Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अंगणवाडी सेविका व ग्रामरोजगार सेवकांचे धरणे
बुलढाणा, १२ जुलै / प्रतिनिधी

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचारी

 

संघटना म.रा.ग्राम रोजगार सेवक संघटना, जिल्हा प्रेरक संघटनेच्या सदस्यांनी नुकतेच धरणे धरले.
जिल्ह्यामध्ये ८५५ ग्रामपंचायतीमध्ये अद्यापही ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आली नाही. ग्राम विकासाचा महत्त्वाचा घटक असणाऱ्या नेमलेल्या ग्राम रोजगार सेवकाला नियुक्ती पत्र नाहीत, मानधन नाही, रोहयो मोजक्या गावात राबवली जाते. अवर्षनाचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या भागात लोकांना बेरोजगार ठेवण्यात येते. अंगणवाडी सेविका-मदतनिसांना नियमबाह्य़ कामाची सक्ती केली जाते. वेतनाचा प्रश्न वारंवार निर्माण होतो, तर साक्षरता अभियानांतर्गत कार्यरत प्रेरकांना, सहाय्यक प्रेरकांना २००३ पासून मानधन नाही. मानधन मिळणे या आशेवर हे प्रेरक अद्यापही कार्यरत आहेत.
या सर्वाच्या प्रलंबित मागण्यांसाठी असणारा असंतोष शासनाने वेळीच समजून घेऊन त्याची पूर्तता करावी, असे सिटूचे पंजाबराव गायकवाड, सुधीर देशमुख, मंगला देशपांडे, अशोक लांडगे, महेश वाकदकर यावेळी म्हणाले. यावेळी शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
या निवेदनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर निवृत्ती वेतन लागू करा, दरमहा वेतन द्या, तर ग्राम रोजगार सेवकांच्या जिल्ह्य़ातील ग्राम रोजगार सेवकांना नियुक्ती पत्रे द्या, नियुक्तीपासून ५००० रुपये मानधन द्या, त्यांना मस्टर असिस्टंटचा दर्जा द्या, टी.ए., डि.ए. भत्ता द्या, ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र रोजगार कक्ष निर्माण करा तसेच प्रेरकांच्या मागण्यांमध्ये जिल्ह्य़ातील प्रेरकांना २००३ पासूनचे थकित मानधन द्या, केंद्रावरील वाचन साहित्याचे बिल त्वरित द्या, या मागण्यांचा समावेश आहे.
आंदोलना दरम्यान अंगणवाडी सेविका-मदतनिसांची थकित मानधनाची मागणी महिला व बाल कल्याण तथा रोजगार हमी योजना मंत्री मदन पाटील यांनी मान्य केल्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षात काही मिळाले नाही.
या आंदोलनात सिटूचे सुधीर देशमुख, सचिन कापसे, गोपाळ गाळकर, आनंद देशपांडे, शैलेश उप्पलवार, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मंगला देशपांडे, दुर्गा चव्हाण, जयश्री क्षीरसागर, अलका कुळकर्णी, रेखा जाधव, तर ग्रा.रो. सेवक संघटनेचे दत्ता शेळके, पांडुरंग उबरहंडे, गणेश मोरे, जिल्हा प्रेरक संघटनेचे मीरा सुरोशे, दीपाली वळसे, नारायण यंगड, शमशेरखा गुलशरखा पठाण सहभागी झाले होते.