Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

वर्धेचा ‘आदर्श रेल्वेस्थानक’ योजनेत समावेश करण्याची मागणी
वर्धा, १२ जुलै / प्रतिनिधी

गांधी- विनोबांच्या आश्रमांमुळे जागतिक पर्यटनाचे केंद्र ठरलेल्या वर्धा रेल्वे स्थानकाचा ‘आदर्श

 

स्थानक’ योजनेत समावेश करावा व अन्य मागण्या खासदार दत्ता मेघे यांनी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना प्रत्यक्ष भेटून केल्या. या मागण्यांना अंतिम रेल्वे संकल्पात प्रश्नधान्य देण्याचे आश्वासन बॅनर्जी यांनी यावेळी दिले.
रेल्वे अर्थसंकल्पाबाबत ममता बॅनर्जी यांची मेघेंनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले. यावेळी मागण्यांचे निवेदन देतानाच यापूर्वी पत्राद्वारे या मागण्यांचा पाठपुरावा केल्याचे त्यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
गांधीभूमी म्हणून प्रसिद्ध असलेला वर्धा जिल्हा हा रेल्वेमार्गाने देशातील प्रमुख शहरांशी जोडल्या गेला आहे. हा विकास गांधी-विनोबांच्या आश्रमस्थळास पर्यटन केंद्राचे महत्त्व असल्यानेच झाला, असे नमूद करीत मेघेंनी आणखी काही नव्या सोयींची मागणी केली.
यावेळी अर्थसंकल्पात वर्धा-यवतमाळ -नांदेड ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी तरतूद नसल्याने ती त्वरित व्हावी, अशी मागणी मेघे यांनी यावेळी केली. आर्वी-पूलगाव व यवतमाळ-मूर्तीजापूर नॅरोगेज रेल्वेमार्ग एकमेकांना जोडतानाच ब्रॉडगेजशी संलग्न क रावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. १९९१ ला मंजुरी मिळालेल्या नरखेड-बडनेरा मार्गाच्या कार्यास त्वरित चालना दिल्यास संत्राउत्पादक देशातील महानगरांशी जोडल्या जाईल. त्यांना व्यापार करणे फोयदेशीर ठरेल.
वर्धा शहरातील उड्डाणपूल अरूंद असल्याने वाहतुकीची कोंडी हा गंभीर प्रश्न ठरला आहे. शहरातील याच पुलावरून हैद्राबाद, चंद्रपूर, यवतमाळ, धुळे व औरंगाबादच्या दिशेने मोठी वाहतूक होते. अरूंद पुलामुळे वाहतूक ठप्प होऊन रुग्ण, गावकरी, कापूस उत्पादक, कर्मचारी वर्ग, पोलाद प्रकल्पातील कामगार वर्ग, शाळेचे विद्यार्थी यांना तासन्तास तिष्ठत बसावे लागते. उड्डाणपुलाच्या रूंदीकरणाचे काम त्वरित मार्गी लावण्याची आग्रही मागणी मेघेंनी केली. वर्धा रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण व विस्तार क रून पर्यटकांना दिलासा द्यावा, स्थानकाच्या दोन्ही बाजूला आरक्षण केंद्र, कॅन्टीन, पार्सल सुविधा सुरू करावी, आश्रमस्थळांचे महत्त्व लक्षात घेऊन जलद गाडय़ांना थांबा द्यावा,‘गांधीग्राम’ व ‘अजमेर शरीफ एक्सप्रेस’ अशा दोन नव्या गाडय़ा सुरू करण्याची मागणीही मेघेंनी केली आहे. या मागण्यांवर विचार करण्यात येऊन त्या अंतिम अर्थसंकल्पात समाविष्ट केल्या जातील, असे आश्वासन मेघेंना रेल्वेमंत्र्यांनी दिले.