Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सामान्यांच्या समस्या समजून घेणारा लोकप्रतिनिधी
संजय राऊत

स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करण्याचा दांडगा अनुभव असल्याने आमदार भैरसिंग नागपुरे

 

अगदी शेवटच्या माणसाच्या समस्या समजून घेऊन त्या मार्गी लावण्यात अग्रेसर आहेत. विरोधी बाकावर असूनदेखील शासकीय योजनांची माहिती असल्यामुळे मतदारसंघाकरता अनेक विकास कामे खेचून आणण्यात आमदार भैरसिंग नागपुरे यशस्वी झाले.
आमदार भैरसिंग नागपुरे यांनी रस्ते, समाजमंदिर, हातपंप, अशी अनेक कामे विविध भागात करून नागरिकांना खूष केले आहे. मतदारसंघातील चिचगड, ककोडीच्या लोकांना न्यायालयीन कामासाठी ९५ कि.मी.वरील साकोलीला जावे लागत होते. त्यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडून देवरीला न्यायालय आणले. ओवारा, बेवारटोला, सिंचन प्रकल्पाला युती शासनाच्या काळातच मंजुरी मिळाली होती पण, आघाडी शासन निधी देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे विधिमंडळात या प्रकल्पाच्या निधीसाठी पाठपुरावा करून निधी मिळवून काम सुरू केले आहे.
गेल्या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीचा मुद्दा आमदार भैरसिंग नागपुरे यांनी विधिमंडळात उपस्थित केला. निधीअभावी बंद पडलेल्या पांढरवाणी व बिजेपार उपसा जलसिंचन योजनांसाठी सुधारित अंदाजपत्रकात मंजुरी मिळवून काम सुरू करण्यात आमदार नागपुरेंना यश आले. धरणापासून शेतीला पाणी मिळायला पाहिजे म्हणून कोटरा-हलबीटोला उपसा जलसिंचन योजना मंजूर करून १ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी मिळवून दिला.
चिचगड सिंगनडोह ते जमी पालांदूर रस्त्याचे काम करण्यात आले. सालेकसा ते पिपरीया मार्गावर मुरूमटोला लिंबा पुलाला मंजुरी मिळाली असून बांधकाम दिवाळीपर्यंत पूर्ण होईल. धानाला एक हजार रुपये भाव मिळण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.
आमगाव ग्रामपंचायतची नळयोजना थकित वीज बिल १ लाख रुपये भरून पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत व ‘महावितरण’ने पाणीपुरवठा योजनेबाबत ठोस निर्णय घेऊन कायमस्वरूपी योजनेसाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी आमदार भैरसिंग नागपुरे यांनी केली.
आमगाव येथे बसस्थानकासाठी सालेकसा मार्गावर जागा घेऊन ठेवली आहे. युतीशासनाच्या काळात भूमिपूजनसुद्धा आटोपले पण, वाद उद्भवल्याने कामात अडथळे निर्माण करण्यात आले.
आमदार भैरसिंग नागपुरे यांच्या पुढाकाराने काही विकासकामे पूर्ण झाली असली तरी आदिवासी भागातील आमगाव विधानसभा मतदारसंघ विकासात बराच माघारलेला आहे. ४८ गावांची बनगाव प्रश्नदेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेली नाही.
मार्गी लागलेली कामे :
देवरी येथील न्यायालयीन इमारत
पांढरवाणी , बिजेपार , उपसा जलसिंचन योजना
ग्रामपंचायत आमगाव- जलशुद्धीकरण केंद्र व नळयोजना
महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणारा खेडेपार कोल्हापुरी बंधारा
पालांदूर जमी , चिचगड , सिंगनडोह पूल
अपूर्ण राहिलेली कामे :
बनगाव प्रश्नदेशिक पाणीपुरवठा योजना
काशीनाला पांढरी साठवण तलावाचे बांधकाम
बसस्थानक (मुख्य) आमगाव
मतदारसंघातील प्रमुख प्रश्न
सिंचनाचे अपूर्ण प्रकल्प
शेतीसाठी सिंचनाची सोय
सिंचनाचा अनुशेष भरून काढणे
रोजगार निर्मिती
मालगुजारी तलावाचे खोलीकरण
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
पुन्हा निवडून आल्यास :
परिसीमन आयोगाने केलेल्या पुनर्रचनेत आमगाव मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी राखीव असल्याने आमदार भैरसिंग नागपुरे यांना विधानसभा निवडणूक लढण्याकरता जागा उपलब्ध होणार नाही.