Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

वाठारमध्ये दारुबंदीसाठी महिलांचे गुप्त मतदान घेण्याचा आदेश
कोल्हापूर, १३ जुलै/विशेष प्रतिनिधी

 

गेले १२ दिवस पश्चिम महाराष्ट्रात लोकांचा चर्चेचा विषय ठरलेल्या वाठार (ता.हातकणंगले) दारूबंदी विषयाच्या आंदोलनाला आज यश मिळाले. जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी वाठारमध्ये महिलांच्या गुप्त मतदानाचे आदेश तहसीलदारांना दिले. त्यामुळे वाठारमध्ये नागरिकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलकांच्या वतीने अंनिसचे जिल्हाध्यक्ष गिरीश फोंडे यांनी आज सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांच्याकडे आदेशाची प्रत सुपूर्द केली.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाठार येथे देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेची बैठक घेऊन उघड मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत निर्धारित वेळेत ५० टक्के महिला दारूबंदीच्या विरोधात मतदानासाठी उपस्थित राहिल्या नाहीत, असे कारण दाखवून दारू दुकान बंदीचा ठराव फेटाळण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. या निर्णयाविरुद्ध ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ.गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली असता सोमवापर्यंत याविषयी अंतिम निर्णय देत असल्याचे जाहीर केले गेले. यानुसार आज सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी गुप्त मतदान प्रक्रियेच्या आदेशाची प्रत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष गिरीश फोंडे यांच्याकडे सुपूर्द केली.
दरम्यान, ग्रामपंचायत सदस्यांच्या असहकार भूमिकेने ही मोहीम यशस्वी झाली नाही या समजुतीतून सरपंच सुनीता शिंदे व दारूबंदी कृती समितीच्या स्वाती क्षीरसागर व कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीलाच ठोकलेले टाळे या मोहिमेसाठी पाठिंबा देणाऱ्या व कृती समितीमधील चर्चेनंतर सकाळी काढण्यात आले. या वेळी सरपंच सौ.शिंदेंसह उपसरपंच शरद सांभारे, सदस्य सूर्यकांत शिर्के, दीपक शिंदे आदी उपस्थित होते.