Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

गोसीखुर्दचे पाणी बोगद्यातून चिमूर तालुक्यात ; योजनेचे आज भूमिपूजन
चंद्रपूर,१२ जुलै/ प्रतिनिधी

गोसीखुर्द धरणाचे पाणी बोगदा तसेच कालव्याद्वारे चिमूर विधानसभा मतदारसंघात सिंचनासाठी

 

उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याच्या जलसंपदा खात्याने घेतला असून सुमारे पाचशे कोटी रुपये खर्चाच्या या योजनेचे भूमिपूजन उद्या, सोमवारी जलसंपदा मंत्री अजित पवार व राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे. यामुळे या मतदारसंघातील चाळीस हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ होणार आहे.
पूर्व विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या गोसीखुर्द धरणात यावर्षीपासून पाणी अडवण्यास सुरुवात झाली आहे. या धरणाचा सर्वाधिक लाभ जिल्हय़ातील ब्रह्मपुरी, नागभीड, सावली, सिंदेवाही व मूल तालुक्यातील जमिनीला होणार आहे. जलसंपदा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने आता त्यात चिमूर तालुक्याची भर पडली आहे.
या धरणाच्या उजव्या कालव्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. शिवाय धरणातील पाणी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून इतर भागात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यापैकी लालनाला व मोकाबर्डी या दोन प्रकल्पांचे भूमिपूजन उद्या, सोमवारी आमडी व भिसी येथे अजित पवार व विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
जिल्हय़ाचा विचार करता सिंचनाचा सर्वाधिक अनुशेष चिमूर तालुक्यात होता. या पाश्र्वभूमीवर सोमवारपासून कामाला सुरुवात होणाऱ्या या दोन प्रकल्पामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना भविष्यात मोठा दिलासा मिळणार आहे.
लालनाला प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेद्वारे खडसंगी भागातील आमडी, खुर्सापार, बोथली, वहाणगाव, चिचघाट, सावली, माकोना, खाणगाव, भिवकुंड, खापरी, गुजगव्हाण, मुरपार या बारा गावांमधील आठ हजार २०० हेक्टरला पाणी मिळणार आहे. मोकाबर्डी उपसा सिंचन योजनेंतर्गत वडाळा, मेटेपार व नवताळा कालवे खोदण्यात येणार असून यामुळे १०५ गावांमधील ३२ हजार ५०० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.
वडाळा कालव्यावर १८० कोटी, मेटेपारवर १७० कोटी तर नवताळावर ५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. लालनाला प्रकल्पावरील उपसा सिंचन योजना ८० कोटी रुपये खर्चून उभारली जाणार आहे. मोकाबर्डी योजनेंतर्गत खोदण्यात येणाऱ्या कालव्यांचा काही किलोमीटरचा भाग बोगद्याच्या स्वरूपात राहणार आहे. जलसंपदा विभागातर्फे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडून प्रथमच बोगद्यातून पाणी वाहून नेण्याचा प्रयोग केला जाणार आहे.
उद्या, सोमवारी सकाळी ११ वाजता आमडी येथे पहिल्या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असून यावेळी अजित पवार व विजय वडेट्टीवार यांच्यासह खासदार मारोतराव कोवासे, आमदार संजय देवतळे, आमदार राजू तिमांडे, पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष वामनराव कासावार व आमदार सुलभा खोडके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच पाहुण्यांच्या हस्ते दुपारी २ वाजता मोकाबर्डी प्रकल्पाचे भूमिपूजन भिसी येथे होणार आहे. कार्यक्रमांना परिसरातील शेतकऱ्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चिमूर तालुका काँग्रेस समितीच्यावतीने करण्यात आले आहे.