Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

भंडारा जिल्ह्य़ात १५० गावातील नागरिकांचे दरवर्षीच पुरामुळे स्थलांतर
भंडारा, १२ जुलै / वार्ताहर

जिल्ह्य़ातील वैनगंगा, बावनथडी आणि चुलबंद या नद्यांच्या काठावरील दीडशे गावातील

 

नागरिकांना दरवर्षी पूर आल्यावर शिबिरात स्थलांतर करावे लागते.
नद्यांचे पात्र विस्तारत असल्याने तुमसर आणि लाखांदूर तालुक्यातील शेतीचे क्षेत्र सतत घटत आहे. या गावाच्या कायम पुनर्वसनाची योजना नाही. या गावातील नागरिकांना शेतीसोबतच, जीवित व वित्त हानीची झळ दरवर्षी सहन करावी लागते.
जिल्ह्य़ातील तुमसर, मोहाडी, भंडारा आणि पवनी तालुक्यातून वैनगंगा नदी गेली आहे. १०५ गावे या नदीच्या काठावर आहेत. तालुक्यात बावनथडी नदी आणि साकोली, लाखनी आणि लाखांदूर तालुक्यातील चुलबंद या नद्यांच्या काठावर ५४ गावे आहेत. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यावर नाले, उपनद्यांच्या पात्रातील पाणी या नद्यांच्या पात्रात येते व नद्यांना पूर येतो. नदीकाठावर असलेल्या गावात पुराचे पाणी शिरते. यामुळे गावातील नागरिकांचा संपर्क तुटतो. शेतीतील पिके, जनावरे वाहून जाण्याच्या घटना दरवर्षी घडतात.
तुमसर तालुक्यातील वैनगंगेच्या काठावरील बपेरा, तामसवाडी, सीतेपार, करकापूर, ढोरवाडा, चारगाव, सुकळी, मांढळ आणि माडगी तसेच बावनथडी नदीच्या काठावरील दोन-तीन गावात दरवर्षी पुराचे पाणी शिरते. बपेरा या गावाचे पुनर्वसन करण्यास मंजुरी मिळाली असून त्याबाबत काम सुरू आहे. पवनी तालुक्यातील ३४ गावात पुराचे पाणी शिरते. यामुळे नागरिकांचा इतर गावासोबतचा संपर्क तुटतो. यात गुरे वाहून जाणे, शेतातील पीक वाहून जाणे अशा घटना घडतात. लाखांदूर तालुक्यात चुलबंद नदीच्या काठावरील कोच्छी, जैतपूर, दांडेगाव, मांढर, आष्टी, आवळी, किन्हाळा, लाखांदूर, चप्रश्नड या गावात पुराचे पाणी शिरते. यातील आवळी बेट या गावाचे पुनर्वसन करण्यासाठी दोन वर्षापूर्वी जागा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु, गावकऱ्यांनी तिथे स्थलांतर केले नाही. मोहाडी तालुक्यातील मुंढरी आणि लगतच्या गावातील नागरिकांना स्थलांतर करावे लागते.
तुमसर तालुक्यातील बपेरा आणि जवळची गावे तसेच लाखांदूर तालुक्यातील खैरना, मोहरना, दोनाड, गवराळा इत्यादी गावातील नद्यांचे पात्र विस्तारत आहे. यामुळे नदीकाठावरील शेताचे क्षेत्र घटत आहे. त्याचा पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो. मात्र, याबाबत कायम उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत. नदीकाठावर शेतकऱ्यांनी खोदलेल्या विहिरी आता नदीच्या पात्रात दिसत आहेत. नद्या दरवर्षी शेतीचे क्षेत्र गिळंकृत करीत आहेत. त्यामुळे आणि नेहमीच्या पुरामुळे गावकऱ्यांना पावसाळ्यासाठी अन्नधान्याची सोय करावी लागते. प्रशासनाद्वारे धोक्याची सूचना मिळाल्यावर सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येते. यात शेतातील पिके आणि कामधंद्यातील उत्पन्न बंद होते. शिबिरात आल्यावर मुलांचे शिक्षण सुद्धा बंदच असते. १९९४ ला वैनगंगा नदीला सात वेळा पूर आला होता. एखाद्या वर्षी दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नदीला पूर आला तर संबंधितांची आर्थिक स्थिती बदलते. त्यानंतर प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीचा आधार घ्यावा लागतो. दरम्यान भंडारा जिल्ह्य़ात ८ जुलै ते १० जुलैपर्यंत पडलेल्या पावसाने शेतकरी सुखावला असून, शेतीच्या कामाला आता वेगाने प्रश्नरंभ झाला आहे. नर्सरीची कामे ८० टक्केपर्यंत पूर्ण झाली असून जिथे सिंचनाची सोय आहे त्याठिकाणी रोवणी सुरू झाली आहेत. यानंतर दिवसेंदिवस मजुरीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे लवकरात लवकर रोवणी आटोपण्याकरता शेतकरी उत्सुक आहेत. जिल्ह्य़ात १ जून ते १० जुलै ०९ पर्यंत १४०१.६ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी २००.२ मि.मी. आहे. १० जुलै ला पडलेला पाऊस तालुकानिहाय भंडारा ३.३ मि.मी., मोहाडी ३.५ मि.मी., तुमसर १२.४ मि.मी., पवनी २ मि.मी., साकोली १.५ मि.मी. असा एकूण २४.७ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ३.५ एवढी आहे.