Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कोल्हापूर पालिकेच्याच ५३८ इमारती विनापरवाना
कोल्हापूर, १३ जुलै / विशेष प्रतिनिधी

 

विनापरवाना बांधकामांवर कारवाईचे कडक अधिकार असलेल्या कोल्हापूर महापालिकेने स्वत:च्याच इमारती विनापरवाना बांधल्या असल्याचे एक प्रकरण आगामी काळात विशेष चर्चेत येण्याची शक्यता आहे. माहितीच्या अधिकाराखाली मागविण्यात आलेल्या माहितीमध्ये महापालिकेच्या मालकीच्या तब्बल ५३८ इमारती विनापरवाना असल्याची माहिती पुढे आली असून याखेरीज महापालिका भाडेपट्टय़ाने देत असलेल्या शहरातील १७०० गाळ्यांचे बांधकामही मंजूर नकाशाप्रमाणे नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित विषय आंदोलनाच्या ऐरणीवर येणार आहे.
कोल्हापूर जनशक्तीचे सुभाष वोरा यांनी महानगरपालिकेकडे यासंदर्भात माहिती मागितली होती. या माहितीला उत्तर देताना महापालिकेच्या इस्टेट ऑफिसर यांनी या सर्व इमारतींच्या बांधकाम परवान्याची कोणतीच कागदपत्रे महापालिकेच्या दप्तरात उपलब्ध नसल्याचे कबूल केले आहे. यामध्ये महापालिका प्रशासकीय इमारत, शाळा व मार्केट यांच्या प्रत्येकी ४८ इमारती, व्यायामशाळा, सभागृह, समाज मंदिर व अभ्यासिका यासाठीच्या ६७ इमारती, २ पॅव्हेलियन, २३ दवाखाने, ३४३ शौचालये, २ आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तलाव, ४ सार्वजनिक वाचनालय व १७०० भाडे पट्टय़ावरील गाळे यांचा समावेश आहे.
महापालिका हद्दीमध्ये कोणतेही व्यक्तिगत व सार्वजनिक बांधकाम करताना ते नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार करावे लागते. यासाठी कायद्यामध्ये विविध तरतुदी केलेल्या असतात. या तरतुदींची पूर्तता करूनच नकाशे मंजूर करून घ्यावे लागतात. जेणेकरून अशा इमारतींचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीना सुलभ व्यवहार करता येतो. असे नकाशा मंजूर करून घेण्याचे बंधन महापालिकेलाही घालण्यात आले आहे. मात्र महापालिकेने त्याला पूर्णत: सोडचिठ्ठी दिली असल्याचा आरोप सुभाष वोरा यांनी केला आहे.यासाठी त्यांनी महापालिकेने खुलासा करावा असे आवाहन केले असून योग्य खुलासा मिळाला नाही तर आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.