Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

सचिनच ‘बेस्ट’
न्यूझीलंडच्या माजी कसोटीपटूंचे मत
ख्राईस्टचर्च, १२ जुलै / वृत्तसंस्था

 

सचिन तेंडुलकर हाच जगातील सवरेत्कृष्ट फलंदाज आहे, असे मत न्यूझीलंडच्या माजी कसोटीपटूंनी व्यक्त केले आहे.
येथील ‘हेराल्ड ऑन संडेज’ या वृत्तपत्राने न्यूझीलंडच्या काही माजी क्रिकेटपटूंना जगातील सवरेत्कृष्ट फलंदाज कोण असा प्रश्न विचारला होता. बहुतांश मंडळींनी सवरेत्कृष्ट फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर याच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
जॉन मॉरिसन आणि दीपक पटेल यांनी सांगितले, की वेगवेगळ्या खेळपट्टय़ांवर आणि वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्याचा निकष लावला तर निर्विवादपणे सचिन हाच सध्याच्या घडीचा सर्वोत्तम फलंदाज ठरतो.
मॉरिसन म्हणाला, की सचिनच्या भात्यात अनेक फटके आहेत. अलीकडे तो सर्वच फटके मुक्तपणे खेळत नसला, तरी सामन्यात आपल्या संघाची परिस्थिती पाहून कोणते फटके उपयोगात आणायचे आणि कसे खेळायचे याचा निर्णय घेण्याची सचिनची क्षमता सर्वानाच मान्य करावी लागेल.
काही फलंदाज विशिष्ट प्रकारच्या खेळपट्टय़ांवरच यशस्वी ठरतात. पण सचिनबाबत तसे म्हणता येणार नाही. कोणत्याही खेळपट्टीवर तो यशस्वी ठरतो. माझ्या मते त्याला सर्वोत्तम ठरविण्यास हेच प्रमुख कारण आहे. खेळपट्टी संथ, फिरणारी असो की वेगवान गोलंदाजांना साथ देणारी असो सचिन चांगली फलंदाजी करणारच याची खात्री असते, असेही मॉरिसन म्हणाला.
दीपक पटेल म्हणाला, की सध्याच्या घडीला सर्वोत्तम फलंदाजाचा शोध घेताना सचिनशिवाय दुसऱ्या नावाचा विचारही करता येणार नाही. सध्या गौतम गंभीर, ग्रॅमी स्मिथ यांची फलंदाजीही मला आवडते. पण सचिनची कोणत्याही खेळपट्टीवर धावा करण्याची क्षमता निरपवादपणे मोठी आहे. सचिनच्या खालोखाल मी ग्रॅमी स्मिथ याला गुण देईन.
तेंडुलकरबरोबरच न्यूझीलंडचे माजी कसोटीपटू राहुल द्रविडच्या भक्कम बचाव तंत्राचे चाहते आहेत. गेविन लार्सन याने तर सचिनपेक्षा राहुल द्रविड हाच सर्वोत्तम फलंदाज असल्याचे मत व्यक्त केले आहे. क्रेग मॅकमिलन याच्या मते कुमार संगकारा हा सवरेत्कृष्ट फलंदाज आहे.