Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

आर्मीचा दीपचंद सहारन ठाणे मॅरेथॉन विजेता महिलांमध्ये कविता राऊतची बाजी
ठाणे, १२ जुलै/प्रतिनिधी

 

ऊन-पावसाच्या लपंगडावाबरोबर सुरू झालेल्या विसाव्या ठाणे वर्षां मॅरेथॉनवर पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिटय़ूटच्या धावपट्टूने वर्चस्व गाजविले. आर्मी स्पोर्टस इन्स्टिटय़ूटच्या दीपचंद सहारन याने २ तास २७ मि. ७ सेकंदात ४२.१९५ किलो मीटरचे अंतर पार करीत अजिंक्यपद पटकावले तर महिलांच्या २१ कि.मी. अंतराच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलची कविता राऊत विजेती ठरली.
ठाणे वर्षां मॅरेथॉनच्या नावात जरी वर्षां असले तरी बऱ्याचवेळा ऐन स्पर्धेच्यावेळी पावसाने हमखास दडी मारलेली असायची. यंदा मात्र पावसाने सकाळपासून हजेरी लावत ऊन-पावसाचा डाव सुरू ठेवल्याने धावपटूंना त्याचा चांगला फायदा झाला. महाराष्ट्राच्या विकासासाठी धावू याह्ण या ब्रिदवाक्य असलेल्या या स्पर्धेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर, ठाणे मॅरेथॉन ट्रस्टचे अध्यक्ष सतिश प्रधान यांनी फ्लॅग ऑफ केले. विविध आठ वयोगटांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत सुमारे पंचवीस हजार धावपट्टू सहभागी झाले होते. स्पर्धेवर मनसेची पूर्णपणे झालर दिसत होती.
२००३ मध्ये दीपचंद सहारन याने ठाणे वर्षां अर्ध मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्यानंतर प्रथमच ठाण्यातील पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन लाखाचे बक्षिस पटकावले. सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या सरावाच्या दृष्टीने या ठाणे मॅरेथॉनचे महत्त्व सांगत दीपचंद याने उकाडा, वारंवार आलेला वाहतुकीचा अडथळा आणि पिण्याच्या पाण्याचा गैरसोईबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र स्वत: चे जुने विक्रम न मोडता आल्याची शल्य त्याने व्यक्त केले. या गटात हैद्राबादमधील आर्टी सेंटरच्या संतोष कुमार (२ तास ३१ मि. ६ सेकंद) दुसऱ्या आणि आर्मी इन्स्टिटय़ूटच्या राजकुमार सिंग (२ तास ३६ मि.६ से.) हा तिसऱ्या क्रमाकांचे मानकरी ठरला.
महिलांच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत भोसला मिलिटरी स्कूलची कविता राऊत विजेती ठरली. या स्पर्धेचे विजेतेपद मिळविताना कविताने २१ कि.मी.चे अंतर १ तास १७ मिनिट ३९ सेकंदात पूर्ण केले. सेंट्रल रेल्वेच्या सुधा सिंगने १ तास १८ मिनिट ४० सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करीत दुसरे आणि पश्चिम रेल्वेची प्रीती राव (१तास १९ मि. ३६ सेकंद) तिसरी आली. मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, बंगलोरपाठोपाठ कविताने ठाणे वर्षां मॅरेथॉन सलग पटकाविली आहे. २०११ मध्ये होणाऱ्या आशियन कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हा सराव असल्याचे सांगत तिने आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले.
मिश्र रिले स्पर्धेत पश्चिम रेल्वेच्या धावपटूने ४२.१९५ कि.मी. अंतर २ तास २७ मिनिट ४३ सेकंदात पार करून विजेतेपद पटकावले. आर्मी स्पोर्टस इंन्स्टिटय़ुट (अ) आणि आर्मी स्पोर्टस इंन्स्टिटय़ुट (ब) गटाने अनुक्रमे द्वितीय- तृतीय क्रमांक पटावले.
दहा किलो मिटरच्या पुरूष खुला गटात आर्मी स्पोर्टस इंन्स्टिटय़ुटचा अंगद कुमार (३१ मि. ३७ सेकंद), अंगराज सिंग (३२ मि.३१ सेकंद) आणि फिटनेस इंडियाच्या हरेंद्र ठाकरे (३४ मि. २सेकंद) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर बाजी मारली.
मुले अठरा वर्षांखालील (७ कि.मी.) -संतोष मगदुम (२२ मि.११ से.) दयानंद शिंदे(सांगली)२२ मि.२०सेकंद, आणि प्रकाश घासाडे (उरण) २२ मि.४९ सेकंद.
मुली अकरा वर्षांखालील (७ कि.मी.) - माया पाटील (सांगली) २७ मि.३ सेकंद, मोनिका आथरे (नाशिक)२८ मि.३सेकंद आणि कोजागिरी बच्चाव (नाशिक)२९ मि. ६ सेकंद. या स्पर्धेत पायलटला स्पर्धेचा रस्ता माहित नसल्याने त्याने चुकीच्या मार्गाने नेल्याने आपला प्रथम क्रमांक हुकल्याचा आरोप द्वितीय क्रमांक पटकाविणारी मोनिका आथरे हिने केला आहे.
मुले १४ वर्षांखालील (३ कि.मी.)
बाबासाहेब कोळेकर (सुरज स्पोर्टस क्लब सांगली)८ मि.४७ सेकंद, नितीन पाटील (जय गणेश स्पोर्टस, पुणे)९ मि.११ सेकंद, आणि दत्ता कोळेकर (सुरज स्पोर्टस क्लब सांगली) ९ मि.१२ सेकंद.
मुली १४ वर्षांखालील (३ कि.मी.) - पुजा वनमोरे (महात्मा गांधी विद्यालय, कोल्हापूर) १० मि.३७ सेकंद, स्वाती सिंग (फाल्कन स्पोर्टस क्लब, ऐरोली)११ मि.२४ सेकंद आणि मोनिका पाटील ( सांगली स्पोर्टस फांॅऊडेशन)११ मि.२६ सेकंद या स्पर्धेत अ‍ॅथलॅटीक्सचे सतत २० वर्षे प्रशिक्षक म्हणून ठाणे पोलीस दलात काम करणारे चंद्रकांत सोंडकर आणि राजेंद्र मयेकर यांचा सत्कार करण्यात आला.
अजित वाडेकर, जॉज थॉमस, जयंत पाटील आणि नितीन कदम यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.