Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९


छोटा खुशी मोठ्ठा फन या मी मराठी वाहिनीवरील लहान मुलांच्या कार्यक्रमाची अंतिम फेरी नुकतीच झाली. अंतिम फेरीत प्रीती लेले, अर्चित आणि ऋषभ ही मुले पाहोचली. त्यापैकी प्रीती लेले प्रथम क्रमांक पटकाविला. तिला कार्यक्रमाच्या अंतिम फेरीसाठीचे प्रमुख पाहुणे आणि विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर कार्यक्रमाचे परीक्षक किशोरी शहाणे, विजू खोटे हेही उपस्थित होते.

टेलिस्कोप
सुनील नांदगावकर
रोमॅण्टिक कॉमेडी आणि रिअ‍ॅलिटी शो
रोमॅण्टिक कॉमेडी हा प्रकार आता टीव्हीच्या पडद्यावरही रूजलाय. पारंपरिक पद्धतीने ठरवून लग्न केल्यानंतर अनेकदा जोडीदारांच्या आवडीनिवडी, स्वभाव परस्परविरोधी असल्याचे एकमेकांना कळते. मग काय गमतीजमती घडतात ते स्टार वन चॅनलने ‘हम दोनो है अलग अलग’ या मालिकेद्वारे दाखविले आहे. वरूण (यश पंडित) आणि आदित्य (मनिष रायसिंघानी) हे दोघे भाऊ अनुक्रमे अवंतिका (डिंपल झांगियानी) आणि राजश्री (हर्षां खंडेपारकर) यांच्याशी लग्न करतात. पारंपरिक गुजराती कुटुंबात घडणारे कथानक असून दोन्ही जोडय़ांमधील पती-पत्नींच्या आवडीनिवडी, स्वभाव परस्परविरोधी असल्याने अनेक गमतीजमती घडतात. घरगुती टाइमपास कॉमेडी असे याचे स्वरूप असून अभिनेता परेश रावलची प्लेटाइम बॅनर कंपनीने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. कालपासून सुरू झालेली ही मालिका सोमवार ते गुरुवार असे सलग चार दिवस रात्री १० वाजता दाखविण्यात येणार आहे.

इस जंगल से मुझे बचाओ
आता छोटय़ा पडद्यावर हिंदी-मराठी वाहिन्यांवरून नवनवीन रिअ‍ॅलिटी शोंचा दुसरा मौसम सुरू झाला असे म्हणायला हरकत नाही. एकीकडे मराठीत ‘हप्ता बंद’सारखा एकदम निराळ्या फॉरमॅटचा आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांमधील कर्जदारांचा फायदा करून देणारा कार्यक्रम झी मराठी वाहिनीने सुरू केला आहे तर आता सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने ‘इस जंगल से मुझे बचाओ’ हा नवीन रिअ‍ॅलिटी शो सोमवारपासून सुरू केला आहे. मिनी माथूर आणि व्ही चॅनलवरचा युडी असे दोघेजण या रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालक आहेत. अर्थातच हा कार्यक्रम आयटीव्ही ग्लोबल

 

एण्टरटेन्मेंटच्या ‘आय अ‍ॅम ए सेलिब्रिटी.. गेट मी आऊट ऑफ हियर’ या रिअ‍ॅलिटी शो फॉरमॅटवरून तयार केला आहे. मलेशियातील तमन नेगारा ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये या कार्यक्रमाचे शूटिंग करण्यात आले असून वेगवेगळ्या ‘टास्क’ सहभागी झालेल्या स्पर्धकांना देण्यात येतील. रिअल टीव्हीवर यापूर्वी ‘सरकार की दुनिया’ हा रिअ‍ॅलिटी शो एका निर्जन बेटावरचा होता. आता सोनी टीव्ही जंगलात रिअ‍ॅलिटी शो करतोय. जंगल म्हटल्यावर सेलिब्रिटींना हव्या त्या सुविधा नसणारच हे उघडच आहे. त्यामुळे हे आव्हान ते कसे पेलतात यावर या कार्यक्रमाचे यश अवलंबून आहे. अमन यतन वर्मा, अनायडा, चेतन हंसराज, मार्क रॉबिन्सन, श्वेता तिवारी, मोना वासूू, पलक,आकाशदीप सैगल, फिजा आणि इश्क बेक्टर असे १० सेलिब्रिटी स्पर्धक यात सहभागी होणार आहेत. सोमवार ते गुरुवार रात्री १० वाजता आणि शुक्रवारी रात्री ९ वाजता दाखविण्यात येणारा हा कार्यक्रम सोमवारपासून सुरू झाला आहे. या १० स्पर्धकांपैकी आपल्या आवडत्या स्पर्धकाला एसएमएसद्वारे अथवा फोनद्वारे मते नोंदविण्यात सुरुवात झाली असून गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत फोन लाइनद्वारे आणि एसएमएसद्वारे मते पाठविता येणार आहेत. सर्वात कमी मते मिळविणाऱ्या दोन सेलिब्रिटींना ‘महाजंगल चॅलेंज’ स्वीकारावे लागणार आहे. प्रेक्षकांचा सहभाग, जंगलाचे आव्हानात्मक वातावरण यामुळे नेहमीच्या रिअ‍ॅलिटी शोपेक्षा ‘जरा हटके’ असलेल्या या कार्यक्रमाला लोकप्रियता मिळते का ते समजण्यासाठी काही दिवस आणखी वाट पाहावी लागणार आहे.

कलर्स ऑफ इंडिया
हिमालयातून उगम पावणाऱ्या गंगा नंदीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गंगा नदीचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक महत्त्व सर्वच भारतीयांना ठाऊक असते. डिस्कव्हरी चॅनलने आपल्या कलर्स ऑफ इंडिया या कार्यक्रमाद्वारे गंगा नदीची सफर घडविली आहे. हा कार्यक्रम १६ जुलै रोजी रात्री ८ वाजता पाहायला मिळेल. हिमालयापासून ते सुंदरबन, हरिद्वार, अलाहाबाद इत्यादी ठिकाणी डिस्कव्हरीचा कॅमेरा फिरणार आहे.

मोहम्मद रफी यांना आदरांजली
प्रतिनिधी
शम्मी कपूर असो की राजेंद्रकुमार, देव आनंद असो की भूषण अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांना आपला आवाज देणारे आणि आपल्या मधाळ आवाजाने रूपेरी पडद्याचा कृष्णधवल जमाना रंगीन करून टाकणारे पाश्र्वगायक मोहम्मद रफी यांच्या २९व्या स्मृतीदिनानिमित्त क्लब नॉस्टॅल्जियातर्फे एका संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. १७ जुलै रोजी रात्री ८ वाजता हा कार्यक्रम यशवंत नाटय़गृह, माटुंगा येथे होणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ सेक्साफोन वादक मनोहारी सिंग हे रफींच्या गाण्यांची धून वाजविणार आहेत. त्याचबरोबर अनिल बाजपेयी, सागर सावरकर, संगीता, नीलिमा हे गायक गाणी सादर करणार आहेत. क्लब नॉस्टॅल्जयातर्फे आयोजित करण्यात येणारा हा ९२ वा संगीत कार्यक्रम असून या कार्यक्रमातून जमा होणारा निधी समाजोपयोगी कामांसाठी वापरण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी व्यंकट यांच्याशी ९८२१४१५०५६ वर संपर्क साधावा.