Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अकोल्यात भाजपने घेतल्या ३२ हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या
* महापौरांची भाजपवर टीका
* नव्या राजकीय वादाला सुरुवात
अकोला, १२ जुलै/ प्रतिनिधी
महापौरांच्या राजीनाम्याची मागणी करीत भाजपने अकेाल्यातील स्वाक्षरी मोहीम तीव्र केली आहे.

 

गेल्या तीन दिवसात शहरातील ३२ हजार नागरिकांनी स्वाक्षऱ्या दिल्या असून भाजपच्या मोहिमेमुळे अकोल्यात महापौर विरुद्ध भाजप अशा राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. भाजपवर टीका करीत आमदारांच्या कामाचा लेखाजोखा महापौरांनी मागितल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसापासून अकेाला महापालिको ही जणू कुस्तीचा आखाडा झाली आहे. पाणीपुरवठा योजनेतील देयकांवरुन मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनीच सर्व साधारण सभेत ठिय्या आंदोलन केल्यामुळे सत्तेतील मतभेदांची दरी उघड झाली. त्यानंतर अलिकडेच महापौरांचा आयुक्तांशी झालेल्या वादानंतर महापालिकेतील घडामोडींना वेग आला. भाजप-शिवसेनेच्या सदस्यांनी विविध गैरप्रकारांवरून महापौरांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच शहरात विविध ठिकाणी याविरुध्द स्वाक्षरी मोहीमही राबविण्यास सुरुवात केली. या मोहिमेत आतापर्यंत ३२ हजार नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्याची माहिती भाजपचे नगरसेवक गिरीश जोशी यांनी दिली.
नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविण्यात येणार आहे. भाजपच्या मोहिमेमुळे महापौर मदन भरगड अस्वस्थ झाले आहेत. शनिवारी पत्रकार परिषेदत त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. ज्या मुद्यांवर भाजपने स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे, त्या मुद्यांवर सभागृहात मात्र त्यांनी विरोध नोंदविला नाही, असा आक्षेप त्यांनी घेतला. त्यामुळे भाजपची मोहीम नागरिकांची दिशाभूल करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांना जनतेने सतत तीनदा संधी देऊनही त्यांनी शहराचा विकास केला नाही. त्यांनी कामांची माहिती जनतेला द्यावी, असे आवाहनही मदन भरगड यांनी केले. आरोपांच्या भोवऱ्यात महापौर अडकले आहेत. आयुक्तांनी त्यांच्याविरुद्ध पेालीस तक्रार केली आहे. प्रदेश काँग्रेसने या प्रकाराची दखल घेतली आहे. त्यामुळे महापौर अडचणीत येणार असल्याचे संकेत आहेत.