Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

सोलापुरात १२३ निवासी डॉक्टरांची हकालपट्टी
रिक्त पदे तत्काळ भरणार
सोलापूर, १३ जुलै / प्रतिनिधी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप मागे घेण्यासाठी शासनाने सूचना देऊनसुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळे सर्व संपकरी निवासी डॉक्टरांची पदे रद्द करून रिक्त पदे तत्काळ भरावीत तसेच संपात सहभागी झालेल्या आंतरवासिता प्रशिक्षणार्थी वैद्यकीय विद्यार्थ्यांचा कालावधी एक वर्षावरून दीड वर्षापर्यंत वाढविण्याचा आदेश प्रश्नप्त झाला. यात सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वच्या सर्व म्हणजे १२३ निवासी डॉक्टर्स व ५६ आंतरवासिता प्रशिक्षणार्थींचा फटका बसला आहे.

कोल्हापूर पालिकेच्याच ५३८ इमारती विनापरवाना
कोल्हापूर, १३ जुलै / विशेष प्रतिनिधी

विनापरवाना बांधकामांवर कारवाईचे कडक अधिकार असलेल्या कोल्हापूर महापालिकेने स्वत:च्याच इमारती विनापरवाना बांधल्या असल्याचे एक प्रकरण आगामी काळात विशेष चर्चेत येण्याची शक्यता आहे. माहितीच्या अधिकाराखाली मागविण्यात आलेल्या माहितीमध्ये महापालिकेच्या मालकीच्या तब्बल ५३८ इमारती विनापरवाना असल्याची माहिती पुढे आली असून याखेरीज महापालिका भाडेपट्टय़ाने देत असलेल्या शहरातील १७०० गाळ्यांचे बांधकामही मंजूर नकाशाप्रमाणे नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित विषय आंदोलनाच्या ऐरणीवर येणार आहे.

‘निळू फुले म्हणजे अभिनयाचा बादशहा व माणुसकीचा मानस्तंभ’
करवीरवासीयांसह मान्यवर कलावंतांची भावपूर्ण श्रद्धांजली
कोल्हापूर, १३ जुलै/विशेष प्रतिनिधी

अभिनयाचा बादशहा आणि माणुसकीचा मानस्तंभ अशी दुहेरी भूमिका वठविणारे ज्येष्ठ अभिनेते निळूभाऊ फुले म्हणजे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात ज्योतिबांनंतरचे ‘दुसरे फुले’ होते, अशा भावपूर्ण शब्दांत सोमवारी कोल्हापुरात विविध थरातील जनतेने निळूभाऊंना आदरांजली वाहिली.
कोल्हापूर हे मराठी चित्रपटाचे माहेरघर असल्याने गेल्या ५० वर्षाहून अधिक काळ निळूभाऊ मराठी चित्रपटाशी आणि त्यानिमित्ताने कोल्हापूरकरांशी एकरूप होऊन राहिले.

आजीच्या खुनाच्या आरोपातून नातू निर्दोष
शास्त्रीय पद्धतीने पुरावा जमविल्याचा पोलिसांचा दावा पोकळ

कोल्हापूर, १३ जुलै / प्रतिनिधी

अतिशय शास्त्रीय पध्दतीने तपास करून भक्कम परिस्थितीजन्य पुरावा गोळा केल्याचा दावा केला गेलेल्या शांताबाई पाटील खून खटल्यातून तिचा नातू अभिषेक शिरीष पाटील याची अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.बी.महाजन यांनी नुकतीच निर्दोष मुक्तता केली. शाहुपुरी पोलिसांनी याप्रकरणी न्यायालयात दाखल केलेला पुरावा अतिशय ठिसूळ पायावर उभा असल्याचा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.

बार्शीजवळ इंडिका-आरामबसच्या अपघातात दोघा बंधूंसह तिघे ठार
सोलापूर, १३ जुलै/प्रतिनिधी

बार्शीपासून जवळच असलेल्या कुसळंब येथे इंडिका कार व आरामबस यांची समोरासमोर धडक बसून घडलेल्या अपघातात इंडिकामधील तिघाजणांचा जागीच मृत्यू झाला तर इंडिकाचालकासह दोघेजण जखमी झाले. रविवारी रात्री बाराच्या सुमारास हा अपघात घडला. यात इंडिकाचालकाचा दोष असल्याने त्याच्या विरुध्द पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चंद्रकांत सूर्यकांत पाटील (वय ४२, रा. बार्शी), अली शुकूर कुरेशी (वय ४५, रा. इंदापूर) व त्याचा भाऊ रशीद शुकूर कुरेशी (वय ३५) असे तिघेजण या अपघातात जागीच मरण पावले. कारचालक सुधीर शाहू धर्मे (रा. झरेगाव, ता. बार्शी) व शाहीद नजीर कुरेशी (रा. इंदापूर) हे गंभीर जखमी झाले. हे सर्वजण एमएच १३ एन ८२६५ या इंडिका कारमधून मराठवाडय़ातून कुसळंबमार्गे इंदापूरकडे निघाले होते. परंतु कुसळंबजवळ समोरून येणाऱ्या एमएच ०४-जे ८८६६ या आरामबसला सदर इंडिका कार जोरात धडकली. सदर खासगी आरामबस बार्शीहून नांदेडकडे निघाली होती.

कंटेनरने उडविल्याने पुण्याचे दोघे ठार
कोल्हापूर, १३ जुलै/प्रतिनिधी

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली फाटा येथे आज पहाटे भरधाव कंटेनरने धडक दिल्यामुळे दोघे युवक जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. टाटा सुमोमधून पुण्याकडे निघालेले हे युवक लघुशंकेसाठी रस्त्यावर उतरले आणि त्यांना मागून येणाऱ्या कंटेनरने उडवले. या अपघातप्रकरणी शिरोली औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एम.एच.१२ एच.ए.००७६ या क्रमांकाच्या टाटा सुमोमधून पुण्याच्या भोसरी परिसरातील आदिनाथनगरमधील काहीजण गणपतीपुळे येथे गणेश दर्शनासाठी गेले होते. नितीन भगवान बोराळे (वय २४), अनुप अशोक गोयल (वय २६) व आणखी एकजण असे तिघे पहाटे राष्ट्रीय महामार्गावर शिरोली फाटय़ाजवळ टाटा सुमो थांबवून रस्त्याच्या कडेला उभे असतानाच एम.एच.४३ ई ३२९१ या कंटेनरने या तिघांनाही धडक दिली.

सोलापूर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मठपती, सचिव कुलकर्णी
सोलापूर, १३ जुलै/प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बार्शीचे शिवलिंग मठपती यांची फेरनिवड तर सरचिटणीसपदी प्रश्न. पी. पी. कुलकर्णी (सोलापूर) यांची एकमताने निवड करण्यात आली. या संघाच्या कार्याध्यक्षपदी अ. लतिफ नल्लामंदू यांची बिनविरोध निवड झाली. विजापूर रस्त्यावरील पत्रकार भवन येथे सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यावेळी अध्यक्षपदासाठी श्री. मठपती आणि सरचिटणीसपदासाठी प्रश्न. कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. या संघाचे अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष-चंद्रकांत कुंभार (अकलूज) आणि दत्तासिंह परदेशी (पंढरपूर), सहचिटणीस-अबूबकर नल्लामंदू (सोलापूर) आणि संचालक मंडळ-एम.एम. पठाण (सांगोला), श्रीपाद कुलकर्णी (सोलापूर), अनंत दिवाणजी (अक्कलकोट), शंकरराव साठे (मोहोळ), हाजी शौकतअली काझी (बार्शी), नरसिंह चिवटे (करमाळा), राजू मुलाणी (अकलूज), बसय्या भंडारी (दक्षिण सोलापूर), ज्ञानेश्वर कुलकर्णी (मंगळवेढा) आणि अरुण कोरे (माढा). नूतन अध्यक्ष मठपती हे सुमारे दहा वर्षापासून या अध्यक्षपदाची धुरा वाहात आहेत. नूतन सरचिटणीस प्रश्न. कुलकर्णी हे संभाजीराव शिंदे महाविद्यालयात लेक्चरर असून ते स्थानिक साप्ताहिकही चालवितात.

‘कठोर परिश्रमाबरोबरच उच्च ध्येयाची गरज ’
मिरज, १३ जुलै / वार्ताहर
ज्ञान संपादनासाठी कठोर परिश्रमाबरोबरच उच्च ध्येयाची गरज असते. हे ध्येय उराशी बाळगले, तर यश दूर राहू शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. माजिद मेमन यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास नायकवडी होते.आझाद शिक्षण संस्थेच्या जवाहर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत सर्वोच्च गुणवत्ता संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव अ‍ॅड. मेमन यांच्या हस्ते करण्यात आला. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रश्नेत्साहन देण्याकरिता अ‍ॅड. मेमन यांनी एक लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले होते. शिरीन शकील पटेल या विद्यार्थिनीने ९१.५० टक्के गुण मिळवून हे एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविले.यावेळी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या हस्ते द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी १५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक सुफिया इखलास नायकवडी व महेरून्निसा जाफरपाशा पिरजादे या विद्यार्थिनींना देण्यात आले. या कार्यक्रमासाठी आमदार हाफिज धत्तुरे, नाशिक जिल्हा बँकेचे संचालक परवेज कोकणी, शफी बागवान, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती हसिना नायकवडी आदी उपस्थित होते. याप्रसंगी विशेष गुणवत्ता प्रश्नप्त ५२ विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

शिवरायांचे विचार अमलात आणण्याची गरज- डॉ. कोल्हे
सांगली, १३ जुलै / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजीमहाराजांची केवळ पूजा करून चालणार नाही, त्यांचे विचार आणि जीवनमूल्ये आचरणात आणली पाहिजेत, असे प्रतिपादन ‘स्टार प्रवाह’ वरील मालिकेतील छत्रपती शिवाजीमहाराजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. नरवीर शिवा काशिद व बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित प्रकट सभेत ते बोलत होते.
कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवाजीमहाराजांची रणनीती हिटलरने पहिल्या महायुद्धात वापरली होती. तर चीनच्या क्रांतीत महाराजांचीच व्यापारनीती वापरल्याचे आढळते. रयतेचे राज्य कसे उभे केले, यासह महाराजांचा आदर्शवत इतिहासच दाखवला आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांची आज कराडला बैठक
कराड, १३ जुलै/वार्ताहर
कराड तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी (दि. १४) दुपारी १ वाजता येथील अक्षता मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील हे राहणार आहेत. या बैठकीत प्रदेश कमिटीच्या आदेशाने सुरू झालेल्या केंद्रनिहाय कामांचा आढावा घेणे, प्रदेशाध्यक्षांच्या जनजागरण अभियानाच्या नियोजनासंदर्भात चर्चा करणे व कराड उत्तर व दक्षिण या पुनर्रचित विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्यात येणार आहे. तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध संस्थांच्या पदाधिकारी, सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मनोहर शिंदे यांनी केले आहे.

गटविकास अधिकाऱ्यांच्या जीपला अपघात; ६ जखमी
कराड, १३ जुलै/वार्ताहर
शासकीय कामानिमित्त साताऱ्याकडे निघालेल्या कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल सोनवणे यांच्या मार्शल जीपला अपघात होऊन सोनवणे व त्यांचे पाच सहकारी गंभीर व किरकोळ जखमी झाले. पुणे-बंगलोर महामार्गावर वराडे (ता. कराड) येथे आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

‘कोषागार कार्यालयातील उध्दटपणाची चौकशी करावी’
आटपाडी, १३ जुलै / वार्ताहर
सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे गेल्या चार महिन्यातील फरकासह वेतन त्वरित मिळावे व याबाबत चौकशी करणाऱ्या सेवानिवृत्तांना कोषागार कार्यालयाकडून उध्दट उत्तरे देणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी तालुका राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशनने जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. कोषागार कार्यालयात विचारणा करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांकडून उध्दट उत्तरे दिली जातात.

शिवनाकवाडी हायस्कूलला ग्रामस्थांनी ठोकले टाळे
इचलकरंजी, १३ जुलै / वार्ताहर
शिवनाकवाडी येथील स्वस्तिश्री जिनसेन ज्ञान प्रसारक मंडळ नांदणी संचालित न्यू हायस्कूल शिवनाकवाडी येथे अनागोंदी कारभार सुरू आहे. याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करूनही सुधारणा न झाल्याने आज विद्यार्थी, शिक्षक यांना बाहेर काढून टाळे ठोकले. त्यामुळे वातावरण काही काळ तंग झाले होते. इचलकरंजीपासून नजीक असलेल्या शिवनाकवाडी येथे गेल्या ७ वर्षापासून स्वस्तिश्री जिनसेन ज्ञान प्रसारक मंडळ नांदणी संचालित न्यू हायस्कूल चालवित आहे. सध्या ८ वी ते १० वी हे तीन वर्ग आहेत. कागदोपत्री ४ शिपाई आहेत. पण प्रत्यक्षात ३ शिपाईच आहेत. आर.डी.मगदूम या शिक्षिका तीन वर्षापासून अध्यापनाचे काम करीत असताना त्यांना तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आले. शिक्षण संस्थेला ग्रामपंचायतीने सुमारे कोटय़वधीची अडीच एकर जागा दिली आहे. यासह शाळेला गावाने पूर्ण सहकार्य केले असतानाही आर्थिक देवघेवीचाच संस्था विचार करते. या सर्व अनागोंदी कारभार विरोधात ग्रामस्थांनी सूचना देऊनही तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांची बैठक सरपंच श्रीकांत आरगे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात झाली. बैठकीत संस्थेच्या कारभारामुळे मुलांचे नुकसान होत असल्याने टाळे ठोकण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत तीन विद्यार्थिंनी यशस्वी
फलटण, १३ जुलै / वार्ताहर
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या प्रज्ञाशोध व सवरेत्कृष्टता केंद्रामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत येथील ३ विद्यार्थिनींनी आपली गुणवत्ता सिद्ध करीत जिल्हास्तरावर तृतीय, तर एका विद्यार्थ्यांने आठवा क्रमांक प्रश्नप्त केला आहे. येथील माजी आ. डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांची नात व यशवंत को ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष नरेंद्र भोईटे यांची कन्या शिवानी भोईटे, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजय राऊत यांची कन्या रसिका राऊत यांनी पुणे जिल्ह्य़ात तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तर वैद्यकीय व्यावसायिक डॉ. दीपक शेंडे यांची कन्या सानिया शेंडे हिने सातारा जिल्ह्य़ात तृतीय क्रमांक पटकाविला आहे.मुधोजी हायस्कूलचा विद्यार्थी राहुल हणमंत बनकर याने सातारा जिल्ह्य़ात आठवा क्रमांक पटकाविला आहे.

व्यवसाय कर अभय योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सांगली, १३ जुलै / प्रतिनिधी
व्यवसाय कर अभय योजना २००९ ही ३१ डिसेंबर २००९ पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती उप प्रश्नदेशिक परिवहन अधिकारी, सांगली यांनी दिली. या योजनेनुसार मोटार वाहन परवानाधारकांनी व्यवसायकराच्या एकूण थकबाकी दिनांक एक एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००७ पर्यंतच्या कालावधीचा संपूर्णपणे कर भरणे आवश्यक राहील. त्याचबरोबर या कालावधीतील देय व्याज शास्ती किंवा दंड याच्या देय रक्कमे १० टक्के रक्कम ३१ डिसेंबर २००९ पर्यंत भरणे आवश्यक आहे. अभय योजनेखालील सवलतीचा लाभ हा दिनांक एक जून २००९ रोजीच्या थकबाकी आणि अनुषंगिक व्याज किंवा दंड यासाठी असेल.

जवाहर कारखाना- एमआयडीसी बहुचर्चित रस्त्याचे काम सुरू
इचलकरंजी, १३ जुलै / वार्ताहर

जनआंदोलनाच्या रेटय़ामुळे बहुचर्चित जवाहर साखर कारखाना ते पंचतारांकित औद्योगिक वसाहतीपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा नारळ आज फुटला. मात्र वसाहतीमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा सामना एकजुटीने करण्याचा निर्धारही करण्यात आला. कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत ही राज्यातील सर्वोत्तम पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून गणली जाते. मात्र वसाहतीमधील सिल्व्हर झोनकडे जाण्यासाठी अधिकृत रस्ताच नव्हता. आहे त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना अक्षरश: कसरत करावी लागत होती. शासन तसेच औद्योगिक महामंडळ यांच्याकडे वारंवार मागणी करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे पंचायत समिती सदस्य संजयकुमार गाठ यांच्यासह ७ गावच्या सरपंच तसेच पदाधिकारी यांनी सात गाव बंद, रास्ता रोको, उपोषण आदी आंदोलनाची हाक दिली होती. या आक्रमक आंदोलनाची प्रशासनाला दखल घेणे भाग पडले. अखेर आज आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष नानासाहेब गाठ यांच्या हस्ते प्रत्यक्ष रस्ता कामाला प्रश्नरंभ झाला.

चोरीच्या निषेधार्थ माळशिरस बंद
माळशिरस, १३ जुलै/प्रतिनिधी
येथील श्रीनाथ ज्वेलर्स या दुकानाच्या चोरीचा अद्याप तपास नसल्याच्या निषेधार्थ सराफ संघटनेच्या आवाहनानुसार आज शहर बंद ठेवण्यात आले होते. येथील पोलीस मळ्याच्या लगत असणाऱ्या या सोन्याचांदीच्या दुकानात ३ वर्षात २ वेळा मोठी तपासाकरिता मागवलेले श्वानपथकही तेथेच घुटमळले.

निळू फुलेंना साताऱ्यात आदरांजली
सातारा, १३ जुलै/प्रतिनिधी
समतावादी विचारासाठी निष्ठा बाळगणाऱ्या सुप्रसिद्ध निळू फुले यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली जातीअंतासाठीचा लढा नेटाने चालविल्यास ठरेल, अशा शब्दात विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे.विद्रोहीचे सरचिटणीस कॉम्रेड धनाजी गुरव, उपाध्यक्ष विजय मांडके यांनीही त्यांना आदरांजली वाहिली.
आज शोकसभा
मंगळवारी, १४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मूकबधिर विद्यालयात येथील सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. त्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.