Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी बुलढाण्यातील रस्ते, विश्रामगृह झाले चकाचक
बुलढाणा, १२ जुलै / प्रतिनिधी

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा १७ जुलै बुलढाणा व चिखली दौरा निश्चित होताच जिल्हा

 

प्रशासनासह नगरपालिकेने शहरातील रस्ते विकास कामांचा एकच धडाका सुरू केला आहे. रात्रंदिवस रस्त्याचे डांबरीकरण, वॉल कंपाऊंडचे बांधकाम, विश्रामगृहाची रंगरंगोटी आणि ज्या ठिकाणी सत्कार सोहोळा आयोजित करण्यात आला आहे त्या ठिकाणच्या साफसफाईवर अधिक भर देण्यात येत आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे रस्त्यांचे भाग्य उजळले आहे. कित्येक वर्षापासून खड्डय़ात सापडलेल्या रस्त्यासह विविध विकास कामांच्या निविदा काढण्याचा जिल्हा प्रशासनासह नगरपालिका प्रशासनाने झपाटा सुरू केला आहे. प्रशासनाच्या वतीने सध्या युद्धपातळीवर रस्त्याचे डांबरीकरण, वॉल कंपाऊंड बांधकाम, विश्रामगृहाची रंगरंगोटी करण्यात येत आहे. कित्येक वर्षापासून शहरातील खड्डय़ात हरवलेल्या काही रस्त्यांचे भाग्य राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे उजळले आहे. एका रात्रीतून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. वास्तविक पाहता शासनाच्या नियमानुसार कोणत्याही रस्त्याचे पावसाळ्यात डांबरीकरण करण्यात येऊ नये, असे आदेश आहेत परंतु, या आदेशाला पायदळी तुडवून रस्त्यांची कामे करण्यात येत आहे.