Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

नागनाथअण्णा नायकवडी यांचा उद्या सत्कार
सांगली, १३ जुलै / प्रतिनिधी

 

हुतात्मा उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सपत्नीक बुधवार दि. १५ जुलै रोजी माजी केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री बाळासाहेब विखे- पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी गौरव समितीचे निमंत्रक व हुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी यांनी दिली.
डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचा ८८ वा वाढदिवस मोठय़ाप्रमाणात साजरा करण्याचा निर्णय गौरव समितीच्या हुतात्मा साखर कारखाना विश्रामगृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वैभव नायकवडी होते. वाळवा येथील हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या क्रीडांगणावर दि. १५ जुलै रोजी दुपारी एक वाजता माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे- पाटील यांच्या हस्ते डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रश्नचार्य डॉ. पी. बी. पाटील हे असून प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रश्न. डॉ. एन. डी. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे- पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी किसान शिक्षण संस्था संचलित हुतात्मा इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिंग कॉलेजचा उद्घाटन व विद्यार्थिनी वसतिगृहाचा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त वैभव नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली २२ उपसमित्या नेमण्यात आल्या आहेत. तसेच हुतात्मा उद्योग व शिक्षण समूहातील शेतकरी व कामगार यांच्या वतीनेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सत्कार कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन वैभव नायकवडी यांनी केले आहे.
या बैठकीस हुतात्मा साखर कारखान्याचे संचालक ए. पी. देशमुख, दिनकर बाबर, शामराव सव्वाशे, महादेव कांबळे, भगवान पाटील, बाळासाहेब पाटील, सरपंच गौरव नायकवडी यांच्यासह हुतात्मा उद्योग व शिक्षण समूहातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.