Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

अमरावती विभागातील धरणांमध्ये १४ टक्के साठा
अप्पर वर्धा प्रकल्पाच्या साठय़ात ६ टक्के वाढ

अमरावती, १२ जुलै / प्रतिनिधी
अमरावती विभागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे या धरणांमधील जलसाठा १४ टक्क्यांवर स्थिरावला असून सर्वात मोठय़ा अप्पर वर्धा प्रकल्पाच्या पाणीसाठय़ात गेल्या आठवडाभराच्या पावसानंतर सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सामान्यांच्या समस्या समजून घेणारा लोकप्रतिनिधी
संजय राऊत

स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करण्याचा दांडगा अनुभव असल्याने आमदार भैरसिंग नागपुरे अगदी शेवटच्या माणसाच्या समस्या समजून घेऊन त्या मार्गी लावण्यात अग्रेसर आहेत. विरोधी बाकावर असूनदेखील शासकीय योजनांची माहिती असल्यामुळे मतदारसंघाकरता अनेक विकास कामे खेचून आणण्यात आमदार भैरसिंग नागपुरे यशस्वी झाले. आमदार भैरसिंग नागपुरे यांनी रस्ते, समाजमंदिर, हातपंप, अशी अनेक कामे विविध भागात करून नागरिकांना खूष केले आहे.मतदारसंघातील चिचगड, ककोडीच्या लोकांना न्यायालयीन कामासाठी ९५ कि.मी.वरील साकोलीला जावे लागत होते.

अंगणवाडी सेविका व ग्रामरोजगार सेवकांचे धरणे
बुलढाणा, १२ जुलै / प्रतिनिधी

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचारी संघटना म.रा.ग्राम रोजगार सेवक संघटना, जिल्हा प्रेरक संघटनेच्या सदस्यांनी नुकतेच धरणे धरले. जिल्ह्यामध्ये ८५५ ग्रामपंचायतीमध्ये अद्यापही ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आली नाही. ग्राम विकासाचा महत्त्वाचा घटक असणाऱ्या नेमलेल्या ग्राम रोजगार सेवकाला नियुक्ती पत्र नाहीत, मानधन नाही, रोहयो मोजक्या गावात राबवली जाते. अवर्षनाचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या भागात लोकांना बेरोजगार ठेवण्यात येते.

गोरेगावात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा
गोंदिया, १२ जुलै / वार्ताहर

सामान्य कार्यकर्त्यांच्या शक्तीमुळेच काँग्रेस शक्तिशाली झाली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी व पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मजबूत होत आहे, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. गोरेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने आयोजित तालुका कार्यकर्ता मेळावा व नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांच्या सत्कार सोहोळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी पुरुषोत्तम कटरे यांनी पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्वाच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगितले.

लालबहादूर शास्त्री विद्यालयात विद्यार्थ्यांनी केला शिक्षकांचा सत्कार
भंडारा, १२ जुलै / वार्ताहर

स्थानिक लालबहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार केला. या प्रसंगी अभिषेक चौधरी, आशीष टांकसाळे, करिश्मा राऊत, शुभम मशीदकर, नीलेश गायधनी आणि रोशन खेताडे यांनी ‘गुरू’ या विषयावर विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रश्नचार्य श्रीराम पारधी होते.

‘सीबीआय’ चौकशीने धान्य व्यापारी हादरले
गोंदिया जिल्ह्य़ात उघडकीस आलेल्या निकृष्ट धान्य पुरवठय़ाचे प्रकरण सीबीआयच्या ताब्यात गेल्याने येथील निकृष्ट तांदळाचा व्यापार करणाऱ्या व्यापारी व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रयोगशाळेतील तपासणी अहवालावर पुढील कार्यवाही अवलंबून असल्याने या अहवालाकडे व्यापाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. गेल्या महिन्याच्या २० जून ला माजी खासदार शिशुपाल पटले यांनी चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर यांना सौंदड येथील धान्य गोदामातून निघालेल्या तांदळाच्या एका ‘रॅक’मध्ये निकृष्ट दर्जाचे तांदूळ असण्याची व पोत्यामधील वजन ५० किलो पेक्षा कमी असण्याची माहिती भ्रमणध्वनीवर दिली होती.

विधानसभेच्या ३ जागांसाठी काँग्रेसमध्ये ३० इच्छुक
भंडारा, १२ जुलै / वार्ताहर

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्ष निरीक्षक म्हणून येथे आलेल्या कृषीमंत्री बाळासाहेब थोरात आणि ठाकूरदास मालवानी यांच्या समक्ष जिल्ह्य़ातील तीन विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाच्या ३० इच्छुकांनी आपली दावेदारी सादर केली.

बल्लारपूर पेपर मिलमधील दुर्घटनेची चौकशी सुरू
चंद्रपूर, १२ जुलै/प्रतिनिधी

थापर ग्रुपच्या बल्लारपूर पेपर मिल उद्योगात शुक्रवारी झालेल्या अपघातात तीन मजूर जबर जखमी झाले. या घटनेची माहिती होताच जलसंपदा राज्यमंत्री विजय वडेट्टीवारांनी पेपर मिलला भेट देऊन घटनेची चौकशी केली. कोसळलेल्या ‘स्लॅब’चे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करून या प्रकरणात व्यवस्थापन दोषी आढळल्यास कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांना दिली.

कोल वॉशरीजमधून कोळशाची चोरी; आठ कर्मचारी निलंबित
भद्रावती, १२ जुलै / वार्ताहर
येथील देऊळवाडा गुप्ता कोल वॉशरीजमधील काही कर्मचाऱ्यांनी संगनमत करून चालवलेल्या कोळसा चोरीचा कंपनीच्या खाजगी सुरक्षांनी उघडकीस आणल्याने या चोरीत सहभागी आठ कर्मचाऱ्यांना कंपनीने तात्काळ निलंबित केले आहे. ही चोरी लाखो रुपयांच्या घरात जात असल्याची चर्चा कामगार वर्गात आहे परंतु, कंपनीने पोलिसात तक्रार न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची तिसरी तुकडी रवाना
गोंदिया, १२ जुलै / वार्ताहर

अमरनाथ येथील हिमशिवलिंगाच्या दर्शनासाठी येथून भाविकांची तिसरी तुकडी गोंडवाना एक्सप्रेसने रवाना झाली. या भाविकात गजाधर शर्मा, शांती शर्मा, रमेश अग्रवाल, गोविंद शर्मा, राधा शर्मा, ज्योती शर्मा, अनिता शर्मा, सोनल अग्रवाल, शुभम् शर्मा, यश शर्मा व राहुल शर्मा यांचा समावेश आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावर बाबा अमरनाथ सेवा समितीचे पदाधिकारी शरद क्षत्रिय, गुलाब बोपचे, डॉ.के.पी. जयपुरिया, डॉ. निर्मला जयपुरिया, दिलीप चौरागडे, रुपेश निम्बार्ते, संजय टाह, दिनेश मिश्रा, आनंद रघुवंशी, पन्नालाल मचाडे, राजेश रघुवंशी, वामन तांबोली, कल्पेश यादव यांनी त्यांचे स्वागत करून निरोप दिला.

भ्रष्टाचारावर कुठाराघात करणारे माहिती अधिकार हे महाअस्त्र
दारव्हा, १२ जुलै / वार्ताहर

वाढत्या भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी माहितीचा अधिकार हे एक महाअस्त्र असल्यामुळे या अधिकाराचा वापर जनहितार्थच करावा, असे आवाहन अण्णा हजारे यांनी येथील बचत भवनात आयोजित सभेत केले. देशात वाढते वैचारिक प्रदूषण आणि स्वार्थ भ्रष्टाचारास खत-पाणी घालत असल्यामुळे स्वातंत्र्यात भ्रष्टाचारास आळा न बसता वाढूच लागला आहे. जनतेत या अधिकारा संबंधीची जागरूकता असणे आणि लोकहितार्थ या अधिकाराचा वापर केल्यास भ्रष्टाचारास आळा बसल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

खामगावात कामगार योग प्रशिक्षण शिबीर
खामगाव, १२ जुलै / वार्ताहर
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र सुटाळपुरा येथे झालेल्या दहा दिवसीय कामगार योग प्रशिक्षण शिबिराचा समारोप यश एन्टरप्रश्नईजेस एम.आय.डी.सी.च्या सभागृहात झाला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शशांक कस्तुरे, संजय बिस्सा आदी उपस्थित होते . संचालन पंजाबराव देशमुख यांनी केले.

ग्रामसेवकास मारहाण; आंदोलनाचा इशारा
मानोरा, १२ जुलै / वार्ताहर
ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवकास जबर मारहाण केल्याच्या घटनेमुळे ग्रामसेवक संतप्त झाले असून संघटनेने काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. मानोरा पंचायत समिती अंतर्गत आमगव्हाण येथील ग्राम सचिव सचिन गणपत तसर यांना त्यांच्या घरी जाऊन ग्रामपंचायत सदस्य नीलेश भीमराव कानोडे व चंदू रामराव भगत यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत सचिन तसर हे जबर जखमी झाले आहेत. आरोपींना अटक करावी अन्यथा काम बंद करण्यात येईल, असा इशारा ग्रामसेवक संघटनेने उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

वृद्धाची आत्महत्या
खामगाव, १२ जुलै / वार्ताहर
वनारे ले-आऊटमधील रामेश्वर राजाराम राहणे (६०) यांनी आत्महत्या केली. ते निवृत्त एस.टी. कर्मचारी होते.

साथीच्या रोगाने नागरिक बेजार
आर्णी, १२ जुलै / वार्ताहर
परिसरात साथीच्या रोगात वाढ झाली असून अतिसार, मलेरिया, ताप, टायफाईड आदी रोगांनी नागरिक बेजार झाले आहेत. पाऊस झाल्यानंतर पाणीपुरवठा यंत्रणेवर मोठा परिणाम झाला आहे.
बऱ्याच ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रोगात मोठी वाढ झाली आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने मलेरियासारख्या गंभीर आजाराने डोके वर काढल्याने तालुक्यातील अनेक गावात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. साथीचे रोग मोठय़ा प्रमाणात वाढले. याबाबत तात्काळ उपाययोजना करावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

नेनुमल चावरी यांचे निधन
पांढरकवडा, १२ जुलै / वार्ताहर
येथील नेनुमल उत्तमचंद चावरी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षाचे होते. गुरुनानक सेवा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे. मोक्षधामवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टपाल कर्मचाऱ्यांचा खातेदारास गंडा
यवतमाळ, १२ जुलै / वार्ताहर
येथील टपाल विभागातील मुख्य अभिकर्त्यां महिलेने विभागातीलच दोन सहाय्यक महिला कर्मचाऱ्यांशी संगनमत करून एका खातेदाराच्या आवर्ती ठेव योजनेतील ६३ हजार रुपये बनावट कागदपत्रे तयार करून काढल्याची तक्रार आहे. खातेदार व टपाल खात्याची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सहायक टपाल अधीक्षक मनोहर लाखोरकर यांच्या तक्रारीवरून टपाल विभागातील तीन महिला कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.

परस्पर डाळ विकणारे आरोपी गजाआड
खामगाव, १२ जुलै / वार्ताहर

साडेपाच लाखांच्या तूर डाळी अफरातफर प्रकरणी आणखी दोन आरोपींना शहर पोलिसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले आहे. नांदुरा येथील व्यापारी मूलचंद रामपाल खंडेलवाल यांनी खामगाव येथील गुरुनानक ट्रान्सपोर्टच्या ट्रकमध्ये ५ लाख २३ हजार २०० रुपये किंमतीची १६० क्िंवटल तूर डाळ कटनी येथे १७ डिसेंबर २००८ रोजी पाठवली होती मात्र, नियोजित स्थळी तूर डाळ न पोहोचल्यामुळे खंडेलवाल यांनी खामगाव ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपींना पांढरकवडा पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी या चोरीची कबुली दिली. लकीबुटा महेंद्रसिंग बलवीरसिंग भाट, टिंगु ऊर्फ सतपालसिंग मदनसिंग रैना (नागपूर) यांना अटक करण्यात आली. खामगाव पोलिसांनी या दोघांची पोलीस कोठडी मिळवल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून ट्रकमालक चालक रामचंद्र सखलदेव यादव, अग्रसिंग गिदारसिंग हाजरा (नागपूर) यांना अटक करण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीचे इसरकांचे सदस्यत्व रद्द
गोंदिया, १२ जुलै / वार्ताहर
जिल्हा नियोजन व विकास समितीवर बिनविरोध निवडून आलेल्या माजी नगराध्यक्ष सविता इसरका यांचे सदस्यत्व रद्द ठरले आहे. विभागीय आयुक्त आनंद लिमये यांनी त्यांचे सदस्यत्व अवैध घोषित केले आहे. जिल्ह्य़ांच्या विकासकामांच्या मंजुरीकरता सर्वाधिक महत्त्वपूर्ण असणाऱ्या या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री आहेत. समितीच्या सचिवपदी जिल्हाधिकारी व जिल्ह्य़ातील खासदार व आमदार पदसिद्ध सदस्य असतात. याशिवाय २६ जिल्हा परिषद सदस्य व ४ नगरपालिका सदस्यांची निवड या समितीवर करण्यात येते.काही तांत्रिक चुकींमुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुदर्शना वर्मा यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला होता, तर सविता इसरका यांचा अर्ज वैध ठरवून त्यांची समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. या विरोधात दाखल याचिकेवर निर्णय देत विभागीय आयुक्त आनंद लिमये यांनी सविता इसरका यांची निवड अवैध घोषित करून त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.