Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे गटई कामगारांना आवाहन
सांगली, १३ जुलै / प्रतिनिधी

 

सामाजिक न्याय विभागामार्फत गटई कामगारांना १०० टक्के अनुदान तत्त्वावर लोखंडी पत्र्याचे स्टॉल व ५०० रुपयांचे अनुदान देण्यात येत असून या योजनेचा पात्र व इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विशेष जिल्हा सामाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.
सन २००७-२००८ पासून ही योजना ग्रामीण भागात, क वर्ग नगरपालिका, ब वर्ग नगरपालिका, अ वर्ग नगरपालिका, तसेच महानगरपालिका क्षेत्रात व छावणी क्षेत्रात राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी अनुसूचित जातीचा असावा, तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षकि उत्पन्न ग्रामीण भागात रुपये ४० हजार व शहरी भागात रुपये ५० हजार पेक्षा अधिक नसावे.अर्जदार ज्या जागी स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी क्षेत्र, महानगरपालिका यांनी त्यास भाडय़ाने, कराराने, खरेदीने किंवा मोफत परंतु अधिकृतरीत्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्वत:च्या मालकीची असावी. एखाद्या लाभार्थ्यांला स्टॉलचा ताबा दिल्यानंतर त्या स्टॉलची देखभाल दुरुस्ती इत्यादी बाबी लाभार्थीनी स्वत: करणे आवश्यक राहील. गटई पत्र्याचे स्टॉल हे एका घरात एकाच व्यक्तीला दिले जातील. स्टॉल वाटपाबाबतचे पत्र लाभार्थ्यांंच्या फोटोसह स्टॉलमध्ये प्रथमदर्शनी भागावर लावणे आवश्यक आहे व एकदा गटई स्टॉलचे वाटप झाल्यानंतर सदर स्टॉलची विक्री करता येणार नाही तसेच भाडे तत्त्वावर देता येणार नाही किंवा स्टॉलचे हस्तांतरण करता येणार नाही. या योजनेच्या अधिक माहितीसाठी व विहित नमुन्यातील अर्जासाठी विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, गुलमोहर अपार्टमेंट, गुलमोहर कॉलनी, माळी चित्रमंदिर जवळ, सांगली येथे संपर्क साधावा. अर्ज कार्यालयात उपलब्ध असून इच्छुक व पात्र लाभार्थींनी आपले प्रस्ताव कार्यालयात सादर करावेत. तसेच ज्या लाभार्थींनी यापूर्वी अर्ज केले व पात्र ठरले आहेत त्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधून लोखंडी पत्रा स्टॉल प्रश्नप्त करुन घ्यावे, असे आवाहनही घाटे यांनी केले आहे.