Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

विविध

संपत्तीसाठी झाली मायकेलची हत्या
मायकेल जॅक्सनच्या बहिणीचा दावा
लंडन, १२ जुलै/पी.टी.आय.
‘किंग ऑफ पॉप’ मायकेल जॅक्सन याच्या मृत्युबाबतच्या गुढ वलयाला आणखी नवे वळण लागले असून, संपत्तीसाठी मायकेलची हत्या झाल्याचा दावा त्याची बहीण ला टोया हिने केला आहे. मायकेलच्या मृत्यूमागे हत्या असल्याच्या संशयावरून आपण आधी चौकशी करीत असल्याचे लॉस एंजेलिस पोलिस प्रमुखांनी मान्य केल्यानंतर दोनच दिवसांनी मायकेलच्या बहिणीकडून हा दावा करण्यात आला आहे.

मुख्याध्यापकांचा .."ढोल बाजे."
शाजापूर (मध्यप्रदेश), १२ जुलै / पी.टी.आय.

मध्य प्रदेशमधील गुराडिया गावात सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात गटशिक्षण अधिकाऱ्याने सदर मुख्याध्यापक शाळा सोडून लग्न समारंभात ढोल वाजवायला गेल्याचे आढळून आल्याने कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. रामलाल रंधवाल असे या मुख्याध्यापकाचे नाव असून संगीतावरील आत्यंतिक प्रेम त्यांना स्वस्था बसू देत नाही.

केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंदन यांना पॉलिट ब्युरोतून डच्चू
विजयन मात्र बचावले
नवी दिल्ली, १२ जुलै / पीटीआय
केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षात सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी माकपने आज ज्येष्ठ नेते व केरळचे मुख्यमंत्री व्ही.एस.अच्युतानंदन यांना पॉलिट ब्युरोमधून काढून टाकले. संघटनात्मक तत्त्वांचे तसेच शिस्तीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

चीन भारतावर हल्ला करणार?
नवी दिल्ली, १२ जुलै/पीटीआय

अनेक अंतर्गत समस्यांनी ग्रस्त असलेला चीन नैराश्यातून इ.स. २०१२ पर्यंत भारतावर हल्ला करण्याची शक्यता आहे, या हल्ल्यात भारताच्या ईशान्येकडील भागाचा ताबा घेण्याचा त्यांचा इरादा आहे, असे मत इंडियन डिफेन्स रिव्ह्य़ू या नियतकालिकाचे संपादक भारत वर्मा यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी आगामी अंकाच्या संपादकीयात म्हटले आहे की, चीनमध्ये अंतर्गत अशांतता बरीच आहे.

ओसामा अफगाणिस्तानमध्ये असल्याचा पाकिस्तानचा दावा
लंडन, १२ जुलै/पी.टी.आय.

अल् काईदाचा ‘मोस्ट वॉण्टेड’ म्होरक्या ओसामा बिन लादेन आपल्या हस्तकांसह पाकिस्तानात नव्हे तर अफगाणिस्तानात लपला आहे, असे पाकिस्तानने आज स्पष्ट केले. त्यामुळे पाकिस्तानच्या भूमीवर अमेरिकेकडून होत असलेले ‘ड्रोन हल्ले’ निर्थक असल्याचा दावाही पाकिस्तानकडून करण्यात आला. ओसामा बिन लादेन हा आपल्या मोजक्या साथीदारांसह अफगाणिस्तानातील कुनेर प्रांतामध्ये लपला असल्याची शक्यता पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी व्यक्त केली.

अजूनही जगाशी कारगिलचा सहा महिने संपर्क नसतो!
कारगिल, १२ जुलै / पीटीआय

कारगिलचे युद्ध होऊन आता दहा वर्षे होत आली, तरीही हिवाळय़ामध्ये सुमारे सहा महिने कारगिलचा जगाशी संपर्क तुटलेला असतो. हिवाळय़ामध्ये हिमवर्षांवाने श्रीनगर-लेह महामार्ग पूर्ण बंद होतो. जोझिला येथे १५ किमी लांबीचा बोगदा तयार केल्यास कुठल्याही वातावरणात कारगिलचा जगाशी संपर्क राहू शकतो.

भारत व नेपाळ आता पूरजन्य कोसीवर प्रभावी उपाययोजना करणार
काठमांडू, १२ जुलै / पी.टी.आय.

कोसी नदीच्या भीषण पुरामुळे होणारी भयावह स्थिती लक्षात घेऊन आता भारत व नेपाळ यांनी दोन्ही देशांमधील सीमेवर नुकसान कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे मान्य केले आहे.केंद्रीय जलसंपदामंत्री पवनकुमार बन्शाल यांनी नेपाळचे पंतप्रधान मानधवकुमार नेपाळ यांची भेट घेऊन कोसीसंबंधी चर्चा केली, अशी माहिती नेपाळ यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार राजन भट्टाराई यांनी आज दिली. कोसी नदीवर अलीकडेच घालण्यात आलेला बंधारा गेल्यावर्षी पुरामध्ये फुटला त्या अनुषंगाने दोन्ही देशांमधील सीमेवरील भागात हजारो लोकांना बेघर व्हावे लागले. या अनुषांगाने प्रभावी उपाययोजना करण्याबद्दल, लोकांच्या सुरक्षिततेबाबत उभयतांनी चर्चा केली. अहोरात्र कोसीचा बंधारा देखरेखीखाली ठेवावा, पावसाळ्यात त्याची तपासणी करीत राहावे, भारताचे सहकार्य त्यासाठी घेतले जावे, दुरूस्ती करण्यात यावी आदी बाबींवर यावेळी भारत व नेपाळ यांनी संपमती दर्शविली. पुरामुळे या बंधाऱ्याचे ९० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. नेपाळच्या सुनसारी जिल्यात बंधाऱ्याचे निरीक्षण बन्शाल करणार आहेत.

इराकमध्ये विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ११ ठार, ६६ जण जखमी
बगदाद, १२ जुलै / ए.एफ.पी.

इराकमध्ये काही ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत एकूण ११ जम ठार झाले असून ६६ जण जखमी झाल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.मध्य बगदादमधील एका कराडा भागात दोन बॉम्बस्फोटांमध्ये दोन जण ठार तर ११ जण जखमी झाले. यातील एक स्फोट बिलियर्ड कॅफेमध्ये व दुसरा त्याच्या बाहेर झाला. दक्षिण बगदादमध्ये शियापंथियांच्या मशिदीबाहेर रस्त्यावर एक बॉम्बस्फोट झाला. त्यात एक जण ठार तर २० जण जखमी झाले. मोसुल शहराच्या उत्तर भागात कारबॉम्बच्या स्फोटात चारजण ठार तर ३५ जण जखमी झाले. अमेरिकी फौजा इराकच्या शहरी भागातून बाहेर घेण्यात आल्यानंतर दोन आठवडय़ांच्या आतच हे स्फोट झाले असून गेल्या काही महिन्यांमध्ये हिंसाचार मात्र बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. परंतु अशा प्रकारचे बॉम्ब हल्ले कमी झाल्याचे सांगण्यात आले.

ज्योति बसू इस्पितळात; प्रकृती स्थिर
कोलकाता, १२ जुलै / पी.टी.आय.

माकपचे ज्येष्ठ नेते ज्योती बसू आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना एएमआरआय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे इस्पितळाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक देबाशीष शर्मा यांनी सांगितले. बसू यांनी ८ जुलै रोजी ९७ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. त्यांच्यावर तेव्हापासून त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात येत आहेत. इस्पितळाच्या तीन डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करीत असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यापूर्वी त्यांना पोटात दुखत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. राज्याचे परिवहनमंत्री सुभाष चक्रवर्ती, लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी इस्पितळात बसू यांची भेट घेतली.

पेरूमध्ये भूकंपाचा धक्का
वॉशिंग्टन, १२ जुलै / ए.एफ.पी.

दक्षिण पेरूमध्ये स्थानिक वेळेनुसार पहाटे १.१२ वा. भूकंपाचे तीव्र हादरे बसले णात्र तेथे काही प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही, असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र खात्यातर्फे सांगण्यात आले. सुमारे ६ रिष्टर स्केल क्क्षमतेचा हा भूकंप होता. भूकंपाचा केंद्रबिंदू ज्युलिका शहराच्या वायव्येकडे ५९ किलोमीटर अंतरावर असल्याचे स्पष्ट झाले.