Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

धरणाचे दरवाजे उघडल्याने मच्छिमारांचे नुकसान
भंडारा, १२ जुलै / वार्ताहर

गोसे धरणात अधिक प्रमाणात पाणी साचल्यामुळे बुधवारी पूर्वसूचना न देता धरणाचे चार दरवाजे

 

उघडून पाणी सोडण्यात आल्याने मच्छिमारांचे डोंगे व इतर साहित्य वाहून गेले आहेत.
जिल्ह्य़ात व लगतच्या जिल्ह्य़ामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे वैनगंगा व तिच्या उपनद्यांच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढली.
गोसे धरणात आधीची पाण्याची पातळी २३०.५० मीटर एवढी होती. परंतु, धरणात पाणी अडविण्यात येत असल्यामुळे बुधवारी ही पातळी वाढली. त्यामुळे सायंकाळी धरणाचे चार दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले.
नदीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरणाच्या खालील भागातील १५ ते २० गावातील मच्छिमारांचे साहित्य वाहून गेले.
पवनी आणि कोदुर्ली येथील मच्छिमारांचे सुमारे ५० डोंगे वाहून गेल्याचा अंदाज आहे. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी भरपाई देण्याची मागणी केली आहे.
या प्रकारामुळे जिल्ह्य़ातील मच्छिमारांनी असंतोष व्यक्त केला आहे. गोसे धरणाच्या काठावरील गावकऱ्यांनी अद्याप पुनर्वसन ठिकाणी स्थलांतर केले असून अजूनही गावात लोकवस्ती आहे.
धरणात पाणी वाढून त्यामुळे होणारी वित्त व जीवितहानी टाळण्यासाठी धरणाचे चार दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले, असे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे यांनी सांगितले.