Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अमरावती विभागातील धरणांमध्ये १४ टक्के साठा
अप्पर वर्धा प्रकल्पाच्या साठय़ात ६ टक्के वाढ
अमरावती, १२ जुलै / प्रतिनिधी
अमरावती विभागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे या धरणांमधील

 

जलसाठा १४ टक्क्यांवर स्थिरावला असून सर्वात मोठय़ा अप्पर वर्धा प्रकल्पाच्या पाणीसाठय़ात गेल्या आठवडाभराच्या पावसानंतर सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अमरावती विभागात आठ मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये १० जुलैअखेर १९१ दशलक्ष घनमीटर म्हणजे १४ टक्के पाणीसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये १५ टक्के तर लघु प्रकल्पांमध्ये ५ टक्के जलसाठा आहे. अमरावती जिल्ह्य़ातील अप्पर वर्धा प्रकल्पात सर्वाधिक १६० दलघमी (२९ टक्के) पाणी साठवले गेले. या धरणाचे पाणलोट क्षेत्र मध्यप्रदेशात आहे. या भागात गेल्या आठवडय़ात चांगला पाऊस झाल्याने जलसाठय़ाची स्थिती सुधारली. धरणाच्या परिसरात गेल्या १ जूनपासून १९९ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत अप्पर वर्धामध्ये २७ टक्के पाणीसाठा होता. या प्रकल्पाची पाणीसाठय़ाची क्षमता ५४८ दशलक्ष घनमीटर आहे.
यवतमाळ जिल्ह्य़ातील पूस प्रकल्पाची क्षमता ९१ दलघमी आहे. या धरणात आतापर्यंत केवळ ५ दलघमी (५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात जलसाठा २२ टक्क्यापर्यंत पोहोचला होता. १७० दलघमी क्षमतेच्या अरुणावती प्रकल्पात सध्या केवळ ११ दलघमी (६ टक्के) पाणी आहे. गेल्यावर्षी ते ९ टक्के होते. बेंबळा प्रकल्पात तर मृतसाठाच शिल्लक आहे अजूनही या धरणात पाणी साठवले गेलेले नाही. अकोला जिल्ह्य़ातील ८६ दलघमी क्षमतेचा काटेपूर्णा प्रकल्पही कोरडाच आहे. बुलढाणा जिल्ह्य़ातील ८२ दलघमी क्षमतेच्या वाण प्रकल्पात ७ दलघमी (९ टक्के), ६९ दलघमी क्षमतेच्या नळगंगा प्रकल्पात ७ दलघमी (१० टक्के), ६० दलघमी क्षमतेच्या पेनटाकळी प्रकल्पात १ दलघमी (२ टक्के) पाणीसाठा झाला आहे.
विभागातील या आठ मोठय़ा प्रकल्पाची १० जुलैपर्यंतची सरासरी ३४७ दलघमी एवढी आहे पण, या प्रकल्पांमध्ये सध्याच्या घडीला फक्त १९१ दलघमी एवढी जलसाठवणूक झाली आहे. २००७ मध्ये या तारखेपर्यंत ६२९ दलघमी इतके पाणी साठले होते. आठवडाभरानंतर विभागातील मोठय़ा प्रकल्पांपैकी केवळ तीनच प्रकल्पांच्या जलसाठय़ात वाढ झाली आहे. गेल्या आठवडय़ात अप्पर वर्धा प्रकल्पात १२२ दलघमी, अरुणावती ६ दलघमी, नळगंगात ३ दलघमी पाणीसाठा होता हा साठा वाढून अनुक्रमे १६०, ११ आणि ७ दलघमी झाला आहे. इतर प्रकल्पांच्या पाणीसाठय़ात तर काहीच वाढ झालेली नाही.
विभागातील २३ मध्यम प्रकल्पांची क्षमता ६५९ दलघमी एवढी आहे. आतापर्यंत या प्रकल्पांमध्ये केवळ ९९ दलघमी (१५ टक्के) पाणीसाठा एकत्र झाला आहे. गेल्या आठवडय़ात तो ८१ दलघमी होता. गेल्या वर्षीही १० जुलैपर्यंत १५ टक्केच पाणीसाठा झाला होता. विभागातील ३१५ लघु प्रकल्पांमध्ये सध्या ४२ दलघमी (५ टक्के) साठा आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने या प्रकल्पांची पाण्याची पातळी वाढू शकली नाही.