Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

ट्वेण्टी-२०ची आता कसोटी?
नवी दिल्ली, १२ जुलै / वृत्तसंस्था

 

ट्वेंटी-२० कसोटी सामना .. कल्पना थोडी विचित्र वाटतेय ना? पण ही कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा विचार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून चालू आहे. त्यामुळे भविष्यकाळात असे सामने सुरू झाले तर आश्चर्य वाटायला नको.
ट्वेंटी-२० सामन्यांच्या लोकप्रियतेमुळे कसोटी क्रिकेटच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याचे दिसते आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या लोकप्रियतेत कसोटी क्रिकेट टिकून राहावे यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) वेगवेगळ्या उपायांवर विचारविनिमय चालू आहे. त्यातीलच एक उपाय म्हणून वीस षटकांचे दोन डावांचे सामने भरविण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या प्रस्तावाला हळूहळू पाठिंबाही मिळत आहे.
अनेक माजी खेळाडूंनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. काहींनी मात्र अशा प्रकारच्या सामन्यांना प्रेक्षकांकडून कितपत पाठिंबा मिळेल या विषयी शंका उपस्थित केली आहे.
या प्रस्तावानुसार प्रत्येक संघाला प्रत्येकी २० षटकांचे दोन डाव खेळावे लागतील. याचा अर्थ संपूर्ण सामना ८० षटकांचा होईल.पहिल्या डावातील चुका भरून काढण्याची संधी दुसऱ्या डावांत खेळाडूंना मिळू शकेल. त्याचबरोबर दुसऱ्या डावात दोन खेळाडू बदलण्याची संधी दोन्ही संघांना देण्याची कल्पनाही या प्रस्तावात आहे.
हा प्रस्ताव अधिकृतरीत्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सादर करण्यात आलेला नाही. भारताचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, सैद किरमाणी यांसारख्या ज्येष्ठ खेळाडूंनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.
अजित वाडेकर, संदीप पाटील, इरापल्ली प्रसन्ना यांसारख्या खेळाडूंनी मात्र ही कल्पना कितपत यशस्वी ठरेल याबाबत शंका व्यक्त केली आहे.
बोर्डे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले, की ट्वेंटी-२० सामन्यात झटपट निकाल मिळतो म्हणून प्रेक्षक त्याकडे आकर्षित झाले आहेत. या प्रस्तावात तसाच आकर्षकपणा आहे. मात्र ही कल्पना थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर राबविण्यापेक्षा क्लब सामन्यांच्या किंवा प्रथम श्रेणीच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये राबविली जावी.
माजी कसोटीपटू संदीप पाटील म्हणाला, की या प्रस्तावाबाबत प्रायोजक आणि खेळाडूंची काय मते आहेत हे जाणून घेतले पाहिजे. नंतरच त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कार्यवाही करावी.
प्रेक्षकांना सदासर्वकाळ झटपट सामनेच आवडतील असे गृहीत धरूनही चालू नये. केवळ झटपट निकालापेक्षा अनेकदा फलंदाज आणि गोलंदाज यांचा दर्जा दाखवून देणारा खेळही प्रेक्षकांना आवडतो हे लक्षात घ्यायला हवे. अशा सामन्यांना प्रायोजक मिळायचे असतील, तर त्यांचेही मत विचारात घ्यावे लागेल, असेही संदीप म्हणाला.
असे अनेक प्रस्ताव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे येत असतात. असे प्रस्ताव विचारविनिमयासाठी संबंधित समितीकडे पाठविले जातात, असे आयसीसीकडून सांगण्यात आले.