Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

राज्य

पोलिसांच्या बदल्यांविषयी लवकरच स्वतंत्र पोर्टल- जयंत पाटील
नाशिक, १२ जुलै / प्रतिनिधी

पोलीस खात्यातील बदल्यांच्या प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणावर कालापव्यय होत असल्याने त्यासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे पोलिसांचा बराचसा वेळ वाचेल, असे प्रतिपादन गृहमंत्री जयंत पाटील यांनी येथे केले. नाशिकजवळ आडगाव शिवारात बांधण्यात आलेल्या नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालय संकुलाचे उद्घाटन व हस्तांतरण सोहळ्यात ते बोलत होते. पोलिसांना अनेक वेळा राजकीय दबावामुळे आपले कर्तव्य निष्पक्षपणे पार पाडता येत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.संकुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले.

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात परिवर्तन अटळ- विलास अवचट
धुळे, १२ जुलै / वार्ताहर

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन अटळ असून त्यात तुम्हाला सहभागी व्हायचे किंवा नाही हे तुमच्याच हातात आहे. तुम्ही अनेक दिवस दु:खात, कष्टात काढले. हे सगळे थांबवायचे असेल तर धुळे ग्रामीणसह जिल्ह्य़ातील तिन्ही जागांमधून शिवसेनेला विजयी करावे, असे आवाहन उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख विलास अवचट यांनी येथे केले. धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सेना कार्यकर्त्यांचा मेळावा येथील केशरानंद गार्डनमध्ये झाला. या मेळाव्यात ते बोलत होते.

मायनिंग कंपनीशी राष्ट्रवादीच्याच नेत्यांचा संबंध
नारायण राणे यांचा आरोप
सावंतवाडी, १२ जुलै/वार्ताहर
मायनिंग कंपनीशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींचाच थेट संबंध असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष आर. आर. पाटील यांची टीका चुकीची आहे, असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तुम्ही पाहुण्यासारखे आलात मग पाहुण्यासारखेच वागायला हवे होते, असेही राणे म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मायनिंग, औष्णिक वीज प्रकल्पाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत गाजणार?
सावंतवाडी, १२ जुलै/ वार्ताहर

मायनिंग व औष्णिक वीज प्रकल्पांवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय पक्षात कलगी-तुरा रंगू लागला आहे. आता सत्ताधारी आघाडी पक्षातील बडय़ा नेत्यांनीच या प्रश्नावर तोंडसुख घेतले असल्याने विधानसभा निवडणुकीत मायनिंग प्रश्नच गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

वैनगंगेत बुडालेल्या महिलांची संख्या ३४
२६ मृतदेह सापडले; सुरेवाडा; खमारी गावावर शोककळा
भंडारा, १२ जुलै / वार्ताहर
वैनगंगेत नाव उलटून मृत्यू झालेल्या महिलांची संख्या ३४ असून २६ मृतदेह सापडले आहेत. उर्वरित ४ महिलांचे प्राण नदीकाठावर उपस्थित युवकांनी वाचवले. सुरेवाडा, खमारी गावावर शोककळा पसरली असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी १ लाख रुपये तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठानाकडून कुटुंबाला २५ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या संरक्षण अधिकाऱ्याला मद्यपी पर्यटकांची मारहाण
सावंतवाडी, १२ जुलै/वार्ताहर

आंबोलीमध्ये विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या संरक्षणार्थ असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील बंदूक हिसकावून घेण्याचा भयंकर प्रकार कुडाळच्या चार पर्यटक तरुणांच्या हातून घडला आहे. तसेच कुपेकर यांच्या बंधूंनाही त्यांनी दमदाटी केली. झाल्या प्रकाराबाबत कुपेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी पारगड किल्ल्याचा विकास महाबळेश्वर धर्तीवर करण्यासाठी आंबोलीत बैठक आयोजित केली होती.

राष्ट्रवादी नगरसेवकाच्या समर्थकांची मारहाण;
झी न्यूजचे कॅमेरामन जखमी
नाशिक, १२ जुलै / प्रतिनिधी

जमावाने केलेल्या मारहाणीत झी न्यूजचा कॅमेरामन जबर जखमी झाल्याची घटना येथे रविवारी घडली. याप्रकरणी ठाणे येथील राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाच्या समर्थकांवर जखमींनी संशय व्यक्त केला आहे. शहरातील पखालरोड परिसरात असलेल्या एका मंगल कार्यालयात राष्ट्रवादीशी संबंधित नगरसेवकाचा दुसरा विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यामुळे वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी व कॅमेरामन कार्यालयाबाहेर जमले. थोडय़ाच वेळात अचानक कार्यालयातून काही जण बाहेर आले. आरडाओरड करीत करीत त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण करण्यास सुरूवात केली. झी न्यूजचे कॅमेरामन अतुल भांबेरे यांच्या कॅमेऱ्याचे नुकसान करीत त्यांना जबर जखमी केले. सहारा समय वृत्तवाहिनीचे कॅमेरामन मिलिंद चौधरी यांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी कैलास यादवला १५ जुलैपर्यंत सीबीआय कोठडी
पनवेल, १२ जुलै/प्रतिनिधी

काँग्रेसचे नेते पवनराजे निबाळकर यांच्या हत्येप्रकरणी कैलास यादव या आणखी एका आरोपीस केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.यादवला आज दुपारी पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १५ जुलैपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. या हत्येसाठी मारेकरी निवडणे, त्यांना शस्त्रे पुरविणे आणि हत्येनंतर त्यांना पैसे देणे असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. अनेक गुन्ह्यांप्रकरणी उत्तर प्रदेशातील गाझीयाबाद येथील तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या यादवला गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी ‘ट्रान्स्फर वॉरंट’च्या आधारे मुंबईत आणले. त्यानंतर कायदेशीर बाबींची पूर्तता करून आज दुपारी त्याला न्यायालयात आणण्यात आले.या हत्येतील यादवचा सहभाग लक्षात घेता, त्याला सीबीआय कोठडी द्यावी, हा सीबीआयच्या वकीलांचा युक्तीवाद प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ग्राह्य धरून त्याला १५ जुलैपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.

बाळ राणे, पुरुषोत्तम महाजन यांच्या वेबसाईट व काव्यसंग्रहाचे प्रकाशन
नालासोपारा, १२ जुलै
प्रसिद्ध साहित्यिक बाळ राणे यांच्या www.saahityicbalrane.com या वेबसाईटचे प्रकाशन त्यांच्या विरार येथील निवासस्थानी ‘एक संक्रमण’ या वार्षिक अंकाचे संपादक रॉकी लोपिस यांच्या हस्ते अलिकडेच पार पडले. यात बाळ राणे यांचा परिचय त्यांच्या १८ पुस्तकांची समीक्षा व निवडक ११ कविता यांचा समावेश आहे.याच वेळी कवी प्रा. पुरुषोत्तम महाजन यांच्या ‘दि:क्कालातून सदा पाहतो’ या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन बाळ राणे यांच्या हस्ते झाले. या काव्यसंग्रहावर समीक्षात्मक भाष्य करताना ते म्हणाले, ‘‘बालपणापासून अंधत्व आलेल्या प्रा. महाजन यांची कविता खरोखरच दि:क्कालातून आरपार पाहणारी आहे. त्यांच्या अंतचक्षूंना लाभलेल्या दिव्य दृष्टीत साकार झालेल्या कवितात स्वत:च्या अंधत्वाबद्दल किंचितही खंत व्यक्त झालेली नाही. तिमिरातून प्रकाशाकडे नेणाऱ्या कवितांतून त्यांच्या वेदनातही ‘वेद’ झालेले दिसतात.’ या समारंभास काही स्थानिक मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.

लायन्स क्लब अलिबागच्या अध्यक्षपदी महेंद्र पाटील
अलिबाग,१२ जुलै / प्रतिनिधी

लायन्स क्लब अलिबाग या संस्थेच्या अध्यक्षपदी महेंद्र पाटील, सचिवपदी अनिल म्हात्रे तर खजिनदारपदी संजय पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली. लायन्स क्लब इंटरनॅशनलचे डायरेक्टर नरेंद्र भंडारी यांनी पदाची शपथ दिली. लायन्स क्लब सदस्या अंकिता म्हात्रे व विद्या पाटील यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व मिटकॉनतर्फे यशस्वी उद्योगिनी म्हणून गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला़ १०वी व १२वी गुणवंत विद्याथ्यी सत्कार, लिलावती हॉस्पिटलच्या सहकार्याने हार्ट डिसिज अवेअरनेस कॅम्प, ग्रामीण शाळांना संगणक व शालेय गणवेश वाटप, रामराज येथे आदिवासींसाठी सामूहिक विवाह सोहळा,मोफत हाडांची घनता तपासणी शिबीर, मांडवा येथे ब्लड डोनेशन मेगा कॅम्प, काल्रेखिंड येथे प्लॅस्टीक सर्जरी शिबीर, विद्यार्थ्यांसाठी करियर गायडन्स कार्यक्रम, वयात येणाऱ्या मुला-मुलींसाठी योग्य मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम,ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबीर व चष्मे वाटप, आदि कार्यक्रमांचे आयोजन लायन्स क्लबतर्फे करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

मनमाडमध्ये आज ‘शौकत श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा
नाशिक, १२ जुलै / प्रतिनिधी

जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने मनमाड येथे शौकत अली व्यायामशाळेतर्फे सोमवारी जिल्हास्तरीय ‘शौकत श्री २००९ शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.नेहरू भवनात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या स्पर्धेसाठी व्यायामशाळेचे अध्यक्ष वसीम शेख व खजिनदार नाविद शहा यांनी पुढाकार घेतला आहे. पाच वजनी गटात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील बेस्ट पोझरला दोन हजार रूपये तर प्रगतीशील शरीरसौष्ठवपटूस एक हजार रूपये दिले जाणार आहेत. ‘शौकत श्री’ मानकऱ्यास पाच हजार रूपये व चांदीची जैन देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत जिल्ह्य़ातील शरीरसौष्ठवपटूंनी मोठय़ा संख्येने सामील होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र वावरे, कार्याध्यक्ष गोविंद काळे, सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर आदींनी केले आहे.

कर्ज वसुलीसाठी पोलिसांचे संरक्षण पथक
नाशिक, १२ जुलै / प्रतिनिधी

डबघाईस आलेल्या पतसंस्था व बँकांच्या संचालकांसह बडय़ा कर्जदारांकडून वसुलीसाठी स्वतंत्र पोलीस संरक्षण पथकाच्या नियुक्तीस पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती जिल्हा कृती समितीचे अशासकीय सदस्य पां. भा. करंजकर यांनी दिली. या पथकात पाच महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. जिल्हा कृती समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार आयुक्तांनी तत्परतेने ही कृती केली असून पहिल्या टप्प्यात १३ जुलै ते १४ ऑगस्टपर्यंत वसुलीवर भर देण्यात येणार आहे. जिल्हा उपनिबंधकांनी प्राधान्यक्रमाप्रमाणे वसुलीचे वेळापत्रक तयार करावयाचे आहे. डबघाईस आलेल्या अनेक पतसंस्था व बँकांनी पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. परंतु मध्यंतरी पोलीस संरक्षण मिळू शकले नाही. आता मात्र आयुक्तांनी तातडीने दखल घेतल्याने नियंत्रण कक्षाच्या अधिपत्याखाली हे संरक्षण पथक कार्यरत राहणार आहे. कृती समितीचे सदस्य, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपआयुक्त जय जाधव आणि करंजकर यांनी आयुक्तांशी सात जुलैस पथक स्थापन करण्याविषयी चर्चा केली होती.

नाशिकमध्ये आता ऑगस्टपासून हेल्मेट सक्ती
नाशिक, १२ जुलै / प्रतिनिधी

दुचाकी वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी १३ जुलैपासून राबविण्यात येणारी हेल्मेट सक्तीची मोहीम तूर्त स्थगित करण्यात आली असून एक ऑगस्टपासून ही मोहीम प्रभावीपणे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक विभागाचे सहाय्यक पंोलीस आयुक्त संदीपान कांबळे यांनी दिली आहे. पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा व उपायुक्त सुधाकर त्र्यंबके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सोमवारपासून राबविण्यात येणार होती. परंतु बहुतांश दुचाकी चालकांनी अद्याप हेल्मेट खरेदी न केल्याने तसेच हेल्मेट कायद्याविषयी प्रबोधन होणे आवश्यक असल्याने ही मोहीम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मोहीम आता एक ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असल्याने वाहनधारकांनी सुरक्षिततेसाठी आयएसआय ट्रेड मार्क असलेलेच हेल्मेट वापरावेत तसेच वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असेही कांबळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

नाशिकमध्ये उद्या शिक्षकांचा मोर्चा
मनमाड, १२ जुलै / वार्ताहर

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीतर्फे सहाव्या वेतन आयोगात महाराष्ट्र शासनाने शिक्षकांवर केलेल्या अन्ययाविरोधात १४ जुलै रोजी शिक्षकांचा लाक्षणिक संप व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक येथे निघणाऱ्या मोर्चात जिल्ह्य़ातील सर्व शिक्षकांनी सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र विधेयकाच्या माध्यमातून कार्यान्वित केलेली शिक्षण सेवक योजना अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरली आहे. कमी वेतन, वेठबिगारी पद्धतीची राबवणूक, कमी रजा, धोरणांची अनिश्चितता, अशैक्षणिक कामे यामुळे शिक्षकांच्या मनोवृत्तीवर परिणाम होत आहे. सहाव्या वेतन आयोगात शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. या पाश्र्वभूमिवर महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांच्या न्याय हक्कांचा लढा म्हणून राज्यव्यापी संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बालवाडी, अंगणवाडीपासून उच्च महाविद्यालयापर्यंत सर्व शिक्षक या संपात सहभागी होत आहेत. मोर्चाची सुरूवात मंगळवारी दुपारी १२ वाजता बी. डी. भालेकर हायस्कूल पटांगणापासून सुरू होणार आहे, अशी माहिती शिक्षक समितीचे अध्यक्ष बाळु बोरसे, दादाजी गांगुर्डे, समता शिक्षक परिषदचे अध्यक्ष राजेंद्र म्हसदे, शिक्षक संघाचे अध्यक्ष अंबादास वाजे, कार्याध्यक्ष मधुकर सांगळे यांनी दिली आहे.

देवरुख महाविद्यालयात भूगोल मंडळाची स्थापना
देवरुख, १२ जुलै/ वार्ताहर

देवरुखच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात स्वामी विवेकानंद पुण्यतिथीचे औचित्य साधून भूगोल मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्ताने सांगलीतील ए.एस.सी महाविद्यालयाच्या भूगोल विभाग प्रमुख डॉ. डी.जी. गाताडे यांनी शोधनिबंध लेखनाची दिशा व पद्धती या विषयी मार्गदर्शन केले. आपल्या परिसराला आणि समाजाला उपयुक्त ठरतील अशाच विषयांना हुडकून त्यावर शोधनिबंध लिहिला जावा, हा प्रमुख विचार त्यांनी युवकांसमोर ठेवला. व्यवहारोपयोगी संशोधन करण्याच्या पद्धतीही त्यांनी स्पष्ट केल्या. प्रा. नरेंद्र तोंडवलकर यांनी शोधनिबंधाद्वारे स्वत:मधील कौशल्यांना चालना देण्याची संधी निर्माण होणार असल्याचे नमूद केले.

विद्युतदाब वाढल्याने उपकरणे जळाली
संगमेश्वर, १२ जुलै/ वार्ताहर

महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरवरून अचानक विद्युतदाब वाढल्याने लोवले गावामध्ये विद्युत उपकरणे जळून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्राहकवर्गाने या नुकसानीला महावितरण कंपनी जबाबदार असल्याने त्यांच्याकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.गुरुवारी रात्री पावणेआठच्या सुमारास लोवले मयुरबाग येथील ट्रान्सफॉर्मरवरून घराघरात आलेला महावितरणचा वीज दाब अचानक वाढला. परिणामी असंख्य घरातील सीएफएल बल्ब, साधे बल्ब, टय़ूब, पंखे, टीव्ही यामधून धूर येऊ लागल्याने ग्राहक वर्ग घाबरून गेला. वीज दाब वाढल्यानेच हा प्रकार घडला असून, काही घरांतून वायरिंगही जळून गेले आहे. लोवले येथील दोरकडे, लोवलेकर, चव्हाण, पराडकर, फटकरे, पांचाळ आदी सुमारे ५० पेक्षा अधिक ग्राहकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीमुळेच हे नुकसान झाले असल्याने नुकसानग्रस्त ग्राहकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्राहक वर्गाने केली आहे.

येऊरच्या तलावात तरूण बुडाला
ठाणे, १२ जुलै/प्रतिनिधी

रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी येऊर येथे गेलेल्या तरुणांमधील एकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना आज सायंकाळी ठाण्यात घडली. इंदिरानगर दत्तमंदिर येथे राहणारे चार-पाच मित्र रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी येऊर येथे गेले होते. मद्यधुंद अवस्थेत खदानीत पोहत असताना त्यातील पवन नरसप्पा बोडी (२३) हा पाण्यात बुडाला. अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन पवनचा शोध घेतला. मात्र अंधारामुळे पवनचा शोध लागला नसल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.