Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

पाकिस्तान ९० धावांत गारद; कुलसेकराचे चार बळी
कोलंबो, १२ जुलै / वृत्तसंस्था

 

पहिल्या कसोटीत विजयासाठी केवळ ९७ धावांची गरज असताना आठ विकेट्स गमावून पराभव ओढवून घेणारा पाकिस्तानचा संघ अजूनही त्या धक्क्यातून सावरलेला नाही. दुसऱ्या कसोटीतही त्यांच्या फलंदाजांची हाराकिरीची परंपरा सुरूच राहिली. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणारा पाकिस्तानचा संघ अवघ्या ३६ षटकांत ९० धावा करून तंबूत परतला. श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानने नोंदविलेला हा धावसंख्येचा नीचांक होता. नुवान कुलसेकराने पुन्हा एकदा चमकदार गोलंदाजी करताना २१ धावांत ४ बळी घेतले तर अजंता मेंडिसने २० धावांत ३ बळी घेत त्याला तोलामोलाची साथ दिली. तुषारानेही २ बळी घेतले. श्रीलंकेने त्यानंतर या धावसंख्येला मागे टाकून ७४ धावांची आघाडी घेतली होती. पहिल्या दिवसअखेर श्रीलंकेने ३ बाद १६४ अशी मजल मारली होती. कर्णधार कुमार संगकारा ८१ धावांची खेळी करून नाबाद होता तर समरवीरा त्याला १३ धावांसह साथ देत होता.
पाकिस्तानच्या फलंदाजांनी आज पुन्हा एकदा वाईट खेळाचे प्रदर्शन करीत आपल्या संघाला अडचणीत टाकले. माजी कर्णधार शोएब मलिकचा (३९) अपवाद वगळता पाकिस्तानच्या इतर फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली.
सलामीवीर फवाद आलमने १६ तर पहिल्या कसोटीतील शतकवीर मोहम्मद युसूफने १० धावा करीत दुहेरी आकडय़ाची धावसंख्या गाठली. पण इतरांनी मात्र ती तसदी घेतली नाही. कुलसेकराने सलामीवीर खुर्रम (३), मोहम्मद युसूफ व मिसबाह उल हक (०) यांना माघाडी धाडून पाकिस्तानचे कंबरडे मोडले. तर मेंडिसने पाकिस्तानच्या शेपटाला गुंडाळले.
पाकिस्तानला शतकपूर्तीची संधी न देणाऱ्या श्रीलंकेने नंतर सामन्यावर पकड घेत दीडशे धावांचा टप्पा ओलांडला. स्वत: कुमार संगकाराने कर्णधाराला साजेशी खेळी करताना नाबाद ८१ धावा केल्या. पाकिस्तानच्या सईद अजमलने ४५ धावांत २ बळी घेत श्रीलंकेला रोखण्याचा प्रयत्न केला.
धावफलक
पाकिस्तान (पहिला डाव) - खुर्रम मंझूर झे. दिलशान गो. कुलसेकरा ३, फवाद आलम पायचीत मॅथ्यूज १६, युनूस खान त्रि. तुषारा ०, मोहम्मद युसूफ झे. हेरथ गो. कुलसेकरा १०, मिसबाह उल हक झे. दिलशान गो. कुलसेकरा ०, शोएब मलिक नाबाद ३९, कामरान अकमल झे. दिलशान गो. तुषारा ९, अब्दुर रौफ पायचीत कुलसेकरा ०, उमर गुल झे. समरवीरा गो. मेंडिस १, मोहम्मद आमीर पायचीत मेंडिस २, सईद अजमल पायचीत मेंडिस ०, अवांतर १०, एकूण ३६ षटकांत सर्व बाद ९०, बाद क्रम : १-४, २-६, ३-१७, ४-१९, ५-५१, ६-६७, ७-७४, ८-८०, ९-९०. गोलंदाजी : कुलसेकरा ९-३-२१-४, तुषारा ८-३-२३-२, मेंडिस १०-३-२०-३, मॅथ्यूज ३-०-१५-१, हेरथ ६-३-५-०.
श्रीलंका (पहिला डाव) - वर्णपुरा पायचीत गुल ११, पर्णवितना झे. अकमल गो. सईद अजमल २६, कुमार संगकारा खेळत आहे ८१, महेला जयवर्धने झे. खुर्रम मंझूर गो. अजमल १९, समरवीरा खेळत आहे १३, अवांतर १४, एकूण ४८ षटकांत ३ बाद १६४, बाद क्रम : १-२८, २-८२, ३-१३३.
गोलंदाजी : गुल १०-१-२८-१, आमीर ९-२-३०-०, रौफ ८-१-३१-०, अजमल १५-१-४५-२, युनूस खान ६-१-२१-०.