Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

व्यापार - उद्योग

बिस्लेरी २५ नवीन बॉटलिंग प्रकल्प उभारणार

 

व्यापार प्रतिनिधी: भारतातील सर्वात विश्वसनीय आणि सर्वाधिक विकला जाणारा मिनरल वॉटर ब्रॅण्ड बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडने ग्राहकांच्या वाढत्या मागणीची परिपूर्ती करण्यासाठी देशभर २५ नवीन बॉटलिंग कारखाने स्थापन करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षांत आक्रमक बाजारपेठ विस्तार तसेच अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची आणि वृद्धीची योजना आखली आहे. एप्रिल २००८- मार्च २००९ या आर्थिक वर्षांत ३६ टक्क्यांची वृद्धी नोंदविल्यानंतर त्यापासून स्फूर्ती घेत कंपनीने यावर्षी ४० टक्के वृद्धीचे लक्ष्य समोर ठेवले आहे. त्यासाठी दुहेरी वितरण योजनेची बाजारपेठेतील विस्ताराची आक्रमक योजनाही कंपनीने आखली आहे. या योजनेनुसार कंपनीचा भारतातील छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील नवीन बाजारपेठेत शिरकाव करण्याचा मानस आहे. छोटय़ा आणि दुर्गम बाजारपेठांमध्ये आक्रमकपणे विस्तार करण्याबरोबरच नवीन प्रदेशांमध्ये जाणे आणि महानगरे व सध्याच्या बाजारात आपल्या कक्षा रुंदावणे यावर कंपनीचा भर असेल. बिस्लेरीने असेही जाहीर केले आहे की, ऑक्टोबर २००९ मध्ये तिचे फ्लेव्हरड् पाणी दाखल होणार आहे. या क्षेत्रात कंपनीने केलेले पदार्पण हे कंपनीच्या पाणी आणि पेयांच्या क्षेत्रात करावयाच्या उत्पादन विस्तार योजनेचा भाग आहे.

‘सीआयआय’कडून ‘कृषी विकास २००९’ ची घोषणा
व्यापार प्रतिनिधी: कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने कृषी विकास २००९ आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेचे आयोजन ६ ते ८ नोव्हेंबर २००९ दरम्यान मध्य प्रदेशातील इंदौर येथील कृषी महाविद्यालयात करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. हे आयोजन सीआयआय मध्य प्रदेश राज्य परिषदेचे अध्यक्ष आणि फोर्स मोटर्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक बी. एम. खारगावकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. मध्य प्रदेश हे देशातील आकारमानाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावरील राज्य आहे आणि या राज्याचे कृषी क्षेत्र जीडीएसपीच्या तब्बल एक तृतीयांश योगदान देते. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भार हे क्षेत्र उचलते. या राज्याला जैव विविधतेचा वारसा आहे आणि त्याचमुळे वैविध्यपूर्ण पिके घेणे या राज्याला सहज शक्य होते. या राज्यातील जमीन संपूर्ण आशियामध्ये सर्वात सुपीक जमीन म्हणून ओळखली जाते. मध्य प्रदेशात आता कृषी निर्यात क्षेत्र आणि फूड पार्कस् मध्येही गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होत असून ते गुंतवणुकीसाठी एक आदर्श ठिकाण समजले जाऊ लागले आहे. या सर्व सुविधांमुळे राज्याला कृषी उत्पादनांचा दर्जा आणि आकार वाढविण्याच्या बाबतीत अतिरिक्त फायदा मिळतो. याच पाश्र्वभूमीवर व संभाव्य विस्तृत व्यवसाय संधी लक्षात घेऊन सीआयआयच्या कृषी विकास २००९ मध्ये एकाच छताखाली आधुनिक नवीन व उभरती तंत्रज्ञाने सादर होणार आहेत. फार्म सेक्टर, ट्रॅक्टर, टीलर, बिया, खते, फलोत्पादन, ग्रीन हाऊस, शीतगृह, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आदी क्षेत्रांचा त्यात समावेश आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची आणि कृषी विकास क्षेत्रातील अतिरिक्त ज्ञान मिळविणे आणि त्या माध्यमातून त्यांच्या कृषी उत्पादनांचे उत्पन्न वाढविण्याची माहिती मिळणार आहे. महाराष्ट्रासारख्या प्रागतिक राज्याच्या बरोबरीने प्रगती करत राज्याचा आलेख उंचविण्याचीही संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. कृषी विकास २००९ ला आतापर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आला आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लिमिटेड, क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज लिमिटेड, फार्म इम्प्लीमेंट्स (इंडिया) प्रा. लि., कुन्ह एसए, केएसबी पम्प्स लिमिटेड, अॅग्रो टेक इंटरनॅशनल, इंटेलेक्च्युअल फार्मिग प्रा. लि., विंडसर एक्स्पोर्ट्स, गरवारे वॉल रोप्स लिमिटेड, मेचेअर इंडस्ट्रीज, न्यू इरा अॅथेसिव्ह अॅण्ड सीलंट्स प्रा. लि., पेस्ट कंट्रोल इंडिया प्रा. लि., निको ऑरगानो मॅन्युअर्स, कृती इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड आदी नामवंत कंपन्यांच्या कृषी विकास २००९ ला पाठिंबा असणाऱ्या कंपन्या प्रदर्शनातही सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. या प्रदर्शनाचे आयोजन तेथे खरीप हंगाम सुरू होण्याआधी करण्यात आले आहे. त्यामुळे प्रागतिक शेतकरी आणि कृषी व इतर संबंधित इतर घटकही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र व्यापारी पेठेचे गाळे आरक्षण
व्यापार प्रतिनिधी: गेली १९ वर्षे मंडळातर्फे डॉ. डिसिल्व्हा शाळेचे पटांगण, दादर येथे मराठी माणसांनी मराठी व्यावसायिकांकरिता आयोजित केलेली गणपती ते दिवाळी दरम्यान सातत्याने ६५ ते ६८ दिवस चालणारी महाराष्ट्र व्यापारी पेठ ही नवीन मराठी उद्योजकांकरिता एक मानबिंदू ठरला आहे. यंदा महाराष्ट्र व्यापारी पेठेचे सलग २० वे वर्षे आहे. पेठेचे अध्यक्ष अनंत भालेकर व कार्यवाह दीपा मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री अनंत मस्के, किरण शेटय़े, सुनिल सावंत, मंदिर गोड, अमित गोडबोले, उमा शेटय़े यांच्या पुढाकाराने या व्यापारी पेठेचे आयोजन करण्यात येत आहे. १५ ऑगस्ट ते २० ऑक्टोबपर्यंत चालणाऱ्या या ६७ दिवसांच्या महाराष्ट्र व्यापारी पेठेत एकूण ८० ते ८५ मराठी गाळेधारक सहभागी होणार आहेत. साडय़ा, चादरी, किचनवेअर, लाकडाची खेळणी, दागिने, आयुर्वेदिक, पर्सेस, मुखवास इ. विविध वस्तूंनी नटलेली ही पेठ ग्राहकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. मंगळवार २० ऑक्टोबपर्यंत ग्राहकांसाठी ही पेठ दररोज सकाळी १० ते रात्रौ ८.३० वाजेपर्यंत खुली राहणार आहे. एकाच छताखाली अनेक वस्तू मिळण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने ग्राहकांना मिळणार आहे. या महाराष्ट्र व्यापारी पेठेची ग्राहक जेवढय़ा उत्सुकतेने वाट पाहत असतात तेवढय़ाच उत्सुकतेने मराठी लघु उद्योजक व व्यापारीही वाट पहात असतात. गणपती ते दिवाळीदरम्यान चालणारी ही व्यापारी पेठ नवीन उद्योजकांकरिता वेगवेगळ्या परिस्थितीत व्यापार करण्याची शिकवण देणारी एक कार्यशाळाच आहे. म्हणूनच नवीन मराठी व्यापारी व उद्योजकांना आपला व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी या व्यापारी पेठेच्या निमित्ताने चालून आली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याकरिता इच्छुक गाळेधारकांनी या पेठेत सहभागी होण्यासाठी मराठी व्यापारी मित्रमंडळाच्या दादर येथील कार्यालयात (रविवार सोडून) संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आता टीव्हीएसची ‘फ्लेम एसआर १२५’
प्रतिनिधी: टीव्हीएस मोटर कंपनीने आता ‘टीव्हीएस फ्लेम एसआर १२५’ या ब्रँडखाली २००९चे तिचे फ्लेम मॉडेल बाजारपेठेत उपलब्ध असल्याची घोषणा केली आहे. टीव्हीएस मोटर कंपनीच्या मार्केटिंग विभागाचे अध्यक्ष एच. एस. गोयंदी यांच्या मते, ‘टीव्हीएस फ्लेम एसआर १२५’ ही कमालीच्या सुधारित लघु आणि मध्यम रेंज पॉवर डिलिव्हरीच्या माध्यमातून येते. तिचा आवाज, व्हायब्रेशन व हँडलिंग (एनव्हीएच) वैशिष्टय़ेही उत्तम अशा प्रकारची आहेत. क्रांतिकारी कंट्रोल्ड कॉम्बुशन व्हेरिएबल टायमिंग इंटेलिजन्स (सीसी-व्हीटीआय) हे क्रांतिकारी तंत्रज्ञान अत्यंत आकर्षक अशा लूक्ससह ऊर्जा आणि मायलेज यांचा सुविधाजनक संयोग त्यात आहे. ‘टीव्हीएस फ्लेम एसआर १२५’चे इंजिन तीन व्हॉल्वसह उपलब्ध आहे. सीसी-व्हीटीआय टेक्नॉलॉजीने युक्त असे हे इंजिन चांगले पिकअप देऊ करते आणि कमाल मायलेज आणि ऊर्जा देते. एव्हीएल ऑस्ट्रियामध्ये या इंजिनला विकसित केले आहे. त्यात असा टम्बल-स्वर्ल पोर्ट संयोग आहे. त्यामुळे शहरातील या इंजिनची सवारी अगदी सुखकारक आणि आरामदायी होते. इंजिनच्या हाय-टम्बलमुळे सातत्याने गिअर बदलत राहावे लागत नाही. ‘टीव्हीएस फ्लेम एसआर १२५’ ही इलेक्ट्रिक स्टार्टने युक्त असून तिचे वजन १२३ किलो एवढे आहे. तिला सिंगल स्पार्क प्लग आहे. या बाइकमध्ये ९५ किमी प्रति तास एवढा उत्तम वेग असून ७५०० आरपीएमला १०.५ बीएचपी खर्च होतो. या मोटर सायकलची डिस्क ब्रेक प्रकारातील एक्स शोरूम किंमत ४७ हजार ५५० रुपये आहे.


मनोरंजनात्मक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे ‘आयस्टोअर’ या नावाने विक्रीकेंद्राचे अलीकडेच ‘रिलायन्सडिजिटल’कडून घाटकोपर येथे सुरू करण्यात आले, त्याप्रसंगी आयस्टोअरचे प्रमुख कौशल नेवरेकर, रेडिओ जॉकी मलिष्का आणि अभिनेता नील नितीन मुकेश.

सवरेत्कृष्ट सेवा देणाऱ्या १० कंपन्यांच्या यादीत ‘डायबोल्ड’चा समावेश
व्यापार प्रतिनिधी: इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ आऊटसोर्सिग प्रोफेशनल्स (आय.ए.ओ.पी.) तर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या ‘२००९ ग्लोबल आऊटसोर्सिग १००’’ च्या सवरेत्कृष्ट सेवा पुरविणाऱ्या सेवाउद्योगांच्या यादीत ‘डायबोल्ड’ने पहिल्या १० मध्ये स्थान पटकाविले आहे. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ आऊटसोर्सिग प्रोफेशनल्स (आय.ए.ओ.पी.) च्या उपयादीत गौरवपूर्ण सेवांसाठी आणखी आठ नामांकनेदेखील ‘डायबोल्ड’ने मिळवली आहेत. डेबिट कार्ड, ऑटोमेटेड टेलर मशीन अर्थात ए.टी.एम. तंत्रज्ञान, मार्केटिंग तसेच इंटिग्रेटेड सुरक्षा तंत्रज्ञान व्यावसायिक प्रणालीद्वारे कार्यान्वित करणे इत्यादी हजारांवर सेवा डायबोल्ड जगभरात पुरवीत आहे. डायबोल्ड ही व्यवस्थापन सुविधांसहीत ए.टी.एम. उद्योगातील सर्वोच्च सुविधा पुरविणारी कंपनी आहे. भारतातदेखील; सरकारी क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाने डायबोल्ड इंडिया या कंपनीसोबत केलेल्या करारानुसार ऑटोमेटेड टेलर मशीन अर्थात ए.टी.एम.ची संख्या भारतभरात वाढविण्यास प्रयत्नशील आहे. डिबोल्ड ए.टी.एम. क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.

ग्रामीण भागात विस्तारासाठी एल्डर फार्माचा स्वतंत्र विभाग
व्यापार प्रतिनिधी: औषध उद्योगातील सुमारे ६५० कोटी रुपयांची उलाढाल असलेली कंपनी एल्डर फार्मास्युटिकल्स लि.ने ग्रामीण भागात विस्तार करण्यासाठी ‘एलिव्हिस्टा’ हा स्वतंत्र नवीन विभाग स्थापन केला आहे. या विभागातर्फे लहान शहरांबरोबरच गाव पातळीवर औषधांचे वितरण करण्यासाठी यंत्रणा उभारली जाईल. या विभागात सुमारे २४० कर्मचाऱ्यांचा ताफा असेल. त्याशिवाय ‘एलिव्हिस्टा’च्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ७५० वर पोहोचेल. कंपनीचे संचालक आलोक सक्सेना यांनी ही माहिती दिली. ग्रामीण भागातील या विस्तारासाठी कंपनीने ४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एल्डर कंपनीने अनेक विदेशी कंपन्यांशी सहकार्य करार केले असून त्यांच्या विविध औषधांचे वितरण करण्यात येते. ‘एलिव्हिस्टा’ने उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, बिहार या राज्यात यापूर्वीच प्रवेश केला असून आता दक्षिणेतील राज्यात प्रवेश करण्याची योजना आखली आहे.

‘झूम डॉट कॉम’चा पंजाब नॅशनल बँकेशी करार
व्यापार प्रतिनिधी: ऑनलाईन मनी ट्रन्फर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी झूम डॉट कॉमने पैसे हस्तांतरणासाठी सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या पंजाब नॅशनल बँकेशी सहकार्य करार केला आहे. या सहकार्य करारानुसार काही क्षणातच या बँकेतील पैसे हस्तांतरण करण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच या पैशाची ग्राहकांच्या गरजेनुसार ठेवीत रुपांतर करण्याची व्यवस्था आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या ४५०० शाखांमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पैसे अशा प्रकारे पाठविण्याची व स्वीकारण्याचीही व्यवस्था असेल. हे पैसे क्रेडिट व डेबिट कार्डाव्दारे किंवा रोखीने भरुन पाठविता येतील. झूम डॉट कॉमही सॅनफ्रान्सिस्कोस्थित कंपनी असून त्यांच्यातर्फे सुमारे ४० देशात पैसे हस्तांतरीत करता येतात. १८९५ साली स्थापन झालेली पंजाब नॅशनल बँक ही राष्ट्रीयीकृत बँकांतली पूर्णपणे संगणकीकृत असेलली पहिली बँक आहे.

एक्सेल इन्फोवेची आजपासून भागविक्री
व्यापार प्रतिनिधी: मुंबईत मुख्यालय असलेली बीपीओ क्षेत्रातील कंपनी एक्सेल इन्फोवेने आपल्या १० रु. दर्शनी मूल्याच्या ५६,६७,००० समभागांची १०० टक्के बुक-बिल्डिंग प्रक्रियेने प्रारंभिक भागविक्री प्रस्तावित केली आहे. १४ जुलैपासून सुरू होणाऱ्या या भागविक्रीत प्रति समभाग किमान रु. ८० ते कमाल रु. ८५ या दरम्यान गुंतवणूकदारांना बोली लावता येईल. भागविक्री १७ जुलैला बंद होईल. ग्राहक संपर्क केंद्रे आणि बीपीओ क्षेत्रात कार्यरत एक्सेल इन्फोवेचा दूरसंचार आणि वित्तीय सेवा क्षेत्रात समाधानकारक ग्राहक पाया आहे. कंपनी ‘नॅसकॉम’ची नोंदणीकृत सदस्य असून, आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेतील कंपन्यांचा काटकसरीकडे वाढलेला कल कंपनीसाठी येत्या काळात फायदेशीर ठरेल, असा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लखमेंद्र खुराणा यांचा कयास आहे. कंपनीने रु. ७७.२७ कोटींचा विस्तार कार्यक्रम आखला आहे. त्यापैकी रु. ४७.२७ कोटी हे मुंबईत बोरिवली आणि कांदिवली येथे नवीन कॉल सेंटर स्थापण्यासाठी खर्च होतील. कंपनीच्या सध्याच्या अंधेरीस्थित कॉल सेंटरची क्षमता १५० आसनांची असून, नवीन दोन कॉल सेंटरची भर पडलेल्या आसनक्षमता आणखी ३०० आसनांनी वाढणार आहे. शिवाय विदेशात दोन कंपन्यांच्या अधिग्रहणाचीही एक्सेल इन्फोवेची योजना असून, त्यासाठी रु. ३० कोटींचा निधी राखून ठेवला जाणार आहे. भागविक्रीपश्चात कंपनीतील प्रवर्तकांचा भांडवली हिस्सा २६.९३ टक्क्यानी सौम्यीकृत होईल. भागविक्रीपश्चात कंपनीचे समभाग मुंबई तसेच राष्ट्रीय शेअरबाजारात सूचीबद्ध होतील.

कबीरदास मोटरचा भागविक्रीतून ६० कोटींचा भांडवल उभारणीचा प्रस्ताव
व्यापार प्रतिनिधी: ‘एक्साइट’ नावाने विजेवर चालणारी स्कूटर बाजारात आणणाऱ्या चेन्नईस्थित कबीरदास मोटर कंपनीने आपल्या आगामी विस्तार प्रकल्पासाठी आवश्यक रु. ६० कोटींचे भांडवल उभारण्याकरिता खुली समभाग विक्री प्रस्तावित केली आहे. येत्या दीड-दोन महिन्यात ही प्रारंभिक भागविक्री आयोजिली जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. चेन्नईनजीक श्रीपेरूम्बूदूर येथे दरसाल दोन लाख स्कूटर्सची निर्मिती करणारा उत्पादन प्रकल्प थाटण्याचा कंपनीचा मानस आहे. या प्रकल्पाचा एकंदर खर्च रु. १०२ इतका असून, यापैकी प्रत्येकी रु. २० कोटी युनियन बँकेचे कर्ज आणि खासगी भांडवली सहभागातून उभारले जाणार आहेत. येत्या आठ ते १० महिन्यांत नवीन उत्पादन प्रकल्प कार्यान्वित होईल, असा विश्वास कबीरदास मोटरचे व्यवस्थापकीय संचालक मुरली कबीरदास यांनी व्यक्त केला. कंपनीच्या २५० व्ॉट आणि १५०० व्ॉट क्षमतेच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या दोन मॉडेल्स असून, तामिळनाडू, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये ३३ डीलर्सकडून त्यांची विक्री सध्या सुरू आहे. फेब्रुवारी २००७ मध्ये कार्यान्वयन सुरू झाल्यापासून कंपनीने आजवर २००० स्कूटर्सची विक्री पूर्ण केली आहे. लवकरच केरळ व महाराष्ट्र या राज्यात विक्री जाळे पसरविण्याचा कंपनीचा इरादा आहे.

‘फास्ट्रॅक’तर्फे २० टक्क्यांची सूट
व्यापार प्रतिनिधी: सर्व फास्ट्रॅक घडय़ाळे आणि सनग्लासेसवर थेट २० टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. सवलतीनंतर फास्ट्रॅक घडय़ाळे ही ४७५ रुपयांपासून सुरू होतात. सवलतीनंतर फास्ट्रॅक सनग्लासेस ५५५ रुपये किमतीपासून सुरू होतात. ही सवलत केवळ २६ जून २००९ ते २६ जुलै २००९ या काळात उपलब्ध आहे. फास्ट्रॅक घडय़ाळे आणि सनग्लासेस विशेष फास्ट्रॅक स्टोअर्स, सर्व फास्ट्रॅक किऑस्क, सर्व वर्ल्ड ऑफ टायटन शोरूम्स, सर्व टायटन आय प्लस दुकाने यांच्यामध्ये उपलब्ध आहेत. शिवाय शॉपर्स स्टाप, सेन्ट्रल, लाइफस्टाइल, ब्ल्यू स्काय, वेस्टसाइड, पिरॅमिड तसेच घडय़ाळे आणि सनग्लासेसची देशभरातील सर्व बहु-ब्रॅण्ड दुकानांमध्येही ती उपलब्ध आहेत.