Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कृषी केंद्र चालकांकडून खताची जादा दराने विक्री
बुलढाणा, १२ जुलै / प्रतिनिधी

नांदुरा तालुक्यात निमगावसह ग्रामीण भागात कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट

 

करण्यात येत आहे. खताच्या एका बॅगसाठी ५० ते ६० रुपये जादा दर आकारला जात असून खरेदी खताची पावती मात्र निर्धारित दरानेच दिली.
खत विक्रेत्यांकडून बाजारत अल्पसा साठा दाखवून रासायनिक खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. दुकानात किंवा गोदामात खत उपलब्ध नाही. शेतकरी डीएपी खताची मागणी करीत आहेत. त्यामुळे या खताचे भाव कृषी केंद्र मालकांनी वाढवून दिले आहे. दुकानदारांकडून दिवसा बुकिंग करायची आणि सायंकाळी सात वाजेनंतर त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून इतर ठिकाणी ठेवलेले खत देण्यात येत आहे. अगोदरच विलंबाने आलेल्या पावसामुळे मूग, उडीद ही नगदी पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत. पावसाअभावी टप्प्याटप्प्याने पेरण्या होत आहेत. सोयाबीनचा पेरा वाढला आहे. पेरणीकरिता खताची गरज भासते. केंद्र सरकारकडून रासायनिक खतासाठी ८० टक्के अनुदान कंपन्यात देण्यात येते. तरीदेखील कृषी केंद्रावर खताचा काळाबाजार केला जातो, अशी तक्रार आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून शेतकऱ्यांना होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.