Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

बल्लारपूर पेपर मिलमधील दुर्घटनेची चौकशी सुरू
चंद्रपूर, १२ जुलै/प्रतिनिधी

थापर ग्रुपच्या बल्लारपूर पेपर मिल उद्योगात शुक्रवारी झालेल्या अपघातात तीन मजूर जबर जखमी

 

झाले. या घटनेची माहिती होताच जलसंपदा राज्यमंत्री विजय वडेट्टीवारांनी पेपर मिलला भेट देऊन घटनेची चौकशी केली. कोसळलेल्या ‘स्लॅब’चे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करून या प्रकरणात व्यवस्थापन दोषी आढळल्यास कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांना दिली.
पेपर मिलमध्ये अपघात झाल्याची माहिती मिळताच राज्यमंत्री विजय वडेट्टीवार बल्लारपूर पेपर मिलमध्ये दाखल झाले. या वेळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ मजदूर सभेचे नेते वसंत मांढरे यांच्याशी वाद झाल्याने काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने तणाव निवळला. या प्रकारामुळे संतप्त झालेले राज्यमंत्री वडेट्टीवार यांनी या प्रकरणाची चौकशी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, पॉवर प्लांटचे बांधकाम निकृष्ट असल्याने स्लॅब कोसळून अपघात झाला. यामुळेच तीन कामगार गंभीर जखमी झाले. याला व्यवस्थापन जबाबदार आहे. कामगारांचे हित जोपासणारी मजदूर सभा कामगार हिताची भूमिका घेत नसल्याने ही मजदूर सभा बरखास्त करावी, पेपर मिल प्रदूषणाच्या तक्रारीही दिवसागणिक वाढत आहेत. या अपघात प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीत व्यवस्थापन दोषी आढळल्यास पेपर मिलची बँक गॅरंटी जप्त करण्यात यावी, अशी शिफारस शासनाकडे करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. कामगारांचे हित जोपासण्यासाठी नव्या कामगार संघटनेची निर्मिती लवकरच केली जाणार आहे. या संघटनेशी कामगारांनी जुळावे, असे आवाहन राज्यमंत्री वडेट्टीवार यांनी केले.