्तावन्न जोडप्यांनीच अर्ज केले आहेत. गेल्या आठ वर्षात ही संख्या निम्म्याहून कमी झाली आहे.

लोणावळ्यात पर्यटकांची वर्षाविहारासाठी गर्दी
लोणावळा, १२ जुलै / वार्ताहर

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या लोणावळा-खंडाळा परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात वर्षाविहाराचा आनंद लुटण्याकरिता मुंबई-पुणे परिसरातून आज लाखो पर्यटक दाखल झाले आहेत. लोणावळा परिसरात शुक्रवार संध्याकाळपासून पाऊस पडण्यास जोरदार सुरुवात झाल्याची वार्ता कळताच येथील आकर्षण असणाऱ्या भुशी धरण व डोंगरदऱ्यातून वाहणारे धबधबे यांचा आनंद लुटण्याकरिता पर्यटकांनी एकच गर्दी केली होती.

सोसायटीतील पाण्याच्या टाकीतून पाणीचोरीचे प्रकार वाढले
पुणे १२ जुलै / विशेष प्रतिनिधी

पुण्यातील पाणीटंचाईचा फटका आता चांगलाच बसू लागला असून पाण्याची चोरी होण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत. काही सोसायटय़ांच्या टाक्यांमधील पाणी चोरण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. पुण्यातील एका बंगल्यांच्या सोसायटीतील एका बंगल्यातील गच्चीवर असलेल्या पाण्याच्या टाकीत बंगल्याच्या मागून पाईप सोडल्याचे आढळून आले. ही घटना रात्री घडली आणि टाकीतील बरेचसे पाणी कमी झाल्याचे दुसऱ्या दिवशी घरमालकाच्या लक्षात आले. दुसऱ्या एका घटनेत एका बंगल्यातील बागेत असलेल्या नळाला बाहेरून कोणीतरी नळी लावल्याचे आढळून आले.
अशा घटना पुण्यात होऊ लागल्या असून त्यामुळे पाण्याच्या टंचाईने किती गंभीर स्वरूप धारण केले आहे, हे दिसून येते.

शुल्कवाढीच्या विरोधात ‘भाजयुमो’चे आंदोलन
पुणे, १२ जुलै/खास प्रतिनिधी
खासगी विनाअनुदानित शाळांमधील शुल्कवाढीच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाने मोहीम सुरू केली असून आज कर्नाटक हायस्कूलमध्ये आंदोलन करण्यात आले. मोर्चाचे अध्यक्ष नगरसेवक मुरलीधर मोहोळ, सरचिटणीस गणेश घोष, राहुल कोकाटे, जितेंद्र पोळेकर, योगेश बाचाळ, विशाल गांधीले, प्रमोद कोंढरे, नामदेव माळवदे, गणेश वर्पे, महेश गोखले, शैलेश देशपांडे आदी या वेळी उपस्थित होते. शहरातील अन्य इंग्रजी माध्यम शाळांमध्येही शुल्कवाढीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला.

कैलाससिंह परदेशी यांचे निधन
पुणे, १२ जुलै/प्रतिनिधी

राजपूत समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कैलाससिंह फत्तेसिंह परदेशी (वय ९५) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. राजपूत सभा व स्टेशनरी कटलरी जनरल र्मचट असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुणसिंह परदेशी यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे भाऊ, तीन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे.

ट्रक अपघातात मुलगा ठार; संतप्त जमावाकडून तोडफोड
पिंपरी, १२ जुलै / प्रतिनिधी
निगडी येथील ओटा स्किम वसाहतीजवळ आज दुपारी एका ट्रकने दुचाकी चालकाला चिरडल्याने संतप्त जमावाने ट्रकवर जोरदार दगडफेक क रून काचा फोडल्या. पोलीस कुमक वेळेत आल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात ठार झालेल्याचे मुलाचे नाव स्वप्नील चंद्रकांत सकट (वय १८,रा. इंदिरा नगर, ओटा स्किम, निगडी) आहे. तो आपल्या दुचाकीवर त्रिवेणीनगर येथून निगडीच्या दिशेने निघाला होता. त्याच वेळी समोरून भक्ती-शक्ती चौक येथून त्रिवेणीनगरकडे जाणाऱ्या ट्रकचा त्याला धक्का लागला. तो ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाला.

‘दिलासा’चे मूक आक्रंदन आंदोलन
पिंपरी १२ जुलै/ प्रतिनिधी
दिल्ली उच्च न्यायालयाने समलिंगी संबंधाबाबत दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ‘दिलासा’ या संस्थेने आज येथे मूक आकं्रदन आंदोलन केले. थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आंदोलनास सुरवात करण्यात आली. ‘एड्स समस्येचे काय’असा मूक सवाल करणाऱ्या पटय़ा तोंडांना चिकटवून दिलासा संस्थेचे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर एक तास मूक आंदोलन केले. या विषयी जनजागृती करणाऱ्या पत्रकांचे वाटप करण्यात आले. दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, सचिव भाऊसाहेब गायकवाड, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, प्रकाश घोरपडे,अरुण परदेशी,पंकज पाटील, वैशाली चौधरी, अनिल पालकर, शामराव साळुंखे, रघुवीर केंची, जोशी, राजाराम लोंढे, नारायण बढेकर,उमेश पाठक, सुहास चव्हाण, अनिल नवले, पर्षद पालकर, देवता घोरपडे आदींनी सहभाग घेतला.

अध्यापक सभेची राष्ट्रीय सभा ऑक्टोबरमध्ये दिल्लीत
पुणे, १२ जुलै/प्रतिनिधी
बालवाडी ते उच्चशिक्षण संपूर्ण फी विना, समान व गुणवत्तापूर्ण मिळाले पाहिजे. या मागणीसाठी अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेची राष्ट्रीय सभा ऑक्टोबरमध्ये दिल्ली येथे होणार आहे.
अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे जयु नाना ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत या बाबत माहिती दिली. अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या पदाधिकाऱ्यांची सभा आज पार पडली. या ठरावातील मागण्या २५ ऑक्टोबरला दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय सभेत मांडण्यात येणार आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले. तसेच या सभेला देशभरातून सुमारे दोन हजार शिक्षण उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सभेच्या महासचिव विशाखा खैरे, उपाध्यक्ष मधुकर निरफराके उपस्थित होते.

टेम्पो उलटून एक ठार, दोन जखमी
लोणावळा, १२ जुलै/वार्ताहर
जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने मुंबईकडे एक हजार कोंबडय़ा घेऊन जाणारा पिक-अप टेम्पो (क्र. एम. एच. १५ बी. जे. ६९३१) चालकाचा ताबा सुटून द्रुतगती महामार्गावर उलटून क्लीनर वसीम सलीम शेख (वय २२ रा. दौलतनगर बोरिवली मुंबई) यांचा मृत्यू झाला. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास राजमाची पॉइर्ंटजवळ हा अपघात झाला. अपघातात टेम्पो चालक अमीर लियाकत मोमीन (वय २२, रा. लिंकरोड कांदिवली, मुंबई) व क्लीनर महंमद जाकिर उल्का (वय २६, रा. दौलतनगर, बोरिवली मुंबई) हे जखमी झाले आहेत.

माजी मुख्याध्यापिका सुभद्राबाई वाघ यांचे निधन
हडपसर, १२ जुलै/वार्ताहर

महापालिकेच्या शाळेत ३३ वषार्ंहून अधिक काळ ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती सुभद्राबाई देवराम वाघ (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. महापालिकेच्या शाळा क्रमांक ९ (रविवार पेठ), शाळा क्रमांक २१ (नाना पेठ), शाळा क्रमांक २६ (गणेश पेठ), शाळा क्रमांक ३६ (नाना पेठ) व शाळा क्रमांक ४५ (हडपसर येथील मुलींची सानेगुरुजी प्रश्नथमिक (विद्यामंदिर) इ. ठिकाणी ३३ वर्षे ज्ञानदानाचे कार्य सुभद्राबाई वाघ यांनी केले. नानापेठ, रविवार पेठ, गणेश पेठ हडपसर इ. ठिकाणच्या गोर-गरीब, भटक्या विमुक्त, मागासवर्गीय मुला-मुलींच्या घरी प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थ्यांना त्यांनी प्रश्नेत्साहित करण्याचे मोलाचे कार्य केले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार असून त्या महापालिकेच्या अभियंता संघाचे उपाध्यक्ष नरेंद्र वाघ यांच्या मातु:श्री होत.

मराठी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम
पुणे, ११ जुलै/प्रतिनिधी
भारतीय विद्या भवनच्या डॉ. नानासाहेब परुळेकर पत्रकारिता जनसंज्ञापन व व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे मराठी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधरांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार असून सायंकाळी ६.३० ते ८.३० अशी या अभ्यासक्रमाची वेळ आहे. येत्या १ ऑगस्टपासून अभ्यासक्रमास सुरुवात होत असून प्रवेश देण्याचे काम सुरू आहे.

गुरुपौणिमेनिमित्त पारंपरिक गुरूपूजन
पुणे, १२ जुलै/प्रतिनिधी

नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी गुरुपौणिमेनिमित्त पंडित नंदकिशोर कपोते यांचे पारंपरिक पद्धतीने गुरूपूजन केले. या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वत: नृत्यरचना तयार करून गुरूदक्षिणेच्या स्वरुपात गुरू नंदकिशोर कपोते यांच्या समोर सादर केल्या. त्यात निकिता कपोते हिने एकल नृत्य, तन्वी कपोते हिने समूह नृत्य रचना सादर करून रसिकांची दाद मिळविली. मिलिंद घरडे, भागवत भोसले, काश्मिरा बेहरे, सई खंडाळे यांनीही विविध नृत्याविष्कार सादर केले. या वेळी पंडित नंदकिशोर कपोते यांनी कथक नृत्य व त्यातील द्रौपती वस्त्रहरण, जुगलबंदी प्रकार सादर केले. त्यांना संतोष साळवे आणि संतोष घंटे यांनी साथसंगत
केली.