Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कुपेकर यांच्या अंगरक्षकाला मारहाण, तिघांना अटक व सुटका
सावंतवाडी, १३ जुलै/वार्ताहर

 

आंबोलीत येथे रविवारी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या ताफ्यातील अंगरक्षकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणातील चौघांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा सशर्त जामीन न्यायालयाने मंजूर केला. कुडाळ येथील या चौघांपैकी दोघेजण मनसेचे पदाधिकारी आहेत. या तरुणांना बेदम मारहाणीची तक्रार पोलिसानी दाखल करून घेतली नसल्याने तरी न्यायालयाने नोंदवून घेतली.
विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर रविवारी आंबोलीत दौऱ्यावर होते. विकासकामांसंदर्भात बैठक आटोपून ते गडहिंग्लजला परतत असताना आंबोलीत पावसाळी पर्यटकांच्या गर्दीला ताफ्यातील रक्षक बाजूला करत असताना तरुणांनी पोलीस सहायक निरीक्षक आप्पासाहेब कोकीतकर (कोल्हापूर) यांच्या शर्टास हात घालून मारहाण केली.
कुडाळ मनसे तालुका अध्यक्ष राजेश पडते, शहराध्यक्ष सिद्धेश कुठ्ठाळे, सुनिल बांदेकर व योगेश राऊळ यांना पोलीस सहायक निरीक्षक कोकीतकर बाजुला करत असताना बाचाबाची झाली तेव्हा या चौघांनी पोलिसांशी हुज्जत घालून पोलिसांनाच मारहाण केली, अशी तक्रार ताफ्यातील पोलीस सहायक निरीक्षक श्री. कोकीतकर यांनी पोलीस ठाण्यात दिली. सावंतवाडी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. या चौघाही जणांना न्यायालयात हजर केले.
सावंतवाी प्रथमवर्ग न्यायालयात चौघांनाही पोलिसांनी हजर केले असता त्यांनी पोलिसांविरोधात तक्रार नसल्याचे न्यायालयात सांगितले. मात्र विधानसत्रा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, त्यांचा भाऊ आणि त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा यंत्रणेविरोधात पोलीस निरीक्षक अनंत केतकर यांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याचे न्यायालयात सांगितले.
अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी विधानसभा अध्यक्ष व त्यांच्या ताफ्यातील पोलिसांनी आरोपींना बेदम मारहाण केली असून त्यांच्या अंगावर जखमा व वळ उठल्याचे न्यायालयात युक्तीवाद करताना सांगितले. न्यायाधीश श्री. येंडगे यांनी चारही आरोपींच्या अंगावरील जखमा पाहून प्रथमदर्शनी दिलेल्या पुराव्यावरून चौघांची मेडीकल तपासणी केली जावी, असे आदेश दिले.
तक्रार खोटी - कुपेकर
आंबोलीत युवकांनी हुल्लडबाजी करून ताफ्यातील सरकारी पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण करणे चुकीचे आहे. त्यांनी आमच्या विरोधात दिलेली तक्रार खोडसाळ असून त्यांनी चुकीचे पाऊल उचलले असल्याचे विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी सांगितले. आंबोलीच्या घटनेबाबत प्रधान सचिवांनी पोलीस अधिक्षकांना अहवाल देण्यास सांगितले आहे.