Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

अग्रलेख

माणुसकीचा झरा हरपला!

 

कलेच्या क्षेत्रात काम करणारी माणसे अधिकाधिक आत्मकेंद्री होत असतानाच्या सध्याच्या काळात निळू फुलेंना ‘भूमिका’ नव्हतीच. पण निळू फुले हे कधीच त्या अर्थाने केवळ अभिनेता नव्हते. स्वार्थ आणि लौकीकाच्या सीमा त्यांनी केव्हाच ओलांडल्या होत्या. सामान्य माणसाच्या जीवनाविषयी विलक्षण आस्था असणाऱ्या, अशा माणसांचाच संवेदनशील लोकांना आधार असतो. निळूभाऊ फुलेंच्या मृत्युमुळे असा एक आधार आणि आदर्श आपल्यातून गेला आहे. पण आम्हाला खात्री आहे की ते ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले, त्या सर्वांना त्यांचा तो माणुसकीचा स्पर्श पोहोचला आहे. निळूभाऊंनी नाटक, चित्रपट या क्षेत्रांत आपल्या स्वतंत्र अभिनयाचा व संवादशैलीचा दबदबा निर्माण करीत, सामाजिक, राजकीय चळवळीशीही आपली नाळ कधी तुटू दिली नाही. राजकीय पक्षांनी सांस्कृतिक चळवळींमधून जनसामान्यांशी, त्यांच्या भावनांशी संपर्कात राहण्याचा तो काळ होता. सेवादलाला धर्मनिरपेक्ष राजकीय विचारसरणीचा पाया होता आणि कलापथकांतून याच सुधारकी विचारसरणीचा प्रसार केला जात असे; परंतु तरीही कलापथकातील बरेच कलावंत राजकीय बांधीलकीपासून दूर राहात असत आणि त्यांच्या या वैचारिक स्वातंत्र्याचा आदर राजकीय पक्षही करीत असत. त्या संपन्न आणि सुसंस्कृत काळात निळूभाऊ कलापथकात काम करीत होते. खरे तर त्या काळात अनेक तरुण संघाच्या शाखांमध्ये जात आणि त्याच वेळी कलापथकांमध्येही जात. कालांतराने त्यांची वैचारिक भूमिका स्पष्ट होऊन ते मग एकाला सोडचिठ्ठी देत. निळूभाऊ सुरुवातीला अगदी अल्पकाळ संघाच्या शाखेत होते; परंतु तिथे मुस्लिम, ख्रिश्चनधर्मीय मित्रांचे मनापासून स्वागत होत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी संघाकडे पाठ फिरविली आणि ते राष्ट्र सेवादलात गेले. तो काळ स्वातंत्र्य चळवळीचा होता. लवकरच स्वातंत्र्य मिळाले आणि धर्म, जात, वर्गविरहित समाजाची बांधणी करण्याचे काम सामाजिक-सांस्कृतिक संघटनांना हाती घ्यावे लागले. निळूभाऊंनी एका बाजूला नाटय़, चित्रपट क्षेत्रांत आपल्या संयत अभिनयातून आपला स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आणि चळवळींचा पदरही घट्ट धरून ठेवला. निळूभाऊंचे प्रत्यक्षातील व्यक्तिमत्त्व आणि पडद्यावरील त्यांच्या भूमिका यातला विरोधाभास त्यांच्यातील अभिनेत्याच्या ताकदीचा प्रत्यय देतो. अनेकदा अभिनेत्यांना विशिष्ट भूमिका दिली जाते ती त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या ती जवळ जाणारी असते म्हणून; परंतु निळूभाऊ त्याला अपवाद होते. किंचित कमरेत वाकून, एका हातात धोतराचा सोगा धरून गांधी टोपी, जॅकेट अथवा बंडी घालून निळूभाऊंनी पडद्यावर पाटील, सरपंचाच्या बेरकी व्यक्तिरेखा रंगविल्या त्या केवळ नजरेतून आणि संवादफेकीतून. नाटकाच्या परंपरेचा मोठा पगडा आपल्या एकूणच अभिनय प्रांतावर असल्याने ‘लाऊड’ अभिनयाकडे बहुतेकांचा कल असे. परंतु निळूभाऊंवर योगायोगाने हॉलीवूडच्या १९५०-६० च्या सुमाराच्या चित्रपटांचे संस्कार झाले. अभिनयाच्या बाबतीत रंगभूमी आणि रूपेरी पडदा यांच्या स्वतंत्र गरजा आहेत, चित्रपटासाठी कॅमेऱ्याचे तंत्र लक्षात घेऊन तशी अभिनयशैली विकसित केली पाहिजे या जाणिवेतून हॉलीवूडमध्ये संयत अभिनय, नैसर्गिक संवादफेक यांचे एक परिणामकारक मिश्रण जन्माला आले होते. कलापथकातील नाटकांचा हेतू समाज सुधारण्याचा आणि पुरोगामी विचारसरणीच्या प्रसाराचा होता. ही सर्व मूल्ये निळूभाऊंनी आधी स्वत:मध्ये बाणवली. एका बाजूला आयुष्यात, व्यवहारात ही मूल्ये जपायची आणि त्याच वेळी नाटक-चित्रपटात विविध ढंगाच्या भूमिका साकार करायच्या ही कसरत त्यांनी अखेपर्यंत कमालीच्या सहजतेने केली. एखाद्या कलावंताला विशिष्ट प्रतिमेचा गुलाम करून त्याला त्यातच कैद करण्याची खोड आपल्या चित्रपटसृष्टीला आहे. ‘एक गाव बारा भानगडी’मध्ये निळूभाऊंनी ‘झेलेअण्णा’ हा बेरकी ग्रामीण राजकारणी रंगवला. ग्रामीण भागातील पुढाऱ्यांचे वागणे, एखाद्याला दमात घेण्याची त्यांची पद्धत आणि सत्तेचा, पैशाचा माज हे सर्व निळूभाऊंनी जवळून पाहिले होते. या निरीक्षणातूनच त्यांनी ‘झेलेअण्णा’ साकार केला. दुर्दैवाने पुढील कारकीर्दीत त्यांना त्याच भूमिकेच्या विविध आवृत्त्या चित्रपटामधून साकार कराव्या लागल्या. केवळ एवढेच नव्हे तर ‘ग्रामीण राजकारणी असाच असतो’ हे या भूमिकेने प्रेक्षकांच्या, दिग्दर्शकांच्या, लेखकांच्या मनावर एवढे बिंबविले, की इतरांनाही पडद्यावर निळू फुलेंचीच नक्कल करणे भाग पडले. या प्रतिमेतून बाहेर पडून निळूभाऊंमधील कलावंताला समाधान देण्यात मराठी चित्रपट तोकडा पडला. त्यामुळेच दीडशेहून अधिक मराठी चित्रपटांत भूमिका करूनही निळूभाऊंना स्वत:ला ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘शापित’, ‘चोरीचा मामला’ या व अशा काही चित्रपटांमधल्या भूमिकाच समाधान देऊन गेल्या. ‘सामना’ मधील हिंदूराव धोंडे पाटील उभा करताना त्यांनी सहकार क्षेत्रातील साखरसम्राटांच्या स्थानिक दहशतीचे घडविलेले दर्शन, त्या चित्रपटाला ‘वास्तवा’चे रूप देऊन गेले. ‘शापित’मधील त्यांची बंडखोर आज्याची व्यक्तिरेखा म्हणजे निळूभाऊंचे खरे तर प्रत्यक्षातलेच रूप होते. आर्थिक सत्तेने सामान्य माणसाला गुलाम करू नये, या सामाजिक भूमिकेचा ते कायम हिरीरीने पुरस्कार करीत राहिले. त्याच भूमिकेचा हा पडद्यावरील आविष्कार होता. झुंडशाही, मनगटशाही, दडपशाही आणि समूहाच्या ताकदीचा गैरवापर करून घेणाऱ्या शक्तींना त्यांनी कायम विरोध केला. अलीकडे वारकऱ्यांच्या संदर्भातही स्पष्ट भूमिका घेताना ते कचरले नाहीत. राजकारण्यांच्या डावपेचात सुबुद्ध माणूस कसा वेडा होतो, याचा प्रत्ययकारी आविष्कार त्यांनी ‘सिंहासन’मधील दिगू टिपणीस या पत्रकाराच्या व्यक्तिरेखेत केला होता. लोकनाटय़ हे कलापथकाने जनजागृतीचे माध्यम म्हणून स्वीकारले होते. लोकनाटय़ात अनेकदा ‘बेसिक स्टोरी लाईन’ कायम ठेवून राजकीय, सामाजिक स्थितीवर आणि व्यक्तींवर भाष्य करण्याचे स्वातंत्र्य मिळते. निळूभाऊंसारख्या व्यक्तीला ती अर्थातच पर्वणी ठरत असे. मुळात उत्तम नकलाकार म्हणूनच ते अभिनयाकडे ओढले गेले असल्याने त्यांना उपहास, विनोद यांची चांगली समज होती. त्याला टोकदार सामाजिक जाणिवांची साथ मिळाल्यावर त्यांच्या विनोदाला धार चढली. त्यामुळेच ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘लवंगी मिरची कोल्हापूरची’, ‘राजकारण गेलं चुलीत’ अशी त्यांची लोकनाटय़े डोक्यावर घेतली गेली. ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक, त्याने उठविलेले वादळ आणि त्यानंतर काळाच्या ओघात विजय तेंडुलकरांच्या या नाटकाने मराठी नाटय़सृष्टीच्या इतिहासात पटकावलेले मानाचे स्थान हा झंझावाती इतिहास आहे. या सर्व वादाच्या संदर्भात निळूभाऊंनी कधी तोंड उघडले नाही; परंतु जवळपास ८०० प्रयोगांमध्ये सखारामची व्यक्तिरेखा साकार करून ते या सर्व इतिहासाचा एक अविभाज्य भाग बनलेले आहेत. ‘हे नाटक करून मला थकवा येत असे’ असे ते म्हणत. एखादी व्यक्तिरेखा नटाकडून प्रचंड ऊर्जेची मागणी करते आणि कलावंत तिला ती देतो, याचे हे मोठे उदाहरण म्हणता येईल. नाटक, चित्रपट ही वलय आणि प्रसिद्धी मिळवून देणारी माध्यमे. निळूभाऊंनाही ते मिळाले. पाठोपाठ पैसाही आला; परंतु पैशासोबत येणारी समाजाविषयीची बेफिकीरी आणि अहंगंड त्यांना कधी वश करू शकला नाही. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, आणीबाणीविरुद्धचे आंदोलन अशा प्रत्येक जनआंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. सामाजिक कृतज्ञता निधीसारख्या उपक्रमातून त्यांनी सार्वजनिक कामांसाठी मोठी रक्कम उभारण्यासाठीही हातभार लावला आणि एवढे करून त्यांनी आपल्या मिळकतीचा मोठा वाटा कोणताही गाजावाजा न करता गरजूंना, सेवाभावी संस्थांना दान केला. त्याचा कधीही गाजावाजा केला नाही. मोठय़ा कलावंतांना भरपूर बिदागी मिळत असताना चित्रपट, नाटय़क्षेत्रातील कामगारांना अत्यल्प मोबदला दिला जातो, असे लक्षात आल्यावर त्यांनी त्यांची संघटना बांधली आणि त्यांच्या हक्कांसाठी स्वत:चे हितसंबंध पणाला लावण्यासही ते कचरले नाहीत. समाजाच्या हितातच स्वत:चे समाधान मानणारे निळूभाऊ कधी पुरस्कारांच्या मोहालाही बळी पडले नाही. तुकाराम महाराजांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारला, आता कोणताच पुरस्कार नको, असे एकदा ठरविल्यावर त्यांनी ‘पद्मश्री’, ‘महाराष्ट्र भूषण’ असे मानाचे पुरस्कारही सहजपणे व नम्रपणे नाकारले. समाजपुरुषांच्या थोरपणाचा वारसा जगाला ओरडून सांगणारे अनेक जण प्रत्यक्षात आपल्या पूर्वसूरींच्या थोरपणाला कमीपणा येईल, असे वर्तन करीत असतात. निळूभाऊ महात्मा फुले यांच्या वंशावळीत दुरान्वयाने असल्याचे मानले जात असे. आपल्या जीवनविषयक मूल्यांमधून मात्र त्यांनी महात्मा फुलेंच्या सामाजिक बांधीलकीची परंपरा पुढे नेली आणि जपली. निदान त्या अर्थाने तरी त्यांनी महात्मा फुलेंचा वारसा जपला असे म्हणता येईल.