Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘निळू फुले म्हणजे अभिनयाचा बादशहा व माणुसकीचा मानस्तंभ’
करवीरवासीयांसह मान्यवर कलावंतांची भावपूर्ण श्रद्धांजली
कोल्हापूर, १३ जुलै/विशेष प्रतिनिधी

 

अभिनयाचा बादशहा आणि माणुसकीचा मानस्तंभ अशी दुहेरी भूमिका वठविणारे ज्येष्ठ अभिनेते निळूभाऊ फुले म्हणजे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात ज्योतिबांनंतरचे ‘दुसरे फुले’ होते, अशा भावपूर्ण शब्दांत सोमवारी कोल्हापुरात विविध थरातील जनतेने निळूभाऊंना आदरांजली वाहिली.
कोल्हापूर हे मराठी चित्रपटाचे माहेरघर असल्याने गेल्या ५० वर्षाहून अधिक काळ निळूभाऊ मराठी चित्रपटाशी आणि त्यानिमित्ताने कोल्हापूरकरांशी एकरूप होऊन राहिले. येथील सिनेसृष्टीतील स्पॉटबॉय, लाईटबॉयपासून निर्माता-दिग्दर्शकांपर्यंत, तर सार्वजनिक जीवनात चित्रीकरणाच्या निमित्ताने सभोवतालच्या खेडय़ांतील सर्वसामान्यांपासून ते पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांपर्यंत निळूभाऊंचे अतूट असे नातेसंबंध राहिले. सोमवारी सकाळी त्यांच्या निधनाची वार्ता समजताच चित्रपटसृष्टी हळहळलीच, पण कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनावरही शोककळेने छाया पांघरली. या लाडक्या अभिनेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने १६ जुलै रोजी पुणे येथे (गणेश कला क्रीडा मंदिर), १७ जुलै रोजी मुंबई येथे (रवींद्र नाटय़मंदिर) व दिनांक १८ जुलै रोजी कोल्हापूर येथील गायन समाज देवल क्लबमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
निळूभाऊ म्हणजे ‘निर्मात्यांचा कलाकार’ असे वर्णन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांनी केले. मराठी चित्रपटाचा पडदा आपल्या कसदार अभिनयाने गाजवत असताना निळूभाऊ यांनी मराठी निर्मात्याला आधार देण्याचे आणि जगवण्याचे जे कार्य केले त्याला चित्रपटसृष्टी कधीही विसरू शकणार नाही, असे सांगताना सरपोतदार म्हणाले, अलीकडे कलाकाराच्या मागण्या, त्याच्या सोयी-सुविधांनी निर्माता मेटाकुटीला येतो. मानधनापासून निवास व्यवस्था, प्रवास या सर्व अटी पार करत निर्मात्याला चित्रपट पुढे सरकवायचा असतो. अशी लहर सांभाळणे हे सर्वात कठीण काम, पण निळूभाऊंना त्याचा स्पर्श झालेलाही कधी जाणवला नाही. राहणीत साधेपणा आणि वागण्यात प्रश्नमाणिकपणा घेऊन निळूभाऊंनी कोणतेही नखरे न करता निर्मात्याला साथसोबत केली. विशेषत: मराठी चित्रपट खूपच अडचणीत सापडला आणि चित्रपटच निघत नाही अशी स्थिती होती तेव्हा त्यांनी निर्मात्यांना जे बळ दिले ते सर्वात मोलाचे आहे.
नाटय़सृष्टी आणि सिनेसृष्टीतील आपल्या अव्वल दर्जाच्या अभिनयाने मिळालेली लोकप्रियता आणि समाजाचे पाठबळ सामाजिक न्यायाच्या संघर्षासाठी उभे करणारे निळू फुले हे खरेखुरे समाजसुधारक होते, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ.गोविंद पानसरे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, निळू फुलेंचा िपड राष्ट्रसेवा दलात घडला; परंतु त्याच्याही मर्यादा ओलांडून त्यांनी व्यापक मान्यता मिळवली. अभिनय, सामाजिक बांधीलकी या दोन गुणांबरोबर स्पष्टवक्तेपणा हे निळूभाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचे खास वैशिष्टय़ होते, असे सांगून कॉ.पानसरे यांनी काही आठवणीला उजाळा दिला.
चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी निळूभाऊंच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील फुले कोमेजल्याची भावना व्यक्त केली. अनेक नवोदित पान १ वरून कलावंत, दिग्दर्शक यांच्या जडणघडणीत निळूभाऊंचा मोठा वाटा होता. ते कलाकार म्हणून जेवढे उत्तुंग होते तेवढेच माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते, याकडे निर्देश करताना भालकर यांनी नवोदित कलावंतांनी जर निळूभाऊंचा प्रश्नमाणिकपणा जरी आदर्श म्हणून स्वीकारला तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले.
चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष भुरके म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या चतुरस्र अभिनयाने संपन्न करणारा एक असाधारण अभिनेता आज निघून गेला. आम्ही अशा एका उत्तुंग अभिनेत्याला मुकलो, की त्याची भरपाई होणे कठीण आहे. एक साधा माणूस आणि एक असाधारण अभिनेता याची उत्तम सांगड निळूभाऊंनी घातली होती. कोणत्याही अभिनेत्याला प्रसिद्धी मिळाली, की तो इतक्या उंचीवर जातो, की सर्वसामान्यांच्या हाताशी येऊ शकत नाही. पण निळूभाऊ हे असे व्यक्तिमत्त्व होते, की ज्याने सर्वसामान्यांतच राहणे अधिक पसंत केले. म्हणूनच त्यांचे निधन सर्वानाच चटका लावणारे ठरले.
निळूभाऊंबरोबरच आपला चित्रपटप्रवेश करणारे ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी चित्रपटसृष्टीतील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटाच्या निमित्ताने भालचंद्र कुलकर्णी आणि निळू फुले या दोघांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. निळूभाऊंनी या चित्रपटात झेलेअण्णा वठवले, तर भालचंद्र कुलकर्णी गाडगीळ अण्णांच्या भूमिकेत होते. यानंतर सुमारे ३५ चित्रपट या दोघांनी एकत्रपणे केले. या सर्व प्रवासात निळू फुले नावाचा सच्चा मित्र आपणाला भेटला, असे ते म्हणाले. चित्रपटसृष्टीत निरनिराळ्या स्वभावाची असंख्य माणसे असतात. पण या सर्वाना सांभाळून घेऊन सगळ्यांशी जमवून घेणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. सहकलाकार, नवोदित कलाकार यांना सतत मार्गदर्शन करून आधार देणाऱ्या निळूभाऊंना अहंकाराने कधी स्पर्शही केला नाही. यामुळेच त्यांची लोकप्रियता ही सातासमुद्रापार गेली, असे ते म्हणाले.