Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘सीबीआय’ चौकशीने धान्य व्यापारी हादरले
गोंदिया जिल्ह्य़ात उघडकीस आलेल्या निकृष्ट धान्य पुरवठय़ाचे प्रकरण सीबीआयच्या ताब्यात

 

गेल्याने येथील निकृष्ट तांदळाचा व्यापार करणाऱ्या व्यापारी व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रयोगशाळेतील तपासणी अहवालावर पुढील कार्यवाही अवलंबून असल्याने या अहवालाकडे व्यापाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.
गेल्या महिन्याच्या २० जून ला माजी खासदार शिशुपाल पटले यांनी चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर यांना सौंदड येथील धान्य गोदामातून निघालेल्या तांदळाच्या एका ‘रॅक’मध्ये निकृष्ट दर्जाचे तांदूळ असण्याची व पोत्यामधील वजन ५० किलो पेक्षा कमी असण्याची माहिती भ्रमणध्वनीवर दिली होती.
खासदार अहीर यांनी त्वरित चंद्रपूर रेल्वे स्थानक गाठून सौंदडयेथून आलेल्या तांदळाची पाहणी केली व तांदूळ निकृष्ट दर्जाचे आढळल्याने तांदळाचे नमुने घेऊन तपासणीची मागणी केली. २७ जूनला गोंदिया तालुक्यातील रावणवाडी व मुरपार येथील वखार महामंडळाच्या गोदामावर छापे घालून सीबीआय पथकाने गोदामातील तांदूळ व गहूचे नमुने घेऊन त्यांना तपासणीकरता पाठवले व वखार महामंडळाच्या गोदामाला सील केले होते. यात गोंदियातील पाच राईस मिल सहभागी असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
प्रथम नमुने तपासणीत कोडे न सुटल्याने ८ जुलैला पुन्हा एकदा नागपूरच्या सीबीआई पथकाने येथील तीन गोदामात छापा टाकून कसून चौकशी केली असता प्रत्येक ५० किलोच्या तांदळाच्या पोत्यात दीड ते पंधरा किलोची तूट असल्याचे आढळून आले.
यामुळे फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) च्या अधिकारी व धान्य पुरवठा करणाऱ्या राईस मिल मालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. गुणवत्ता निरीक्षक पी.के. ठोंबरे आणि सहायक व्यवस्थापक रणदिवे यांनी वखार महामंडळाच्या गोदामातील ४० लॉट, फूलचूर येथील साकेत गोदामातील १४ लॉट आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामातील १२ लॉट अशी एकूण पुरवठा करण्यात आलेल्या ६६ लॉटची तपासणी केली. एका लॉटमध्ये ५० किलोची ५४० पोती असतात. ५० किलोच्या पोत्यात तब्बल दीड ते पंधरा किलो तांदूळ कमी असल्याचे कारवाईत आढळले. त्यात ३०टक्के खंडा, जुनी फाटलेली पोती आढळली. छापा टाकण्यात आलेल्या तिन्ही ठिकाणी गोंदिया येथील श्यामबाबा राईस मिल, खंडेलवाल राईस मिल, तिरुपती राईस मिल, गुप्ता राईस मिल, किंजल राईस मिल येथून धान्याचा पुरवठा करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. गेल्या महिन्यात सौंदड येथून पाठवण्यात आलेला निकृष्ट दर्जाचा तांदूळ चंद्रपुरातील रेशन दुकानाच्या माध्यमाने बीपीएल कार्डधारकांना वितरित केला जाणार होता.
‘सीबीआय’ने नि:पक्ष तपासणी केली तर या प्रकरणात शहरातील कित्येक व्यापाऱ्यांचे पितळ उघड पडू शकते. या प्रकरणात सीबीआय तपासणी कुठपर्यंत मजल मारते यावर सगळे काही अवलंबून आहे.
संजय राऊत