Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

वेडगाव प्रश्नथमिक शाळेत विद्यादानाचे काम बंद
चंद्रपूर, १२ जुलै/प्रतिनिधी

शिक्षण विभागाने शाळेतील रिक्तजागांवर शिक्षकांची नियुक्ती न केल्याने पालकांनी मुलांना शाळेत

 

पाठवणे बंद केल्यामुळे मागील सहा-सात दिवसांपासून तालुक्यातील वेडगाव येथील जिल्हा परिषद प्रश्नथमिक शाळेतील विद्यादानाचे काम बंद आहे.
वेडगाव प्रश्नथमिक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. येथील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, अशी मागणी करीत येथील संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकले, तरी शिक्षण विभागाने अजूनपर्यंत मागणीची दखल न घेतल्याने पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यादानाचे काम ठप्प झाले आहे.
गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वेडगाव येथील जिल्हा परिषद प्रश्नथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. या शाळेत सात शिक्षकांची नियुक्ती आहे. मात्र, त्यातील दोन शिक्षकांची बदली मागील सत्रात, तर एका शिक्षकांची बदली चालू सत्रात करण्यात आली. त्यामुळे येथील तीन जागा रिक्त झाल्या आहेत. येथे रिक्त असलेल्या एकाही जागेवर शिक्षक नियुक्त करण्यात आला नाही. सद्यस्थितीत येथील चार शिक्षकच पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य करीत आहेत. शिक्षक कमी असल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, या मागणीचे एक निवेदन काही दिवसांपूर्वीच संवर्ग विकास अधिकाऱ्यांना पालकांच्या वतीने सादर करण्यात आले होते. मात्र, या निवेदनाला गांभीर्याने न घेतल्याने अखेर येथील संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला होता. शिक्षण विभागाच्या विरोधात एवढे मोठे आंदोलन होऊनही या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शिक्षण विभागाचा एकही अधिकारी येथे फिरकला नाही, त्यामुळे पालकवर्गामध्ये पुन्हा असंतोष उफाळून आला आणि त्यांनी चक्क मुलेच शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
जोपर्यंत येथील शिक्षकांची रिक्त पदे भरली जात नाही, तोपर्यंत शाळेत पाल्यांना पाठवले जाणार नाही, अशी पालकांनी भूमिका घेतली आहे. या गंभीर समस्येवर शिक्षण विभागाचे अधिकारी कोणती भूमिका घेतात, यावर या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अवलंबून आहे.