Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

रवी बँक घोटाळा: आजी-माजी दोन नगरसेवकांना अटक
कोल्हापूर, १३ जुलै / प्रतिनिधी

 

येथील रवी को ऑप बँकेमध्ये झालेल्या सुमारे १७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी आज विद्यमान नगरसेवक अजित मोरे आणि माजी नगरसेवक सुभाष ऊर्फ बबन कृष्णा कोराणे या दोघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी आज अटक केली. या दोघांनाही प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता दोघांनाही दिनांक १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
सहकार खात्याच्या उपनिबंधकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रवी को ऑप बँकेच्या व्यवस्थापकांसह २८ आजी-माजी संचालकांविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. या २८ पैकी पाच संचालक गुन्हा दाखल होण्यापूर्वीच मरण पावले आहेत. आत्तापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी मोरे, कोराणे वगळता सर्वजण जामिनावर मुक्त झाले आहेत. उरलेले तीन आरोपी अजून पोलिसांना शरण यायचे आहेत. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
१७ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी नगरसेवक, विद्यमान नगरसेवक, माजी उपमहापौर, स्थायी समितीचे माजी सभापती, परिवहन समितीचे माजी सभापती तसेच काही अवैध धंदे करणाऱ्यांचा समावेश आहे. आज अटक करण्यात आलेले अजित मोरे आणि सुभाष ऊर्फ बबन कोराणे यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांचे हे अटकपूर्व जामिनाचे अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांना पोलिसांना शरण जाण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.