Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

बच गए..
इंग्लंडने कसोटी अनिर्णीत राखली
कार्डिफ, १२ जुलै / वृत्तसंस्था

 

घडय़ाळातील सरकणारे काटे.. सामना संपण्यासाठी जवळ येत असलेली वेळ.. मॉन्टी पनेसार व जेम्स अँडरसन यांनी एकेका चेंडूचा केलेला सामना.. ऑस्ट्रेलियाच्या हातातोंडाशी आलेल्या विजयाचे रूपांतर अचानक सामना अनिर्णीत राहण्यात झाले आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंच्या चेहऱ्यावर ‘सुटलो’ असे भाव दिसून आले.. अ‍ॅशेस मालिकेतील ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशीचे हे चित्र होते. पराभवाच्या गर्तेतून बाहेर येत इंग्लंडने ही लढत अनिर्णीत राखण्यात यश मिळविले. इंग्लंडसाठी हा जणू विजयाचाच क्षण होता. पॉल कॉलिंगवूडची २४५ चेंडूंतील ७४ धावांची जिगरबाज खेळी आणि जेम्स अँडरसन (नाबाद २१) व मॉन्टी पनेसार (नाबाद ७) यांनी शेवटपर्यंत लढविलेला किल्ला यामुळे इंग्लंडने स्वत:चा पराभवापासून बचाव केला. अखेरची विकेट शिल्लक असताना अँडरसन व पनेसार यांनी ऑस्ट्रेलियाकडून विजयाची संधी हिरावून घेतली.
इंग्लंडने चौथ्या दिवशी २ बाद २० अशा अवस्थेतून आज सुरुवात केली, तेव्हा त्यांना पराभव टाळण्याचेच प्रथम आव्हान होते. पण ७० धावांत फलंदाज गमाविल्यानंतर पराभव अधिक जवळ दिसू लागला. मात्र पॉल कॉलिंगवूडने ७४ धावांची चिवट खेळी करून एका बाजूने किल्ला लढविला. दुसऱ्या बाजूला मात्र त्याला हवी तशी साथ मिळत नव्हती. फ्लिन्टॉफ (२६), स्टुअर्ट ब्रॉड (१४), स्वान (३१) यांनी प्रतिकार करून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे मनसुबे यशस्वी होऊ दिले नाहीत. हे फलंदाज बाद होत गेल्यानंतरही कॉलिंगवूडने खेळपट्टीवर नांगर टाकलेलाच होता. मात्र ९४व्या षटकात पीटर सिडलने त्याचा अडथळा दूर केल्यावर इंग्लंडचा पराभव जवळपास निश्चितच झाला, याची सर्वांनी खात्री पटली होती. पण हा अंदाज अँडरसन व पनेसार यांनी खोटा ठरविला. दोघांनी जवळपास ११ षटके ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला. एकीकडे स्थानिक वेळेनुसार सामना ६ वाजून ५०मिनिटांनी संपणार होता. त्या वेळेपर्यंत काहीही करून किल्ला लढविण्याशिवाय या दोघांपाशी पर्याय नव्हता. त्यात दोघेही यशस्वीही ठरले. एवढेच नव्हे तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात घेतलेली २३९ धावांची आघाडीही त्यांनी मागे टाकत १३ धावांची आघाडीही इंग्लंडला मिळवून दिली.
ऑस्ट्रेलियातर्फे हिल्फेनहॉस व हॉरित्झ यशस्वी गोलंदाज ठरले. हिल्फेनहॉसने ४७ धावांत ३ तर हॉरित्झने ६३ धावांत ३ बळी घेतले.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात घेतलेल्या २३९धावांना मागे टाकण्याच्या प्रयत्नात इंग्लंडची अवस्था दुसऱ्या डावात उपाहाराला ५ बाद १०२ अशी झाली होती. त्यामुळे ही लढत ते गमाविण्याच्या स्थितीत आहेत. हॉरित्झ आणि हिल्फेनहॉस यांनी प्रत्येकी दोन बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला धक्के दिले.
ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात ६ बाद ६७४ धावांवर डाव घोषित करून २३९ धावांची आघाडी घेतली. या आघाडीला मागे टाकण्याच्या प्रयत्नात इंग्लंडची मात्र चांगलीच दमछाक झाली. अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉस (१७), कूक (६) या सलामीवीरांसह बोपारा (१), पीटरसन (८) हे भरवशाचे फलंदाजही झटपट माघारी परतल्याने इंग्लंडची अवस्था ५ बाद ७० अशी बिकट झाली होती. यष्टीरक्षक मॅट प्रायरने १४ धावांची खेळी करून आधार देण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. त्यानंतर पॉल कॉलिंगवूड व फ्लिन्टॉफ यांनी इंग्लंडला सावरले. उपाहाराला इंग्लंडने शतकाचा टप्पा ओलांडला.
धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) - ४३५.
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) ६ बाद ६७४ डाव घोषित

इंग्लंड (दुसरा डाव) - अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉस झे. हॅडिन गो. हॉरित्झ १७, अ‍ॅलिस्टर कूक पायचीत जॉन्सन ६, रवी बोपारा पायचीत हिल्फेनहॉस १, केव्हिन पीटरसन त्रि. हिल्फेनहॉस ८, पॉल कॉलिंगवूड झे. हसी गो. सिडल ७४, मॅट प्रायर झे. क्लार्क गो. हॉरित्झ १४, अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ झे. पॉन्टिंग गो. जॉन्सन २६, स्टुअर्ट ब्रॉड पायचीत हॉरित्झ १४, स्वान पायचीत हिल्फेनहॉस ३१, जेम्स अँडरसन नाबाद २१, मॉन्टी पनेसार नाबाद ७, अवांतर ३३, एकूण १-५ षटकांत ९ बाद २५२. बाद क्रम : १-१३, २-१७, ३-३१, ४-४६, ५-७०, ६-१२७, ७-१५९, ८-२२१, ९-२३३, गोलंदाजी : जॉन्सन २२-४-४४-२, हिल्फेनहॉस १५-३-४७-३, सिडल १८-२-५१-१, हॉरित्झ ३७-१२-६३-३, क्लार्क ३-०-८-०, नॉर्थ७-४-१४-०, कॅटिच ३-०-७-०.