Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

क्रीडा

आर्मीचा दीपचंद सहारन ठाणे मॅरेथॉन विजेता महिलांमध्ये कविता राऊतची बाजी
ठाणे मॅरेथॉन

ठाणे, १२ जुलै/प्रतिनिधी

ऊन-पावसाच्या लपंगडावाबरोबर सुरू झालेल्या विसाव्या ठाणे वर्षां मॅरेथॉनवर पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिटय़ूटच्या धावपट्टूने वर्चस्व गाजविले. आर्मी स्पोर्टस इन्स्टिटय़ूटच्या दीपचंद सहारन याने २ तास २७ मि. ७ सेकंदात ४२.१९५ किलो मीटरचे अंतर पार करीत अजिंक्यपद पटकावले तर महिलांच्या २१ कि.मी. अंतराच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलची कविता राऊत विजेती ठरली. ठाणे वर्षां मॅरेथॉनच्या नावात जरी वर्षां असले तरी बऱ्याचवेळा ऐन स्पर्धेच्यावेळी पावसाने हमखास दडी मारलेली असायची. यंदा मात्र पावसाने सकाळपासून हजेरी लावत ऊन-पावसाचा डाव सुरू ठेवल्याने धावपटूंना त्याचा चांगला फायदा झाला.

पाकिस्तान ९० धावांत गारद; कुलसेकराचे चार बळी
कोलंबो, १२ जुलै / वृत्तसंस्था

पहिल्या कसोटीत विजयासाठी केवळ ९७ धावांची गरज असताना आठ विकेट्स गमावून पराभव ओढवून घेणारा पाकिस्तानचा संघ अजूनही त्या धक्क्यातून सावरलेला नाही. दुसऱ्या कसोटीतही त्यांच्या फलंदाजांची हाराकिरीची परंपरा सुरूच राहिली. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणारा पाकिस्तानचा संघ अवघ्या ३६ षटकांत ९० धावा करून तंबूत परतला. श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानने नोंदविलेला हा धावसंख्येचा नीचांक होता.

बच गए..
इंग्लंडने कसोटी अनिर्णीत राखली
कार्डिफ, १२ जुलै / वृत्तसंस्था
घडय़ाळातील सरकणारे काटे.. सामना संपण्यासाठी जवळ येत असलेली वेळ.. मॉन्टी पनेसार व जेम्स अँडरसन यांनी एकेका चेंडूचा केलेला सामना.. ऑस्ट्रेलियाच्या हातातोंडाशी आलेल्या विजयाचे रूपांतर अचानक सामना अनिर्णीत राहण्यात झाले आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंच्या चेहऱ्यावर ‘सुटलो’ असे भाव दिसून आले.. अ‍ॅशेस मालिकेतील ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशीचे हे चित्र होते. पराभवाच्या गर्तेतून बाहेर येत इंग्लंडने ही लढत अनिर्णीत राखण्यात यश मिळविले. इंग्लंडसाठी हा जणू विजयाचाच क्षण होता.

तमिम इक्बालचे शतक; बांगलादेश सुस्थितीत
किंग्सटाऊन, १२ जुलै / एएफपी

तमिम इक्बालने केलेल्या नाबाद शतकामुळे बांगलादेशने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आपली बाजू मजबूत केली. वेस्ट इंडिजने ६९ धावांची आघाडी घेतली होती. ती मागे टाकत बांगलादेशने तमिमच्या शतकाच्या जोरावर दुसऱ्या डावात उपाहारानंतर १८९ धावांपर्यंत मजल मारली होती. तमिम तेव्हा १०४ धावांवर नाबाद होता.त्याआधी, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत बांगलादेशने चिवट झुंज देत यजमानांना ३०७ धावांत गुंडाळले आणि आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद २६ अशी मजल मारली. बांगलादेशला आता पहिल्या डावातील पिछाडी भरून काढण्यासाठी आणखी ४३ धावांची आवश्यकता आहे.

सचिनच ‘बेस्ट’
न्यूझीलंडच्या माजी कसोटीपटूंचे मत

ख्राईस्टचर्च, १२ जुलै / वृत्तसंस्था

सचिन तेंडुलकर हाच जगातील सवरेत्कृष्ट फलंदाज आहे, असे मत न्यूझीलंडच्या माजी कसोटीपटूंनी व्यक्त केले आहे. येथील ‘हेराल्ड ऑन संडेज’ या वृत्तपत्राने न्यूझीलंडच्या काही माजी क्रिकेटपटूंना जगातील सवरेत्कृष्ट फलंदाज कोण असा प्रश्न विचारला होता. बहुतांश मंडळींनी सवरेत्कृष्ट फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर याच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

ट्वेण्टी-२०ची आता कसोटी?
नवी दिल्ली, १२ जुलै / वृत्तसंस्था

ट्वेंटी-२० कसोटी सामना .. कल्पना थोडी विचित्र वाटतेय ना? पण ही कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा विचार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून चालू आहे. त्यामुळे भविष्यकाळात असे सामने सुरू झाले तर आश्चर्य वाटायला नको. ट्वेंटी-२० सामन्यांच्या लोकप्रियतेमुळे कसोटी क्रिकेटच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याचे दिसते आहे.

मानधनावरून निर्माण झालेला तिढा लवकर सोडविणार
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे आश्वासन
किंग्स्टन, १२ जुलै / वृत्तसंस्था

खेळाडूंच्या मानधनावरून निर्माण झालेला तिढा लवकरात लवकर सोडवण्याचे संकेत वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष ज्युलियन हन्टे यांनी आज दिले. आम्ही सातत्याने खेळाडूंशी या प्रश्नावर वाटाघाटी करण्याच्या प्रयत्नात आहोत. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. आमच्या प्रयत्नांना यश न आल्यानेच बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी खेळाडूंना तयार करू शकलो नाही, असे हन्टे यांनी सांगितले.स्पर्धा सुरू होणार असताना खेळाडूंनी अशा प्रकारे वर्तन करणे चुकीचे आहे. अशा बाबी समन्वयाने, चर्चेने सोडवायला हव्या असेही ते म्हणाले. यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेटची बदनामी झाली आहे. भविष्यातही यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. खेळाडूंच्या संघटनेसमवेत झालेली बैठक कुठल्याही निष्कर्षांविनाच संपली.

अ‍ॅरन पेरसोलचा बेस्टस्ट्रोकमध्ये नवा विक्रम
इंडियानापॉलिस, १२ जुलै / पीटीआय

अमेरिकन जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत २०० मीटर बेस्टस्ट्रोक प्रकारात जागतिक विक्रम करत अ‍ॅरन पेरसोल याने विजेतेपद पटकावले. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये रेयान लोच्टे याने केलेल्या १.५३ . ९४ सेकंद या वेळेला मागे टाकत पेरसोल याने ५३.०८ सेकंदाची नवी विक्रमी वेळ प्रस्थापित केली. मार्च २००२ मध्ये पेरसोल याने केलेला विक्रम २००७ मध्ये जागतिक जलतरण स्पर्धेत लोच्टे याने मागे टाकला होता. त्यानंतर पुन्हा पेरसोलने नवा विक्रम केला आहे. आपल्या या विश्वविक्रमावर आनंद व्यक्त करत पेरसोल म्हणाला, हा माझ्या कारकिर्दीतला मैलाचा दगड आहे. आंतरराष्ट्रीय अिजक्यपद स्पर्धेआधीच्या या यशाने माझा आत्मविश्वास वाढला आहे.

बॉक्सिंग : भारताला तीन रौप्यपदके
नवी दिल्ली, १२ जुलै / पीटीआय

सालाम उमाखानोव्ह स्मृती मुष्टियुद्ध स्पर्धेत आज झालेल्या अंतिम सामन्यात प्रतिस्पध्र्याकडून पराभूत झाल्याने भारतीय खेळाडूंना रौप्य पदकांवर समाधान मानावे लागले. या स्पर्धा रशियामध्ये सुरू आहेत.अमनदीप सिंग, अक्षय कुमार व मनप्रित सिंग यांनी रजत पदके पटकावली. अमनदीप याला अर्मेनियाच्या डॅनिलेन ओगान्स याने कडवा प्रतिक्रार करीत ३.५ गुणांच्या फरकाने पराभूत केले, तर यजमान देशाच्या पॉलिन्स्कि डमिट्री याने ५७ किलो वजनी गटात अक्षय कुमारला नमविले. मनप्रित आज सर्वाधिक दुर्दैवी ठरला. नाकाच्या दुखापतीमुळे त्याला अंतिम सामनाही खेळता आला नाही. त्याने माघार घेतल्याने प्रतिस्पर्धी खोमास्टर अर्टर हा विजयी ठरला. भारताच्या महिला खेळाडूंनाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. संगीता देवी (८१ किलो) हिला एकही पदक मिळविता आले नाही.