Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

खासगी क्षेत्राच्या विस्तारामुळे आरक्षणाचे निकष बदलतील- कसबे
सांगली, १३ जुलै / प्रतिनिधी

 

खासगी क्षेत्राचा झपाटय़ाने होणाऱ्या विस्तारामुळे आरक्षणाचे निकष बदलून जाईल व गुणवत्तेला प्रश्नधान्य दिले जाईल. त्यासाठी आजची निव्वळ पोपटपंची असणारी शिक्षण व्यवस्था बदलून सक्षम समाज घडविणारे शिक्षण देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.
मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात प्रश्नचार्य अ. के. भागवत विचार मंच व शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ यांच्यावतीने ‘आरक्षणाच्या सवलती व त्याचा शिक्षणावर होणारा परिणाम’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. चिमण लोकूर होते.
डॉ. कसबे म्हणाले, माणसाच्या विकासासाठी आरक्षण आता नवीन राहिलेले नाही. समाजधारी व सत्ताधारी असे वर्ग तयार झाले आहेत. सत्ताधारी वर्गाला अनुकूल अशी ध्येयधोरणे ठरवली जात आहेत. सत्ताधाऱ्यांना १०० टक्के आरक्षण होते. तेव्हाचा इतिहासही केविलवाणाच आहे. स्त्रिया क्षुद्र व दबलेल्या होत्या. शिक्षणाचा अधिकार त्यांना नव्हता. स्वातंत्र्यानंतरही अवघे १८ टक्के लोक साक्षर झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोककल्याणकारी राज्याची मांडलेली संकल्पना जागतिकीकरणाच्या वाऱ्यात संपुष्टात येत आहे. आजच्या काळात शिक्षणाची परिभाषाच बदलली आहे. शिक्षण संस्थांच्या आता कंपन्या झाल्या आहेत. ४० लाखाहून अधिक बेरोजगारांची यादी एॅम्प्लॉयमेंट कार्यालयात आहे. आज इतर उद्योगांपेक्षा शिक्षण क्षेत्रच फायद्याचे ठरू लागले आहे. त्यामुळे या क्षेत्रात जास्त भ्रष्टाचार होऊ लागला आहे. हे बदलण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन कसबे यांनी केले. स्वागत प्रश्न. अविनाश सप्रे यांनी केले.