Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

बुलढाणा जिल्ह्य़ात साडेसहा लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण
बुलढाणा, १२ जुलै / प्रतिनिधी

उशिरा का होईना जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पेरण्यांनी जोर धरला आहे.

 

जिल्ह्य़ात ८ जुलैपर्यंत साडे सहा लाख हेक्टरवर पेरण्या आटोपल्या असून कपाशीचा पेरा २ लाख १८ हजार २६० हेक्टर एवढा झाला आहे.
मागील खरीप हंगाम अत्यल्प व अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातून निघून गेला होता. जिल्ह्य़ातील मोताळा व बुलढाणा हे दोन्ही तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यावर्षीच्या हंगामाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने रुसवा धरल्यामुळे यंदाचा खरीप हंगामही धोक्यात येण्याची चिन्हे होती. मात्र, गेल्या आठ दिवसात पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे पेरण्यांनी वेग धरला आहे. ६ जुलैपर्यंत केवळ ६ लाख ९६ हजार हेक्टरवर असलेली पेरणी दोनच दिवसात साडे सहा लाख हेक्टरवर गेली आहे.
जिल्ह्य़ात सर्वाधिक पेरणी नांदुरा तालुक्यात १०८ टक्के झाली आहे. तर बुलढाणा ७५ टक्के, चिखली ९१, देऊळगावराजा ८०, सिंदखेडराजा ९३, लोणार ९२, मेहकर ५३, मोताळा ८४, संग्रामपूर १०५ टक्के, मलकापूर १०१, खामगाव ११७, शेगाव ८२, जळगाव जामोद ९४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे उडीद, मुगाचा पेरा कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजपर्यंत २७ हजार ४१५ हेक्टरवर उडीद तर २७ हजार ४३५ हेक्टरवर मुगाचा पेरा झालेला आहे.
कपाशीचा २ लाख १८ हजार २६० हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे. १ लाख ८७ हजार ६०९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा सर्वाधिक पेरा झालेला आहे. अवर्षणग्रस्त असलेल्या मोताळा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने निपाणा, दहीगाव, आव्हा, सावरगाव, जहाँगीर या परिसरात जमीन खडून गेली आहे. जिल्ह्य़ात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरण्यांनी वेग धरला आहे. येत्या दोन दिवसांत सर्व पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.