Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सोलापुरात १२३ निवासी डॉक्टरांची हकालपट्टी
रिक्त पदे तत्काळ भरणार
सोलापूर, १३ जुलै / प्रतिनिधी

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप मागे घेण्यासाठी शासनाने सूचना देऊनसुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळे सर्व संपकरी निवासी डॉक्टरांची पदे रद्द करून रिक्त पदे तत्काळ भरावीत तसेच संपात सहभागी झालेल्या आंतरवासिता प्रशिक्षणार्थी वैद्यकीय विद्यार्थ्यांचा कालावधी एक वर्षावरून दीड वर्षापर्यंत वाढविण्याचा आदेश प्रश्नप्त झाला. यात सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वच्या सर्व म्हणजे १२३ निवासी डॉक्टर्स व ५६ आंतरवासिता प्रशिक्षणार्थींचा फटका बसला आहे.
विद्यावेतनात वाढ करावी या प्रमुख मागणीसह अन्य प्रश्नांवर निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटना गेल्या ७ जुलैपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित शासकीय रुणालयांतील रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. निवासी डॉक्टरांच्या संपात आंतरवासिता प्रशिक्षणार्थी (इंटर्नशिप) वैद्यकीय विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतल्यामुळे रुग्णसेवा आणखी मोडकळीस आल्यामुळे त्याची गंभीर दखल घेत शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने संपकरी निवासी डॉक्टर्स व आंतरवासिता प्रशिक्षणार्थीविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. वासुदेव तायडे यांनी येथील डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांना पाठविलेल्या आदेशानुसार या वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व १२३ संपकरी निवासी डॉक्टरांची पदे तत्काळ रद्द करून चालू सत्रापर्यंत म्हणजे ३१ ऑक्टोबर २००९ पर्यंत आवश्यक तेवढी पदे तात्पुरत्या स्वरूपात संस्था स्तरावर भरण्यात येणार आहेत. तसेच या संपात सहभागी झालेल्या आंतरवासिता प्रशिक्षणार्थीचा आंतरवासिता कालावधी पुढे सहा महिन्यांसाठी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आता दीड वर्षाच्या कालावधीनंतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्यांना वैद्यकीय शिक्षणाची पदवी (एमबीबीएस) मिळण्याची शिफारस विद्यापीठाकडे केली जाणार आहे.
शासनाच्या या कठोर भूमिकेबद्दल वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून कोणत्याही दबावाला बळी न पडता आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार मार्ड व आंतरवासिता प्रशिक्षणार्थी संघटनेने केला आहे. सद्य:स्थितीत रुग्णसेवेत खंड पडू नये म्हणून शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. परंतु शासकीय वैद्यकीय अधिकारीही आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या २१ जुलैपासून संपावर जाणार आहेत. येथील शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २२ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.