Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

व्यवस्था बदलाशिवाय भ्रष्टाचाराचा अंत नाही -अण्णा हजारे
कारंजा-लाड, १२ जुलै / वार्ताहर

भ्रष्टाचार निर्मूलन जनआंदोलन ही परिवर्तनवादी चळवळ आहे. जोपर्यंत आजची व्यवस्था बदलत

 

नाही तोपर्यंत भ्रष्टाचार संपणार नाही. ही व्यवस्था बदलविणे आपल्यासारख्या सामान्यांच्या हाती आहे. त्यासाठी आपले हक्क व अधिकार याची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
महेश भवनात भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. न्यासचे जिल्हा अध्यक्ष अविनाश पसारकर, उपाध्यक्ष विजय काळे, गजानन अमदाबादकर यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी अण्णा हजारे पुढे म्हणाले, स्वातंत्र्योत्तर ६० वर्षात गुंडगिरी, दडपशाही आणि दहशतवाद वाढला आहे. ज्यांना लोकसेवक म्हणून आपण निवडून देतो तेच आपले मालक म्हणून वागतात व जनसामान्यांच्या समस्यांकडे पाठ फिरवतात. निवडून येण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करायचे आणि नंतर ते वसूल करायचे यातच ते गुंतून पडतात. मंत्रालय हे भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे म्हणूनच चारित्र्य संपन्न, समाजसेवी उमेदवारांना निवडून देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
अनेक वर्षाच्या आंदोलनानंतर माहिती अधिकाराचा कायदा लागू झाला. हा कायदा भ्रष्टाचार निर्मूलनाचे शस्त्र आहे. या कायद्याने जनसामान्यांना व्यापक अधिकार प्रश्नप्त झाले आहेत. त्याची अनेकांना माहिती नाही. ती व्हावी म्हणून जनजागृतीचे व्रत घेऊन मी फिरतो आहे, असे स्पष्ट करून अण्णा हजारे म्हणाले, आतापर्यंत ७० तालुक्यात सभा झाल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी समस्यांची निवेदने दिली. माहिती अधिकार कायद्याचा वापर आपण केला तर अनेक समस्या निकालात निघतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कायद्याचा उपयोग काही कार्यकर्ते अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंगसाठी करतात, अशा तक्रारी आहेत. पण, अधिकाऱ्यांनी आपले काम स्वच्छ व पारदर्शी ठेवले तर अशा घटनांना वावच मिळणार नाही, असे सांगून हजारे म्हणाले, समाजातील चांगल्या युवकाची आम्हाला गरज आहे. स्वच्छ व समाजसेवी तरुणांनी या चळवळीत यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
माहितीचा अधिकारांतर्गत मागितलेली माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली नाही तर त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा वरिष्ठांना अधिकार आहे, असे स्पष्ट करून ग्रामसभेला असलेले महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
भ्रष्टाचाराचा उगम मंत्रालयात असून आतापर्यंत ६ कॅबिनेट मंत्र्यांच्या विकेट मी घेतल्याचेही अण्णा म्हणाले. पतसंस्था व काही बँका बुडाल्याने ठेवीदारांना अनेक आपत्तीना तोंड द्यावे लागत आहे. त्याबाबत सरकारने ठोस कारवाई करून ठेवीदारांच्या ठेवी परत द्याव्यात. यासाठी १ ऑगस्ट ०९ रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. अण्णांच्या हस्ते न्यासचे उपाध्यक्ष विजय काळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. श्याम सवई यांनी संचालन केले.