Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पांढऱ्या कपडय़ातील दरोडेखोरांची थडगी बांधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - राजू शेट्टी
सांगली, १३ जुलै / प्रतिनिधी

 

पांढऱ्या कपडय़ातील दरोडेखोरांची थडगी बांधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने स्टेशन चौकात आयोजित केलेल्या खासदार शेट्टी यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बापूसाहेब मगदूम होते.
चेहरे करपलेल्या माणसांसाठी मी लढत राहिलो. यापुढेही मी लढणार आहे. या माणसांनीच मला निवडून आणले. मी निवडून आल्यानंतर अनेकांना आपली राजकीय दुकाने बंद पडतील, अशी भीती वाटत होती व त्यामुळेच मला पराभूत करण्यासाठी गृहमंत्री जयंत पाटील यांनी कंबर कसली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाचा धक्का जलसंपदामंत्री अजित पवार यांना सहन झालेला नाही, ते अजूनही त्यातून सावरलेले नाहीत. मी साखर कारखाने, दूध संघ अथवा बँका काढल्या नाहीत. उसाचे व दुधाचे अर्थकारण शेतकऱ्यांना समजावले. त्यांच्यातील स्वाभिमान जागा केला. टक्केवारीचा धंदा मी कधीच केला नाही, असा टोमणा मारून शेट्टी म्हणाले, यापुढे मी कधीच पराभूत होणार नाही. कारण, माझी लढाई ही गरिबांसाठी असणारी लढाई आहे. ज्यादिवशी मी या माणसांना विसरेन, त्याचदिवशी मी पराभूत होईन. अन्यथा, शरद पवार जरी आले, तरी मी पराभूत होऊ शकत नाही.
सहकार खात्याने मांडलेल्या विधेयकावर जेव्हा विधिमंडळात चर्चा झाली, त्यावेळी त्या पांढऱ्या कपडय़ातील दरोडेखोरांना शिक्षा झाली पाहिजे, असे मी म्हणालो. तेव्हा विरोधकांसह सत्ताधारीही माझ्या अंगावर आले. मी निवडून आलो, याला कारण मी वाडय़ावर गेलो नाही. वाडय़ामध्ये पैशाच्या बॅगा वाटल्या नाहीत. मी वाडीवरती गेलो, वस्तीवरती गेलो, गल्ली- बोळात गेलो व तिथल्या माणसांना वाडय़ापासून दूर राहायला सांगितले. यापुढे पाटलाच्या वाडय़ातून चालणारे राजकारण बंद झाले पाहिजे. सामान्यातला सामान्य माणूस पुढे आला पाहिजे, असे विचार मांडले. लोकांच्या मनातील विचार मी मांडत होतो व त्यासाठीच भांडत होतो. म्हणून मी निवडून आलो. गृहमंत्री जयंत पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघात तळ ठोकून राजू शेट्टीसारख्या भस्मासुराला गाडा, असे लोकांना आवाहन केले होते. लोकांनी नेमका कोण भस्मासूर आहे, हे दाखवून दिले आहे. मला सत्ताधीश व्हायचे नाही. परंतु बँका, कारखाने, पतसंस्था, शिक्षण संस्थांच्या माध्यमातून लोकांचे शोषण करणाऱ्या बांडगुळांना धडा शिकवायचा आहे व त्यासाठी आम्हाला साथ द्या, असे आवाहन शेट्टी यांनी केले.
यावेळी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रश्न. शरद पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात एक परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीतही आपण सारे मिळून परिवर्तन घडवू या. सदाभाऊ खोत, बापूसाहेब मगदूम, अरुण माने, शंकर पुजारी, शिवाजीराव शिंदे, प्रश्न. अमर कांबळे, शिवाजीराव परुळेकर यांची भाषणे झाली. अ‍ॅड. के. डी. शिंदे यांनी प्रश्नस्ताविक केले. डॉ. जयपाल चौगुले यांनी आभार मानले.

आर . आर. यांची ओळख राजकीय विदूषकाची
खासदार शेट्टी म्हणाले, निवडणुकीच्या खर्चासाठी शेतात राबणारी माणसं मला पैसे आणून देत होती. तेव्हा माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील प्रचाराला आले व म्हणाले, राजू शेट्टी यांच्याकडे येणाऱ्या पैशाला घामाचा वास येत नाही. मी गृहमंत्री असतो, तर याची चौकशी केली असती. खरं तर आर. आर. पाटील हे सुध्दा माझ्यासारखेच घाम गाळून वर आले होते. परंतु ते आता घाम विसरले. म्हणूनच त्यांचे मंत्रिपद गेले. आता राज्यात एक राजकीय विदूषक अशीच त्यांची ओळख शिल्लक राहिली आहे.